डोंबिवलीत रंगले महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 01:04 AM2019-07-23T01:04:45+5:302019-07-23T01:04:51+5:30

ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले यांना वाहिली आदरांजली : स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये झाला कार्यक्रम

A poetry gathering of thoughts of the great people of Rangale in Dombivali | डोंबिवलीत रंगले महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन

डोंबिवलीत रंगले महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन

Next

डोंबिवली : महामानवांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्यांनी केलेल्या जनजागृतीचे महत्त्व नागरिकांना कळावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून शनिवारी सायंकाळी येथील पश्चिमेकडील स.है. जोंधळे हायस्कूलमध्ये विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महामानवांच्या विचारांचे कविसंमेलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महामानवांच्या विचारधारेवर आधारित, स्वरचित कविता यावेळी सादर करण्यात आल्या. या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत दिवंगत राजा ढाले यांना कवींच्या वतीने आदरांजलीही वाहण्यात आली.

चैतन्य सुखदेव सोनावणे फाउंडेशन ठाणे, बहुउद्देशीय मानवसेवा सामाजिक संस्था भिवंडी, कवी कट्टा ग्रुप कल्याण-मुंबई, माझी आई प्रतिष्ठान सामाजिक संस्था भिवंडी, स.सु.स. आणि लाख मोलाच्या कविता काव्यमंच कल्याण, विकास प्रबोधिनी संस्था भांडुप, मुंबई, रामवेणू काव्य मंच दिवा यांच्या संयुक्त विद्यमाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

संमेलनाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे होते, तर संमेलनाचे उद्घाटन साहित्यिक जगदेव भटू, नवनाथ रणखांबे, विजयकुमार भोईर, सुरेखा गायकवाड, कवी दीप यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात नवनाथ रणखांबे, जगदेव भटू, विजयकुमार भोईर, मिलिंद जाधव, कवी दीप, अशोक कांबळे, विष्णू खांजोडे, सुरेखा गायकवाड, मनीषा मेश्राम, प्रतिभा सोनावणे, वृषाली माने, उदय क्षीरसागर, चेतन जाधव, संघरत्न घनघाव, ज्योती गोळे, गणेश गावखडकर, कामिनी धनगर, शंकर घोगरे या कवींनी कविता सादर केल्या.
अ‍ॅड. प्रज्ञेश सोनावणे यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. बलुतेदार-अलुतेदार, अठरापगड जातींना जोडून आणि सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. हिंदू-मुस्लिम, ब्राह्मणेतर वर्गाला सोबत घेऊन प्रत्येक सैनिकांना मावळा ही पदवी दिली. त्यामुळे महाराष्ट्र उभा राहिला. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे महात्मा जोतिराव फुलेंनी भारतातील जातीय व्यवस्थेला छेद देऊन समस्त स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुले केली आणि आज भारतीय महिला स्वाभिमानाने जगत आहे.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार कवी दीप यांनी मानले.

सर्व जातींना जोडणे आवश्यक - अ‍ॅड़ सोनावणे
फुले आणि आंबेडकरांना जोडणारा दुवा राजर्षी शाहू महाराज होते. स्वत:च्या राज्यात ५० टक्के बहुजन समाजाला आरक्षणाची तरतूद करणारे खरे समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज होते. आरक्षणाला संविधानिक दर्जा देऊन संपूर्ण बहुजन समाजाला एक प्रतिनिधित्व बहाल केले. देशात क्र ांती घडवून आणणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. या सर्वच महामानवांनी केलेला प्रचंड त्याग आणि त्यांच्या संघर्षाला जगात कुठेच तोड नाही. मानवमुक्तीच्या लढ्यातील प्रणेते आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन आज आम्ही सर्व जातीजातींना जोडून महामानवांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहोत. जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी, सर्व जातींना जोडणे आवश्यक आहे, याकडे सोनावणे यांनी लक्ष वेधले.

Web Title: A poetry gathering of thoughts of the great people of Rangale in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.