... हा तर धार्मिक स्वातंत्र्यावर घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 01:35 AM2019-05-02T01:35:50+5:302019-05-02T06:21:27+5:30

बुरखाबंदी : शिवसेनेच्या मागणीवर मुंब्य्रातील मुस्लिम महिला संतप्त

... put it on religious freedom! | ... हा तर धार्मिक स्वातंत्र्यावर घाला!

... हा तर धार्मिक स्वातंत्र्यावर घाला!

Next

कुमार बडदे

मुंब्रा : शिवसेनेने केलेल्या बुरखाबंदीच्या मागणीवर मुंब्य्रातील मुस्लिम महिलांनी संताप व्यक्त केला आहे. अशी मागणी करणे, म्हणजे मुस्लिम धर्मीयांच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ असून, प्रत्येक वेळी मुस्लिम धर्मीयांना वेगवेगळ्या विषयांवरून टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

श्रीलंकेत विविध ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये २५० जणांचा बळी गेला होता. या घटनेची पुनरावृती टाळण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या देशात बुरखा तसेच नकाबसह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बंदी घातली आहे. यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून फ्रान्स, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटननेदेखील असे निर्णय घेतले असल्याचा दावा शिवसेनेच्या मुखपत्रात करण्यात आला आहे. मग, याबाबतीत हिंदुस्थान मागे का, असा सवाल करून रावणाच्या लंकेत घडले; रामाच्या अयोध्येत कधी घडणार, असा प्रश्न करून भारतातही बुरखाबंदीची मागणी करण्यात आली आहे. राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुका सोमवारी संपल्या. त्याच्या दुसºयाच दिवशी करण्यात आलेल्या या मागणीमुळे मुस्लिम धर्मीयांमध्ये खळबळ उडाली असून, या मागणीवर मुस्लिम महिलांनी प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या तीव्र भावना लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या.

बुरखा ही आमची धार्मिक संस्कृती आहे. त्यावर बंदी मुस्लिम महिला कदापि सहन करणार नाहीत. काही जण स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी वेळोवेळी अशा बालिश मागण्या करत असतात. अशा मागण्या करून समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असतो. - फैमिदा खान, गृहिणी

बुरखा ही मुस्लिम धर्मीयांची संस्कृती आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा तो एक भाग आहे. मुस्लिम धर्मीयांनी काय खावे, काय प्यावे तसेच तलाकचा मुद्दा आणि आता बुरख्याचा विषय अशा वेगवेगळ्या मुद्यांवर वेळोवेळी मुस्लिम धर्मीयांना टार्गेट करण्यात येत आहे. मुस्लिम धर्मीयांवर जर बुरखाबंदी लादणार असाल, तर इतर काही समाजांतील महिला मोठ्यांचा आदर राखण्यासाठी चेहऱ्यावर जो घुंघट घेतात, त्यावरही बंदी घालणार का? - आशरीन राऊत, नगरसेविका, ठामपा

बुरखाबंदीची मागणी अतिशय चुकीची आहे. ती कधीही पूर्ण होणार नाही. या मागणीला मुस्लिम महिला भीक घालणार नाहीत. ती जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास अराजकता माजेल. - यास्मिन शेख, शिक्षिका

Web Title: ... put it on religious freedom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.