काम नाही अन् राहायला घर नाही, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 06:44 AM2018-04-03T06:44:57+5:302018-04-03T06:44:57+5:30

  स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या लहानग्या बहिणीला बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सहीसलामत वाचवणाऱ्या हाली बरफ या मुलीला भारत सरकारने २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवले.

 No work, no home to live, National Bravery Award winner Halley Barf's status | काम नाही अन् राहायला घर नाही, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची अवस्था

काम नाही अन् राहायला घर नाही, राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफची अवस्था

googlenewsNext

- मनोहर पाटोळे  
आसनगाव -  स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपल्या लहानग्या बहिणीला बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सहीसलामत वाचवणाऱ्या हाली बरफ या मुलीला भारत सरकारने २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवले. मात्र, त्यानंतर महाराष्टÑ शासनाच्या तसेच आदिवासी विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रणरागिणीला सध्या स्थलांतरिताचे जीवन जगावे लागते आहे. ठोस रोजगार नाही अन् राहायला घर नाही, अशीच तिची सध्या परवड सुरू आहे.
मूळची तानसा अभयारण्याच्या क्षेत्रातील नांदगाव येथील रहिवासी असलेली हाली ही सध्या रातांधळे येथील आदिवासी वस्तीत मोडक्यातोडक्या झोपडीत राहते आहे. राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या शहापूर प्रकल्पाने या बालशौर्य विजेतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आदिवासी विकास विभाग तसेच ठाणे जिल्हा परिषदेकडे घरकुलाच्या असंख्य योजना असून त्यातील एकाही योजनेतून हाली बरफ हिला घरकुल दिलेले नाही. धक्कादायक म्हणजे महसूल खात्याने तिला साधी शिधापत्रिकादेखील अद्याप दिलेली नाही. स्थानिक ग्रामपंचायतीनेदेखील तिच्या राष्ट्रीयस्तरावरील या शौर्य पुरस्काराची हवी तशी दखलच घेतलेली नाही. पती आणि दोन मुलांसह हाली सध्या अत्यंत हलाखीचे जीवन जगते आहे. वेळप्रसंगी या शौर्यविजेतीला वीटभट्टीवर मजुरीदेखील करावी लागते आहे. इतकेच नव्हे तर उपासमारीलाही सामोरे जावे लागते आहे. शासन योजनांपासून दुर्लक्षित राहिलेल्या धाडसी हालीच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाच्या झोपी गेलेल्या आदिवासी विकास खात्याला आणि अन्य प्राधिकरणाला कधी जाग येईल, हा मुख्य प्रश्न आहे.

चौथीच्या पुस्तकात धडा : शौर्यविजेत्या शहापूरच्या हाली बरफचा आदर्श शालेय वयातच राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये पेरला जावा, म्हणून इयत्ता चौथीच्या अभ्यासात ‘धाडसी हाली’, हा पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. शिक्षण खात्याच्या बालभारतीच्या पाठातील धाडसी हालीच्या आयुष्याची प्रत्यक्षात मात्र अठराविश्वे दारिद्र्याने परवड केली आहे.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफ यांच्या घरकुलाचा प्रस्ताव आम्हास प्राप्त झाल्यास सकारात्मक विचार होऊन वरिष्ठ पातळीवरून ते तत्काळ मंजूर होऊन त्यांना देण्यात येईल.
- अरुणकुमार जाधव, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी

पुरस्कार मिळाल्यानंतर सुरुवातीला सर्वांनी दखल घेतली. बरोरासाहेबांनी आमचा सन्मान केला. मात्र, त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. रेशनिंगकार्ड नसल्याने धान्य मिळत नाही. मी आणि माझा नवरा मोलमजुरी करून कुटुंब चालवतो. - हाली बरफ,
राष्ट्रीय पुरस्कार विजेती

Web Title:  No work, no home to live, National Bravery Award winner Halley Barf's status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.