पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 9, 2024 07:31 PM2024-01-09T19:31:58+5:302024-01-09T19:32:14+5:30

पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

New changes in journalism must be understood - Collector Ashok Shingare | पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

पत्रकारितेतील नवनवे बदल समजणे आवश्यक - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे : पत्रकारिता हे संवादाचे दुधारी माध्यम आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या जातात. त्याचप्रमाणे जनतेच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम देखील पत्रकारितेच्या माध्यमातून केले जाते. पत्रकारांनी अधिकाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने भेटून विकास विषयक संवाद साधणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील नवनवे बदल समजून घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी ठाणे महानगरपालिका, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे “विकास पत्रकारिता: शासन संवाद” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर, कै. नरेंद्र बल्लाळ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. 

ठाणे महानगरपालिका आयुक्त आभिजित बांगर म्हणाले की, शासन सेवेत पत्रकारांची महत्वाची भूमिका असते. शासनाने केलेल्या विकास कामांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी पत्रकार हे खात्रीचे माध्यम आहेत. पत्रकारांचा प्रतिसाद हा नि:ष्पक्ष असतो. पत्रकारिता करताना त्या पत्रकारितेतून शहराच्या विकासासाठी काही योगदान मिळते की नाही याची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असते. बातमी सकारात्मक किंवा नकारात्मक असल्यापेक्षा त्या बातमीची सत्यता जपणे महत्वाचे आहे. पत्रकारिता ही अशा पद्धतीची असावी ज्यातून सर्व क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधता आला पाहिजे. कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी प्रास्ताविक केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. संजय तांबट यांनी “समकालीन माध्यम आणि विकास पत्रकारिता” या विषयावर तसेच, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे माध्यम तज्ञ प्रा. श्रीकांत सोनावणे यांनी “डिजिटल युगात मुद्रित माध्यमांचे स्थान” या विषयावर मार्गदर्शन केले.सहायक संचालक संजीवनी जाधव यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले. या कार्यशाळेस राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य संजय पितळे, कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य मनोज जालनावाला, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे व इतर पत्रकार उपस्थित होते.

Web Title: New changes in journalism must be understood - Collector Ashok Shingare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे