Mumbai Train Update : दिवा, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 09:53 AM2019-07-03T09:53:18+5:302019-07-03T09:57:14+5:30

आज कामकाजाचा दिवस असल्याने व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.

Mumbai Rain Update A huge crowd of passengers at Diva, Dombivli station | Mumbai Train Update : दिवा, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी

Mumbai Train Update : दिवा, डोंबिवली स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी

Next
ठळक मुद्देआज कामकाजाचा दिवस असल्याने व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.रेल्वेने कमी फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून महिला, विद्यार्थी एकातासापेक्षा अधिक वेळ झाला असला तरी स्थानकात अडकून पडले आहेत.

ठाणे - हवामान खात्याने जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा दिल्याने मध्य रेल्वेने बुधवारी (3 जुलै) रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे कमी लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आज कामकाजाचा दिवस असल्याने व लोकल रविवारच्या वेळापत्रकानुसार धावत असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवाशांची जादा गर्दी कमी लोकल फेऱ्यांमध्ये सामावू शकत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेने कमी फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून महिला, विद्यार्थी एकातासापेक्षा अधिक वेळ झाला असला तरी स्थानकात अडकून पडले आहेत.

मध्य रेल्वे दररोज 1774 लोकल फेऱ्या चालवत असते. मध्य रेल्वेने दररोज जवळपास 43 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. रविवारी मेगाब्लॉक असल्याने तसेच सार्वजनिक सुट्टी असल्याने मध्य रेल्वे केवळ 1424 फेऱ्या चालवते म्हणजे तब्बल 350 फेऱ्या कमी चालवते. आज केवळ 1424 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. परिस्थिती पाहून स्पेशल फेऱ्याही चालवण्यात येणार असल्याचे रेल्वेने म्हटले असले तरी त्यातून रोजच्या एवढय़ा मोठ्या गर्दीला सामावून घेणे डोईजड जाणार असल्याचे म्हटले जात आहे. कल्याण स्थानकातून 8 वाजता निघणारी लेडीज स्पेशल देखील रद्द करण्यात आल्याने महिला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. 

रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक 

सलग चार दिवस पावसाचा जोर कायम राहिल्याने, उपनगरी रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मंगळवारी (3 जुलै) पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे रेल्वे मार्गावर पाणी साचले होते. त्यामुळेच आज मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक असल्याने कमी लोकल धावणार आहेत. जोरदार पावसाची शक्यता असल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला असून रेल्वेने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. 


मंगळवारी पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत होत्या, तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प झाले होते. सुमारे 1000 हून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. 4.30 वाजता उपनगरी लोकलसेवा सुरू केल्याने तब्बल 16 तासांनी प्रवाशांना दिलासा मिळाला. दुपारच्या सुमारास मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी स्थानकातून चार विशेष लोकल सोडल्या. या लोकल कर्जत, बदलापूर, कल्याण, टिटवाळा या दिशेकडे गेल्या.


आज या मेल, एक्स्प्रेस रद्द

मुंबई-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, पुणे-सोलापूर एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंटरसिटी, पुणे-मुंबई इंटरसिटी, पुणे-मुंबई सिंहगड, मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे प्रगती, पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस, पुणे-पनवेल पॅसेंजर, पनवेल-पुणे पॅसेजर या एक्स्प्रेस बुधवारी रद्द करण्यात आल्या आहेत.


अतिमुसळधारेचा इशारा

3 जुलै : पालघर, ठाणे जिल्हयात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.

3 ते 6 जुलै : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.


पावसाची दहशत; बकालपणानेच गेल्या 48 तासांत 46 बळी

पुण्यात भिंत कोसळून मजूर ठार झाल्याची घटना ताजी असताना तशाच घटनांची मुंबई आणि नाशिकमध्ये पुनरावृत्ती झाली. गेल्या 48 तासांत राज्यातील अशा दुर्घटनांमधील मृतांचा आकडा 46 च्या वर गेला आहे. एकीकडे मुंबई-कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची धुवांधार सुरू असताना मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच आहे. रात्रभर बरसलेल्या पावसात लाखो मुंबईकरांनी जीवाची बाजी लावत प्रवास केला. या सगळ्या प्रलयसदृश स्थितीमध्ये पोलीस, रेल्वे आणि महापालिकेचे कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. त्यांच्या प्रसंगावधानामुळे बहुतांश नागरिक सुखरूप घरी पोहोचू शकले. पण त्या सगळ्या प्रवासात आणि त्यानंतरही वीजपुरवठा खंडित झाल्याने होत असलेल्या मनस्तापाला जबाबदार कोण, असा प्रश्न संतप्तपणे आता विचारला जात आहे.



 

Web Title: Mumbai Rain Update A huge crowd of passengers at Diva, Dombivli station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.