शहाडचा धोकादायक पादचारी पूल अखेर पाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:53 AM2019-05-20T00:53:53+5:302019-05-20T00:54:10+5:30

मध्य रेल्वेचा चार तासांचा मेगाब्लॉक : कल्याण ते टिटवाळा प्रवासात रिक्षाचालकांनी केली प्रवाशांची लूट

Shahad's dangerous pedestrian pool ended | शहाडचा धोकादायक पादचारी पूल अखेर पाडला

शहाडचा धोकादायक पादचारी पूल अखेर पाडला

googlenewsNext

कल्याण : कल्याण-कसारा मार्गावरील शहाड स्टेशनवरील अतिधोकादायक झालेला पादचारी पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेने रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ च्या दरम्यान चार तासांचा मेगाब्लॉक घेतला. तसेच टिटवाळ्याजवळील नव्या पादचारी पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर रेल्वेकडून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवरील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट केले होते. त्यात अनेक पादचारी पूल धोकादायक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे ते पाडून नवे पादचारी पूल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


टिटवाळा स्थानकात नवा पूल उभारण्यात यावा, अशी रेल्वे प्रवासी आणि पादचाऱ्यांची मागणी होती. गर्डर टाकण्याचे काम रविवारी पार पडले आहे. आता पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.


दरम्यान, या पुलाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या चार तासांच्या मेगाब्लॉकचा रिक्षाचालकांनी भरपूर फायदा घेतला. केडीएमटीने प्रवाशांसाठी जादा बसची व्यवस्था केली होती. मेगाब्लॉकदरम्यान बसला प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. तर, टिटवाळा ते कल्याण या प्रवासासाठी रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून प्रतिप्रवासी १०० रुपये भाडे उकळले. भरउन्हात हा ब्लॉक घेण्यात आल्याने कल्याण ते टिटवाळादरम्यान बस, रिक्षाने इच्छितस्थळी जाताना प्रवाशांची बरीच दमछाक झाली.

लोकग्राम पादचारी पूल झाला बंद
 दररोज सुमारे सव्वा लाख रेल्वे प्रवासी ज्या पुलावरून येजा करत होते, तो लोकग्रामचा पादचारी पूल शनिवारी मध्यरात्रीपासून रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. मुंबईतील धोकादायक पूल कोसळल्याच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने केलेल्या तांत्रिक सुरक्षा परीक्षणात हा पूल धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा पूल बंद केला आहे.
कल्याण रेल्वेस्थानकातील सात क्रमांकाच्या फलाटावरून पूर्वेला जाण्यासाठी १९९० मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाचा वापर रेल्वे प्रवासी करत होते. प्रवासी लोकग्राम येथून रिक्षा पकडून जात असत. त्यातच, कल्याण पत्रीपूल पाडल्याने तेथे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी याच पुलाचा जास्त प्रमाणात वापर होत होता. लोकग्रामचा पादचारी पूल बंद झाल्याने प्रवाशांना कर्जतच्या दिशेकडील स्कायवॉकवरून सिद्धार्थनगर येथे जाऊन मग लोकग्रामच्या दिशेने जाता येणार आहे किंवा पश्चिमेतून रिक्षाने पत्रीपूलमार्गे लोकग्रामला जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढच होणार आहे.

या गाड्या होत्या रद्द : कसारा ते कल्याणदरम्यान घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे गोदावरी एक्स्प्रेस आणि राज्यराणी एक्स्प्रेस या रद्द करण्यात आल्या. तर, पुणे एक्स्प्रेस व्हाया दौंड, मनमाडमार्गे चालवण्यात आली. त्याबरोबर कसाºयाकडे जाणाºया नऊ उपनगरी गाड्या आणि टिटवाळ्याकडे जाणारी एक गाडी रद्द करण्यात आली होती.

Web Title: Shahad's dangerous pedestrian pool ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.