गर्डर बदलण्यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 02:32 AM2019-06-10T02:32:03+5:302019-06-10T02:32:23+5:30

वालधुनी नाल्यावर रेल्वेची मोहीम : सहा तासांच्या ब्लॉकमुळे अंबरनाथ व बदलापुरात मोठी वाहतूककोंडी

Rail megablocks to change girder | गर्डर बदलण्यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक

गर्डर बदलण्यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक

Next

अंबरनाथ : रेल्वेची कल्याणहून कर्जत दिशेकडील रेल्वेसेवा रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत बंद ठेवण्यात आली होती. अंबरनाथ आणि उल्हासनगर या दोन्ही शहरांच्या मध्यावर असलेल्या वालधुनी नाल्यावरील रेल्वेपुलाचे गर्डर धोकादायक झाल्याने ते काढून नवीन गर्डर यावेळेत बसवण्यात आले. रेल्वेची यंत्रणा या ठिकाणी सहा तास काम करत होती. या रेल्वेब्लॉकमुळे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागला. मेगाब्लॉकमुळे दोन्ही शहरांतील मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली होती.

अंबरनाथ येथील वालधुनीवरील रेल्वेपुलाचा लोखंडी सांगाडा कमकुवत झाल्याने तो बदलण्याचे काम रेल्वेने हाती घेतले होते. गेल्या १५ दिवसांपासून या भागात पुलावरील गर्डर आणण्याचे काम सुरू होते. त्यासाठी नाल्यातून रस्तादेखील तयार करण्यात आला. गर्डर पुलाजवळ आणल्यावर रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक घेतला. या कामासाठी कल्याण ते बदलापूरपर्यंतची रेल्वेसेवा बंद ठेवण्यात आली होती. १० वाजता रेल्वेने रेल्वेरूळ काढून त्यांच्याखाली असलेला लोखंडी पूल काढला. त्यासाठी मोठी क्रेनदेखील मागवण्यात आली. जुना लोखंडी गर्डर काढल्यावर लागलीच त्याठिकाणी अभियांत्रिकी काम करून सिमेंट काँक्रिटचे नवीन गर्डर बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गर्डर बसवताच त्यावर लागलीच रेल्वेरूळ आणि खडी टाकून हा मार्ग रेल्वेने खुला केला. ६ तास चाललेल्या या कामासाठी शेकडोच्या संख्येने रेल्वे कर्मचारी काम करत होते. सहा तासांत हे काम पूर्ण करण्यात रेल्वेला यश आले. दुसरीकडे रेल्वेने नियमित रेल्वेरूळ आणि ओव्हरहेड वायरचीही दुरुस्ती करून घेतली आहे. रेल्वेच्या या मेगाब्लॉकमुळे कल्याण ते बदलापूर यादरम्यानच्या शहरांना मोठ्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बदलापूर ते कल्याण रिक्षाभाडे १५० रुपये प्रतिप्रवासी करण्यात आले होते. पर्यायी वाहतूकसाधन नसल्याने प्रत्येकाने खाजगी वाहनांचाच आधार घेतला. त्यामुळे अंबरनाथमधील फॉरेस्टनाका, एमआयडीसी चौक, विम्कानाका, बदलापुरातील उड्डाणपूल मार्गावर मोठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. तब्बल दीड तासानंतर वाहतूककोंडीच्या ठिकाणी पोलीस आल्यावर त्यांनी ही कोंडी सोडवली.

कल्याण शहरात वाहतूक ‘ब्लॉक’; ठिकठिकाणी वाहनांची रांग
च्कल्याण : उल्हासनगर आणि अंबरनाथदरम्यान पुलाच्या गर्डरचे काम करण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेमार्गावर कल्याण ते अंबरनाथ यादरम्यान रविवारी दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक आणि पॉवरब्लॉक घेण्यात आला होता. या मेगाब्लॉकचा फटका कल्याण शहरातील रस्ते वाहतुकीला बसल्याने शहरात ‘वाहतूक ब्लॉक’ झालेली पाहायला मिळाली.

च्कल्याण ते अंबरनाथदरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने काहींनी रस्तेवाहतुकीला प्राधान्य दिले होते. त्यामुळे पत्रीपूल, शहाडपूल, वालधुनी पुलाबरोबरच पश्चिमेतील सुभाषचंद्र बोस चौक परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक शाखेचे तीन अधिकारी, ३० पोलिसांसह ४० वॉर्डनमार्फत ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला गेला.

च्मेगाब्लॉकदरम्यान केडीएमटीतर्फे अंबरनाथकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या १५ बस कल्याण रेल्वेस्थानक परिसरात उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आधीच फेरीवाल्यांनी व्यापलेल्या या परिसरातही वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

केडीएमटीला ९० हजारांचे उत्पन्न : कल्याण ते अंबरनाथ मेगाब्लॉकच्या दरम्यान केडीएमसीतर्फे रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास कल्याण-बदलापूर अशी पहिली बस सोडण्यात आली. तर, दुपारी ४ वाजता शेवटची बस सोडण्यात आली. मेगाब्लॉकदरम्यान उपक्रमामार्फत पुरवण्यात आलेल्या ५० फेऱ्यांद्वारे सुमारे पाच हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे केडीएमटीला सुमारे ९० हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

Web Title: Rail megablocks to change girder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.