अनारक्षित जागेवर पालिकेचे बॉलीवूड पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:52 AM2018-07-21T02:52:53+5:302018-07-21T02:53:04+5:30

लोकमान्यनगर भागात अनारक्षित जागेत बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा घाट घातल्याचा प्रकार शुक्रवारच्या महासभेत समोर आला.

 Municipal's Bollywood Park at Unreserved Places | अनारक्षित जागेवर पालिकेचे बॉलीवूड पार्क

अनारक्षित जागेवर पालिकेचे बॉलीवूड पार्क

Next

ठाणे : लोकमान्यनगर भागात अनारक्षित जागेत बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा घाट घातल्याचा प्रकार शुक्रवारच्या महासभेत समोर आला. उद्यानासाठी भूखंड आरक्षित नसताना त्या जागेवर या थीम पार्कची निविदा काढून ठेकेदाराला तब्बल सात कोटींचे बिलदेखील दिल्याचे उघड झाले. यामुळे यावरून महासभेत चांगलाच गदारोळ झाला. अखेर, या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी याची चौकशी लावली.
शिवसेनेच्या नगरसेविका आशा डोंगरे यांनी प्रश्नोत्तरांच्या तासात हा प्रश्न केला होता. याच अनुषंगाने इतर सदस्यांनी पालिकेचा घोटाळा उघड केला. लोकमान्यनगर भागात बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या प्रस्तावास २० फेबुवारी २०१४ रोजी सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती. या उद्यानातील साहित्य तयार करण्याचे काम कर्जतमध्ये सुरू असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, याठिकाणी अजूनही काहीच काम झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराला सात कोटी रुपयांचे बिल कसे देण्यात आले, असा सवाल त्यांनी केला. याच अनुषंगाने उद्यानासाठी जागा आरक्षित नसतानाही त्याठिकाणी बॉलीवूड थीम पार्क उभारणीसाठी निविदा कशा काढल्या, असे भाजपा गटनेते मिलिंद पाटणकर यांनी विचारले.
बॉलीवूड थीम पार्क उभारण्यात येत असलेली जागा अंतर्गत वाहतुकीसाठी आरक्षित आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चुकीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे सादर करून लोकप्रतिनिधींची दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला. सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीदेखील पालिकेने केलेले काम चुकीचे असल्याचे सांगून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
उद्यान विभागाने तयार केलेल्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने दोनदा मान्यता दिली असून त्यात खर्चाच्या रकमेसाठी मान्यता दिली आहे. त्याठिकाणी असलेल्या उद्यानाचे अस्तित्व टिकवण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तसेच अंतर्गत वाहतुकीचे काम सुरू झाले, तर या उद्यानातील साहित्य दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येऊ शकते, असा विचार त्यावेळेस केल्याची माहिती कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांनी दिली.
>झोलची चौकशी करणार समिती
विविध पर्याय दाखवून शेवटी पालिकेने पार्कसाठी आरक्षित नसलेल्या जागेसाठी हा निधी खर्च केल्याचा आरोप करून हा एक प्रकारे झोलच असल्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. मात्र, जागा ताब्यात नसतानाही २० कोटी रुपयांच्या निविदा काढल्या कशा, असा मुद्दा उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरल्याने अखेर याप्रकरणी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येऊन त्यात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सभागृह नेते नरेश म्हस्के आणि गटनेते यांचा समावेश करून ही समिती या प्रकरणाची चौकशी करेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.
>म्हणून महापालिकेने केला खर्च
सुरुवातीला हे काम पीपीपी तत्त्वावर करण्याचे निश्चित केले होते. परंतु, त्याला प्रतिसाद न आल्याने पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करून तीन पर्याय दिले. अमृत योजना, ठेकेदाराला मोबदला देऊन त्याच्या खर्चातून आणि महापालिका. या तिघांपैकी एका पर्यायातून पैसे खर्च करण्यात येणार होते. मात्र, इतर दोन्ही पर्यायांतून निधी उपलब्ध होत नसल्यामुळे महापालिकेच्या खर्चातून पूर्ण खर्च करण्यात येणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

Web Title:  Municipal's Bollywood Park at Unreserved Places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे