ठाण्यात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल हाऊसफुल्ल

By admin | Published: August 8, 2016 02:09 AM2016-08-08T02:09:33+5:302016-08-08T02:09:33+5:30

नाट्यगृहातून बाहेर पडताना बच्चेकंपनीबरोबरच पालकांच्या ओठांवर गाणी, आपल्या मित्रमैत्रिणींचे किस्से, हास्य, शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट आहे, अशा प्रतिक्रिया आणि त्यांच्या मनात रुजलेले सामाजिक विचार

Short Film Festival HouseFull in Thane | ठाण्यात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल हाऊसफुल्ल

ठाण्यात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल हाऊसफुल्ल

Next

स्नेहा पावसकर, ठाणे
नाट्यगृहातून बाहेर पडताना बच्चेकंपनीबरोबरच पालकांच्या ओठांवर गाणी, आपल्या मित्रमैत्रिणींचे किस्से, हास्य, शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट आहे, अशा प्रतिक्रिया आणि त्यांच्या मनात रुजलेले सामाजिक विचार, असे वातावरण पाहायला मिळाले, ते काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात. निमित्त होते ते राजू तुलालवार निर्मित तीन शॉर्ट फिल्मचे. पहिलाच आणि विशेष शो हाऊसफुल्ल झाल्याने त्या शॉर्ट फिल्मचे प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सादरीकरण करण्यात आले.
लहान मुलांचे मनोरंजन करण्याच्या दृष्टीने राजू तुलालवार यांनी हसवणारी मुले, कट्टीबट्टी आणि मॉनिटर या तीनही शॉर्ट फिल्म तयार केल्या आहेत. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये शनिवारी त्याचा विशेष शो झाला. हाऊसफुल्लमुळे अनेकांना शो ला बसण्याची संधी मिळाली नाही. मात्र, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहता पहिल्या शोनंतर पुन्हा त्या शॉर्ट फिल्म दाखवण्याचा निर्णय तुलालवार यांनी घेतला.
या तिन्ही शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून तुलालवार यांनी मुलांचे भावविश्व साध्या शब्दांत आणि सोप्या पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्ममधून मुलांसाठी देऊ केलेले संदेश हे सर्वच वयांतील व्यक्तींना विचार करायला लावणारे आहेत. यातील घटना या प्रेक्षकांना आपल्या वाटतात.
वाढत्या वयाबरोबर माणसं हसणं विसरतात, हसण्याने आयुष्य वाढते, हसा आणि हसवा... तर हसताना प्रत्येक जण छान दिसतो. हसणार तो जगणार, रडणार तो संपणार, असा संदेश हसवणारी मुले या शॉर्ट फिल्ममधून बालकलाकारांनी दिला आहे.
वर्गात आपल्या बेस्ट फ्रेण्डकडून आपल्याला इतरांपेक्षा वेगळ्या अपेक्षा असतात. मात्र, एखाद्या वेळी गैरसमजामुळे मैत्रीवर परिणाम होतो. मात्र, खरी मैत्री कायम असते. मित्रमैत्रिणींनी एकमेकांना समजून घ्यायचे असते. त्यात फक्त कट्टीबट्टी सुरू राहते, असा संदेश ‘कट्टीबट्टी’मधून देण्यात आला आहे.
वर्गाचा मॉनिटर होण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो; मात्र त्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना जे आपल्याकडे अधिक आहे, ते देण्याचा सल्ला देतात आणि मग स्पर्धा सुरू होते. कोणी पैसे, कपडे, अन्न, पुस्तक, खेळणी, क्रिकेटचे साहित्य, जुने फोन, सायकल अशा वस्तू दान करतात. मात्र, आपल्याकडे असलेली विद्या, कला दुसऱ्याला देणे आणि एकाकी ज्येष्ठांना आधारासाठी वेळ देणाऱ्या मुलांना मॉनिटर बनवले जाते. वेळ आणि विद्यादान, हे आजच्या काळातही फार महत्त्वाचे आहे, असा सल्ला ‘मॉनिटर’मधून दिला आहे.
एखादी गोष्ट मांडण्यासाठी नाटकापेक्षा चित्रपट हे माध्यम मला प्रभावी वाटले आणि म्हणून शॉर्ट फिल्ममधून मुलांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला, असे मत तुलालवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Short Film Festival HouseFull in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.