भाजपानं आम्हाला गोंजारू द्या किंवा मुका घेऊ द्या, युती होणं अशक्य-संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 11:01 AM2018-04-16T11:01:21+5:302018-04-16T11:01:21+5:30

भाजपासोबत युती होणार नसल्याचा शिवसेनेकडून पुनरूच्चार

Sanjay Raut denies for Shiv Sena and BJP alliance | भाजपानं आम्हाला गोंजारू द्या किंवा मुका घेऊ द्या, युती होणं अशक्य-संजय राऊत

भाजपानं आम्हाला गोंजारू द्या किंवा मुका घेऊ द्या, युती होणं अशक्य-संजय राऊत

Next

डोंबिवली - भाजपा कितीही आवाहन करू देत, आम्हाला गोंजारू देत किंवा मुका घेऊ देत, तरी युती होणार नसल्याचा पुनरूच्चार करून सध्या महाराष्ट्राला निवडणुका परवडणाऱ्या नसल्याने शिवसेनेने सरकारचा टेकू काढलेला नाही, असा युक्तिवाद शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. डोंबिवली पत्रकार संघाच्या अनौपचारिक गप्पांवेळी ते बोलत होते. 

तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न
जातीय व धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणुका जिंकण्याचा घाट भाजपाकडून घातला जात आहे. देशात अराजक निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे. आजवर महाराष्ट्र कधी जातीच्या मुद्द्यावर फाटला नव्हता. पण भीमा-कोरेगावच्या प्रकरणामुळे फाटलेला महाराष्ट्र अद्याप शिवला गेलेला नाही. त्यामुळेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणा-या शक्तींना चिरडून टाकले पाहिजे, असे आवाहन करत राऊत यांनी भाजपाला टार्गेटदेखील केले.

'डोंबिवलीपेक्षा वाराणसीची अवस्था वाईट'

दरम्यान,  पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आपले गाव, शहर आणि मतदारसंघाच्या विकासापुरते पाहू नये. त्यांचा मतदारसंघ म्हणजे देश नाही. पंतप्रधानाच्या वाराणसी मतदारसंघाची अवस्था डोंबिवलीपेक्षा अत्यंत वाईट आहे. म्हणून तर तेथे प्रचंड खर्च करून कामे सुरू आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला.
गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे अत्यंत घाणेरडे शहर असल्याचे वक्तव्य केले होते. ते विचारता खासदार राऊत यांनी वस्तुस्थिती मांडत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघावरच निशाणा साधला. गडकरी यांनी जरी डोंबिवलीविषयी विधान केले असले तरी नागपूरची अवस्था काय होती? युती सरकारच्या काळात गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाल्यानंतरच नागपूरचा विकास होत गेला. आताही मुख्यमंत्र्यांचे जास्त लक्ष नागपूरवर आहे. सध्याचे मुख्यमंत्री काय किंवा विलासराव देशमुख काय, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामे खेचून नेली. त्याला पंतप्रधानही अपवाद नाहीत. ते वाराणसी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्या मतदारसंघाची अवस्था डोंबिवलीपेक्षा वाईट आहे. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पण वाराणशी म्हणजे देश नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. राजीव गांधी यांनीही त्यांच्या काळात त्यांचा मतदारसंघ अमेठीवर जास्त लक्ष दिले. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे केवळ त्याचा मतदारसंघ, गाव आणि शहराचे नसतात. ते देशाचे, राज्याचे असतात, असा चिमटा काढला.

‘बेटी बचाव हा इशारा’
दिल्लीतल निर्भया बलात्कार प्रकरणाच्या वेळी भाजपाची जी भूमिका होती. ती आत्ता उत्तर प्रदेश आणि काश्मीर बलात्कार प्रकरणावेळी बदलेली दिसते. ‘बेटी बचाव’ हा कार्यक्रम राहिलेला नसून तो धोक्याचा इशारा (वॉर्निंग) झालेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
 

Web Title: Sanjay Raut denies for Shiv Sena and BJP alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.