केडीएमटीला दिवसाला एक लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 03:38 AM2018-12-26T03:38:39+5:302018-12-26T03:38:56+5:30

आर्थिक संकटात सापडलेल्या केडीएमटीला कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची तीव्र झळ बसत आहे.

 One lac a day loss to KDMT | केडीएमटीला दिवसाला एक लाखाचे नुकसान

केडीएमटीला दिवसाला एक लाखाचे नुकसान

Next

- मुरलीधर भवार

कल्याण : आर्थिक संकटात सापडलेल्या केडीएमटीला कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची तीव्र झळ बसत आहे. जुलैपासून परिवहनला दररोज एक लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्यामुळे या सेवेची आर्थिक घडी बसण्याऐवजी आणखीच विस्कटत चालली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी केडीएमटी प्रशासनाने रस्ते सुरक्षा समितीला साकडे घातले आहे.
मुंब्रा बायपास रस्त्याची दुरुस्ती सुरू असताना कल्याण-डोंबिवलीतील वाहतुकीवर त्याचा ताण वाढला होता. १० सप्टेंबरला हा रस्ता पुन्हा सुरू झाला. त्यानंतर वाहतूक कोंडीतून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची सुटका होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, त्यानंतर कल्याणचा जुना पत्री पूल रेल्वे प्रशासनाने पाडल्याने या पुलाला समांतर असलेल्या नव्या पुलावरून वाहनांची ये-जा सुरू आहे. हा पूल अरुंद असल्यामुळे याठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. शीळच्या दिशेने पार मेट्रो मॉलपर्यंत वाहनांची रांग लागत असून कल्याणच्या दिशेने बैल बाजारपर्यंत वाहतूक कोंडी होती. या वाहतूक कोंडीमुळे कल्याण-पनवेलच्या बसफेºयांवर परिमाण होत आहे. तसेच नवी मुंबईच्या बस फेºयांना त्याचा फटका बसत असून पनवेलच्या चार फेºयांपैकी एक फेरी कमी होत आहे.
कल्याण-बदलापूर मार्गावरील वालधुनी पूल, कल्याण-मुरबाड रोडवर शहाड पूल, कल्याण-भिवंडी मार्गावरील खाडी पुलावर वाहतूक कोंडी होत असून बसफेºया कमी होत आहेत. त्यामुळे परिवहनचे दिवसाचे उत्पन्न एक लाखाने कमी होऊ न चार लाख २५ हजार रुपयांवर घसरले आहे. जुलैपासून आतापर्यंत केडीएमटीला एक कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीकडे साकडे घातले होते. तसेच कल्याणचे आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्यासह डोंबिवलीच्या वाहतूक पोलीस निरीक्षकांपुढेही हा विषय मांडण्यात आला होता. कल्याणच्या उड्डाण पुलावरही वाहतूक कोंडी होत असून डोंबिवलीतील अरुंद रस्त्यावर रिक्षाचालकांचे अतिक्रमण होत आहे. तेथे बस वळविताना चालकाला कसरत करावी लागते. परिवहनसोबत आरटीओ व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस लवकर बैठक घेणार आहेत, अशी माहिती परिवहनचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली.

निविदेला प्रतिसाद नाही

सध्या परिवहनकडे चालक-वाहक नसल्याने केवळ ७० बस रस्त्यावर धावत आहेत. परिवहनच्या ताफ्यातील जादा बस रस्त्यावर उतरविण्यासाठी व त्यातून उत्पन्नवाढीसाठी ७५ वाहक व १०० चालक भरतीसाठी निविदा मागविली होती. त्यासाठी आतापर्यंत सहा वेळा निविदा मागवून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.देखभाल-दुरुस्तीची निविदा काढून कंत्राटदाराने चालक-वाहक पुरविण्यासंदर्भात परिवहन व्यवस्थापनाचा विचारविनिमय सुरू आहे.

नोव्हेंबरचा पगार मिळणार :परिवहनला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्यामुळे चालक-वाहकांचे महिन्याचे पगार थकतात. नोव्हेंबरच्या पगाराची रक्कम महापालिकेने दिली असून दीड कोटीचा धनादेश परिवहनला मिळाला आहे. त्यातून लवकर कामगारांचे पगार केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title:  One lac a day loss to KDMT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.