ठळक मुद्देमंडईचा ताबा घेण्यासाठी पालिकेने भरणा केले सरकारी तिजोरीत 1 कोटी 61 लाखमंडई उभारणीसाठी गेला 12 वर्षाचा काळमहिला बचत गट आणि राज्य सरकारच्या कार्यालयांसाठी फुकटात जागा देण्याचा सपाटा


ठाणे - गावदेवी मंडई ताब्यात घेण्यासाठी सरकारी तिजोरीत १ कोटी ६१ लाखांचा भरणा केल्यानंतर ठाणे महापालिकेने यासाठी ४ कोटी ५८ लाखांचा खर्च करुन मंडईची सुसज्ज इमारत उभारली आहे. यासाठी पालिकेला तब्बल १२ वर्षांचा वनवास सोसावा लागला आहे. असे असतांना आता या इमारतीमधील जागा राज्य सरकारची कार्यालये आणि आपल्या मर्जीतील महिला बचत गटांना देण्याचा सपाटा पालिकेतील एका वरीष्ठ पदाच्या अधिकाºयाने लावल्याची माहिती समोर आली आहे. परंतु यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत असून या अधिकाऱ्याच्या मनमानी कारभार रोखण्यासाठी भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
ठाणे स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर गावदेवी भाजी मंडई आहे. पूर्वी या ठिकाणी राज्य सरकारच्या अखत्यारीतली काही गोदामे होती. पालिकेने सरकारी तिजोरीत १ कोटी ६१ लाख रु पये भरून ती जागा ताब्यात घेतली. त्यासाठी सरकारने पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागली होती. एका अधिकाऱ्याने तर या कामासाठी मंत्रालयात १५० च्या आसपास हेलपाटे घातले होते. दरम्यान या इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी १३ हजार चौरस फुटांचे दोन प्रशस्त हॉल पालिकेला प्राप्त झाले आहेत. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागा निविदा प्रक्रि या राबवून बाजारभावाने दिल्या तर पालिकेच्या तिजोरीत दरमहा लाखो रु पयांचे उत्पन्न पडू शकणार आहे. मात्र, तसे न करता या जागा फूकटात आंदण दिल्या असल्याची बाब समोर आली आहे.
पालिकेने ही इमारत उभारण्यासाठी सव्वा सहा कोटींचा निधी खर्ची केला आहे. त्यानंतरही पहिल्या मजल्यावरील १३ हजार चौरस फुटांपैकी ९ हजार चौरस फूट जागा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कौशल्य विकास परिषदेला देण्यात आली आहे. त्यापोटी पालिकेच्या तिजोरीत एकही पैसा आलेला नाही. या मजल्यावरील उर्वरीत चार हजार चौरस फुट जागेवरही याच संस्थेने आपल्या ताब्यात घेतली आहे. दुसºया मजल्यावरील ३ हजार ५०० चौरस फुटांची जागा उपनिबंधक कार्यालयासाठी कोणत्याही मोबदल्याशिवाय देण्यात आली आहे. उर्वरीत साडे नऊ हजार चौरस फुटांपैकी साडे तीन हजार चौरस फूट जागेसाठी पालिकेने निविदा काढली होती. त्यासाठी तीन निवादा प्राप्त झाल्या होत्या. पालिकेला वार्षिक २० लाख रु पये भाडे देण्याची तयारी दाखिवणाऱ्या कॉम्प्युटेक कंपनीची निविदा मंजूर करून तसा करारही पालिकेने केला. मात्र, आता या कंपनीला दिलेली जागा काढून घेत ९ हजार चौरस फूट जागा एका महिला बतच गट आणि शेतकरी बाजारासाठी देण्याचा घाट पालिकेतील एका अधिकाºयाने घातल्याचे बोलले जात आहे.
लोकमान्य नगर येथे पालिकेने सुमारे साडे तीन कोटी रु पय खर्च करून महिला बचत गटांसाठी इमारत उभारलेली आहे. ती हक्काची जागा असताना गावदेवी मैदानातील जागा बचत गटांना देण्याचा हट्ट कशासाठी असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कोणताही मोबदला न घेता मार्केटमधील जागा दिल्याने पालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे याबाबीकडे पालिका आयुक्त लक्ष घालणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.