अंबरनाथमध्ये १६ विद्यार्थ्यांमागे केवळ एक शिक्षकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 02:52 AM2019-04-21T02:52:04+5:302019-04-21T02:52:32+5:30

अंबरनाथ नगर परिषदेच्या १९ शाळेत एक हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील बहुभाषिक शाळेत विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे.

Only one teacher after 16 students in Ambernath | अंबरनाथमध्ये १६ विद्यार्थ्यांमागे केवळ एक शिक्षकच

अंबरनाथमध्ये १६ विद्यार्थ्यांमागे केवळ एक शिक्षकच

Next

- पंकज पाटील

अंबरनाथ नगर परिषदेच्या १९ शाळेत एक हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील बहुभाषिक शाळेत विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. शहरातील इतर शाळांमध्ये नावापुरते विद्यार्थी राहिले आहेत. लोकलबोर्ड शाळा, मोरीवली माध्यमिक शाळा, वडवली शाळा वगळता इतर शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ही अत्यल्प राहिली आहे. अंबरनाथ पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक, गणवेश आणि पोषण आहार वेळेवर मिळत असला तरी या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल दिसत नाही. पालिकेतील दोन शाळांमध्ये इ-लर्निंग यंत्रणा कार्यान्वित केलेली असतांनाही मोजक्याच विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. पालिका क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा देखील पालिकेकडे वर्ग कराव्या, अशी मागणी शिक्षक करीत आहेत. मात्र त्यांची मागणी ही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना बदली यंत्रणेतून मुक्तता मिळावी यासाठी होत आहे. त्यामुळे पालिका जिल्हा परिषदेच्या शाळा ताब्यात घेण्याकरिता पुढाकार घेतांना दिसत नाही. १९ शाळांची अवस्था ही अत्यंत बिकट आहे. या शाळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम सातत्याने केले जाते. त्यासाठी निधी खर्च केला जात आहे. प्रत्यक्षात शाळांची देखरेख होत नाही. शाळा आजही कोंदट वातावरणात असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शाळांची परिस्थिती सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या वाढत नाही.

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीत पालिकेच्या १७ शाळा आहेत. या शाळा जिल्हा परिषदेकडून पालिकेने ताब्यात घेतल्या होत्या. त्या ताब्यात घेण्यावरुन काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. मात्र पालिकेने या सर्व शाळा ताब्यात घेऊन काम सुरु केले होते. शाळा ताब्यात घेतल्यावर अपेक्षित प्रतिसाद पालिकेला लाभला नव्हता. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ही घटत होती. त्यामुळे पालिकेच्या शाळांकडे पुन्हा दुर्लक्ष झाले होते. गेल्या तीन ते चार वर्षात पालिकेने विलास जडे या अधिकाऱ्याची नेमणूक करुन शाळेत परिवर्तन घडवण्याचे काम केले. शाळेतील अभ्यासक्रमासोबत विविध उपक्रम राबवले गेल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गणित, इंग्रजी आणि भाषेसाठी स्वतंत्र उपक्रम आणि मार्गदर्शन शिबिर घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम झाला आहे. पालिकेच्या शाळांची ढासाळलेली स्थिती सुधारण्याचे काम पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत झाले आहे.

अंबरनाथ नगर परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे. पालिकेच्या १९ शाळा असून त्या शाळेत शिकवण्यासाठी ९६ शिक्षक आहेत. मात्र, एवढी शिक्षकसंख्या असतानाही विद्यार्थ्यांची संख्या मात्र सातत्याने घटताना दिसत आहे. पालिकेमार्फत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी खास उपक्रम हाती घेतले नाहीत. त्यामुळे सर्वांचाच कल हा पालिका शाळा सोडून खाजगी शाळेकडे वाढत आहे

Web Title: Only one teacher after 16 students in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.