राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला यांनाही उमेदवारीचे गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:00 AM2018-05-26T03:00:54+5:302018-05-26T03:00:54+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघ : शिवसेनेतून संजय मोरे यांचे नाव नक्की; विनय नातू यांचा पक्षबदल अनिश्चित

Najib Mullah by NCP also carrots of the candidacy | राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला यांनाही उमेदवारीचे गाजर

राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला यांनाही उमेदवारीचे गाजर

Next

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या २५ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून नजीब मुल्ला यांना संधी द्यावी, असे सुचवून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मुल्ला यांनी पक्षावर नाराज नसल्याचे स्वत:हून स्पष्ट केले असले, तरी त्यांना आमदारकीसाठी संधी देत असल्याचे दाखवून देण्यासाठी ठाण्यातून त्यांचे नाव पुढे करण्यात आल्याचे पक्षातील काही नेत्यांनी स्पष्ट केले. याचवेळी शिवसेनेने संजय मोरे यांचे नाव जवळजवळ निश्चित केले आहे.
असे असले तरी बिल्डर परमार यांच्या खटल्यात त्यांचे नाव असल्याने पदवीधर मतदारांसमोर तोच मुद्दा प्रचारात आला तर अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल का, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीच्या तोंडावर राष्टÑवादीचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपात उडी घेतल्याने त्यांच्याविरोधात लढण्यासाठी पक्षात वेगवेगळ््या नावांची चर्चा सुरू आहे. मुल्ला यांनीही ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी मतदारनोंदणीच्या कामाला सुरुवात केली.
मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळेस डावखरे यांना २७ हजार, तर केळकर यांना २२ हजार मते पडली होती. तर, मनसे पुरस्कृत निलेश चव्हाण यांना तीन हजार मते मिळाली होती. त्यानंतर, चव्हाण यांनी मनसेतून भाजपामध्ये प्रवेश करून पुन्हा कोकण पदवीधरसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांनाही पक्षाने आश्वासन दिल्याने त्यांनीही मतदारनोंदणी केली होती. परंतु, ऐनवेळेस निरंजन डावखरे यांनी हाती कमळ घेतल्याने चव्हाण आणि लेले यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. त्यामुळे लेले प्रचंड नाराज आहेत. या दोघांच्या नाराजीचा परिणाम या निवडणुकीत भाजपाला सोसावा लागण्याची चिन्हे आहेत. त्यावर कसा तोडगा काढला जातो, त्यावर भाजपाच्या मतदारनोंदणीतून डावखरे यांना पक्षाची किती पारंपरिक मते पडतात ते स्पष्ट होईल. त्यासाठी या मतदारसंघातील पूर्वीचे आमदार संजय केळकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यातही संघट परिवारातील संघटना, त्यांच्या विद्यार्थी संघटनांना आदेश गेल्यास तेही मतदार नोंदणीत हिरीरीने उतरू शकतात.
राष्टÑवादीने काँग्रेसने शेकाप, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी आदींना सोबत घेत चित्रलेखा पाटील यांच्या नावाबाबत आधीच चर्चा सुरू केली आहे. त्यांनीही पदवीधर मतदार डोळ््यासमोर ठेवून याआधीच काही कार्यक्रम हाती घेतले होते. परंतु, ठाण्यातून नजीब मुल्ला यांना संधी दिल्यास डावखरे यांच्या मतांत फाटाफूट करता येईल, असा युक्तिवाद करून त्यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. मुल्ला हे कोकण मर्चंट बँकेचे चेअरमन असल्याने त्यांचा चांगला संपर्क आहे. हा मुद्दाही पुढे करण्यात आला आहे. मुल्ला यांनी बुधवारपासून मतदारनोंदणी सुरू केली आहे. बँकेच्या शाखांच्या माध्यमातून त्यांनी कोकणात मेसेज टाकून तेथील कार्यकर्त्यांना तयारी करण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेनेदेखील रत्नागिरीतील भाजपाचे पदाधिकारी विनय नातू यांना पक्षबदल करून लढण्यासाठी गळ घातल्याची चर्चा असली, तरी असा प्रयत्न यापूर्वीही झाल्याचे सांगण्यात येते. त्यातही नातू यांचा उपयोग फक्त रत्नागिरीपुरता होईल, असा अंदाज आल्याने संजय मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जाते. मोरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम करताना पदवीधर मतदारांच्या नोंदणीवर लक्ष दिले आहे. त्यातही त्यांना युवा सेनेने चांगली मदत केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यंदा प्रथमच शिवसेनेही या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे पाहायला मिळेल.
सिंधुदुर्गात नारायण राणे हे डावखरे यांना मदत करतात का, यावर तेथील गणिते अवलंबून आहेत. दिवंगत वसंत डावखरे यांच्याशी असलेला संपर्क आणि सध्या भाजपासोबत असल्याने राणे निरंजन यांना मदत करतील असे मानले जाते. पण राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, काँग्रेस, बविआ यांनी संयुक्तपणे उमेदवार दिल्यास आणि त्यांनी मदतीसाठी गळ घातल्यास त्यांचा आग्रह मोडणे राणे यांना कठीण जाईल, असे मानले जाते.

नवी मुंबई ठरणार निर्णायक
राष्ट्रवादीने जर मुल्ला यांच्या नावाचा विचार केला आणि त्यांना तिकीट दिले, तर त्यांच्या मतांत नवी मुंबईची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मुल्ला हे जितेंद्र आव्हाड यांचे खंदे समर्थक मानले जातात. पण आव्हाड आणि नाईक ही राष्टÑवादीची दोन स्वतंत्र टोके मानली जातात. त्यामुळे नाईक कुटुंबीय मुल्ला यांना सहकार्य करणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Najib Mullah by NCP also carrots of the candidacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.