सेंट मेरी शाळेसमोर पालकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:42 PM2019-06-13T23:42:09+5:302019-06-13T23:42:37+5:30

फीवाढीचा निषेध : पोलिसांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा नाही, शाळेचा लेखी आश्वासनास नकार

Parents' Stance Movement in front of St. Mary's School | सेंट मेरी शाळेसमोर पालकांचे ठिय्या आंदोलन

सेंट मेरी शाळेसमोर पालकांचे ठिय्या आंदोलन

googlenewsNext

कल्याण : फीवाढीच्या निषेधार्थ पूर्वेतील सेंट मेरी शाळेसमोर गुरुवारी पालकांनी सकाळी ६.३० ते सायंकाळी ५ पर्यंत ठिय्या धरत फीवाढ मागे घेण्याची मागणी केली. कल्याण परिमंडळचे ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावर नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पालकांच्या शिष्टमंडळाने लेखी आश्वासन देण्याची मागणी शाळा प्रशासनाकडे केली. मात्र, शाळा प्रशासनाने त्यास नकार दिल्याने पालकांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरूच ठेवले.

सेंट मेरी शाळा प्रशासनाने यंदा १५ टक्के फीवाढ केली आहे. तसेच मागील वर्षापर्यंत राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवला जात असतानाही शाळेने यंदा आठवीपर्यंतच्या इयत्तांना दिल्ली बोर्डाची पुस्तके देत शिकवण्यास सुरु वात केली आहे. त्यामुळे पालकांनी फीवाढीला विरोध करतानाच दिल्ली बोर्डाची पुस्तके परवडत नसल्याचे म्हटले आहे. ही पुस्तके जबरदस्तीने आमच्या पाल्यांवर लादू नयेत. तसेच शाळा प्रशासनाकडे फीवाढ कमी करण्याची मागणी केली होती. मात्र शाळा प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने संतापलेल्या पालकांनी गुरुवारी शाळेसमोर ठिय्या धरला. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थाळी धाव मध्यस्तीचा प्रयत्न केला. यावेळी उपायुक्त पानसरे, गायकवाड, पालकांचे शिष्टमंडळ आणि शाळा प्रशासन यांच्यात चार तास चर्चा झाली. त्यानंतर पानसरे यांच्या कार्यालयातही चर्चा झाली. यावेळी शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाकडे लेखी आश्वासनाची मागणी केली. मात्र शाळा प्रशासनाने नकार दिल्याने संतापलेल्या शिष्टमंडळाने बैठकीतून काढता पाय घेतला. दरम्यान, फीवाढीबाबत शाळेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता शाळेकडून प्रतिसाद मिळाला नाही.

तणावाचे वातावरण
फीवाढीविरोधात १० तास आंदोलन करूनही शाळा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर संतप्त पालक, नगरसेवक महेश गायकवाड, राजवांती मढवी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शाळेसमोरच उपोषण छेडले. सकाळपासून सुरू असलेल्या या गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Parents' Stance Movement in front of St. Mary's School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.