मल्टिप्लेक्सची लूट सुरूच; पॉपकॉर्न १५०, पाण्याची बाटली ६० रु.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 03:25 AM2018-08-03T03:25:58+5:302018-08-03T03:26:07+5:30

मॉलमधील मल्टिप्लेक्सचालकांनी दि. १ आॅगस्टपासून एमआरपीनुसार खाद्यपदार्थांची विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने देऊन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळ्ळ खट्याकचा आदेश देऊनही ठाणे व कल्याणमधील मल्टिप्लेक्सचालकांनी चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री सुरूच ठेवली आहे.

 Multiplex launches loot; Popcorn 150, bottle of water 60 | मल्टिप्लेक्सची लूट सुरूच; पॉपकॉर्न १५०, पाण्याची बाटली ६० रु.

मल्टिप्लेक्सची लूट सुरूच; पॉपकॉर्न १५०, पाण्याची बाटली ६० रु.

Next

ठाणे/कल्याण : मॉलमधील मल्टिप्लेक्सचालकांनी दि. १ आॅगस्टपासून एमआरपीनुसार खाद्यपदार्थांची विक्री करण्याचे आदेश राज्य सरकारने देऊन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खळ्ळ खट्याकचा आदेश देऊनही ठाणे व कल्याणमधील मल्टिप्लेक्सचालकांनी चढ्या दराने खाद्यपदार्थांची विक्री सुरूच ठेवली आहे. पॅकबंद खाद्यपदार्थ नेण्यास कुरकुरत का होईना तयारी दाखवलेल्या चालकांनी घरात बनवलेले पदार्थ नेण्यास मात्र मज्जाव केलेला आहे. सरकारचे आदेश आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, असा सोयीस्कर पवित्रा त्यांनी घेतला आहे.
‘लोकमत’च्या ठाणे व कल्याणमधील प्रतिनिधींनी येथील काही मल्टिप्लेक्सला भेटी दिल्या. तेथील अडेलतट्टू सुरक्षाव्यवस्थेने पत्रकार असल्याची ओळख देऊनही आपल्या बेमूर्वतखोरीचा भंडाफोड होऊ नये, याकरिता सर्वप्रथम मल्टिप्लेक्समध्ये प्रवेशाला विरोध केला. मात्र, त्यानंतरही प्रतिनिधींनी चित्रपटाला आलेल्या दर्शकांना गाठून परिस्थितीचा अचूक वेध घेतला.
महाराष्ट्र चित्रपट अधिनियम १९६६, कलम १२१ नुसार चित्रपटगृहात आणि फूडकोर्टसारख्या ठिकाणी बाहेरील खाद्यपदार्थ किंवा पाणी नेण्यास कोणतीही बंदी नाही. जर कोणी अटकाव करत असेल, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, हे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पावसाळी अधिवेशनात दिले आहे. परंतु, याबाबतचा अध्यादेश मिळाला नसल्याची माहिती कल्याण पूर्वेतील मल्टिप्लेक्सचालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली. मात्र, खाद्यपदार्थांचे दर कमी केल्याचा दावा त्यांनी केला. नेमके किती दर कमी केले, याबाबत विचारणा केली असता काहीही सांगण्यास नकार दिला. वरिष्ठांशी संपर्क साधा, तेच किती दर कमी केले, याची माहिती देतील, असे सांगण्यात आले. सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यात आली असून त्याबाबतचा निर्णय ८ आॅगस्टला होणार असल्याचा दावा मल्टिप्लेक्सचालकांनी केला.
दरम्यान, मॉलमधील फूड कॉर्नरवर चौकशी केली असता मॉलच्या आवारात बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास यापूर्वी मज्जाव होता. परंतु, सरकारचा अध्यादेश व मनसेच्या आंदोलनानंतर बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास मुभा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपटाच्या मध्यंतरावेळी काही दर्शकांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जेमतेम पाचपंचवीस रुपये कमी करून दर कमी केल्याचा देखावा केला आहे. दर कमी करतानाच पॉपकॉर्नची क्वाँटिटी कमी केली असून समोशाचा आकारही कमी केला आहे. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खरेदी केलेले खाद्यपदार्थ मल्टिप्लेक्समध्ये आत नेता येत आहेत. मात्र, घरून आणलेले पदार्थ सुरक्षारक्षक आत नेऊ देत नाहीत.

या मल्टिप्लेक्समधील चित्रपटाच्या तिकिटांचे दर वाढीव असतात. त्यात खाद्यपदार्थांचे दर चढे राहिले, तर लोकांनी करमणुकीकरिता कुठे जायचे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे.
- सागर सावंत, विद्यार्थी

अनेक जुनी चित्रपटगृहे पाडून मल्टिप्लेक्स उभारली आहेत. जुनी चित्रपटगृहे स्वस्तात चित्रपट दाखवत होते. आता मल्टिप्लेक्स या गोंडस नावाखाली लूट सुरू आहे. ती थांबवणे गरजेचे आहे. पॉपकॉर्न, समोसे, कोक याकरिता पाचपट दर आकारणे अन्यायकारक आहे.
- संगीता रिसबूड, नोकरदार

मल्टिप्लेक्समध्ये दर स्वस्त झाले आहेत किंवा कसे, हे तपासून पाहण्याकरिता आम्ही गेले दोन दिवस ठिकठिकाणी पाहणी करत आहोत. मल्टिप्लेक्सचालक जर आम्हाला गंभीरपणे घेणार नसतील, तर खळ्ळ खट्याकला सामोरे जाण्यास तयार राहावे.
- संकेत पाटील, मनसे कार्यकर्ता

मल्टिप्लेकसमध्ये चित्रपट पाहावे, म्हटले तर, खिशाला चाट बसते. या गोष्टीला कुठेतरी आळा बसलाच पाहिजे. मुलांनी मागितलेल्या पॉपकॉर्नची किंमत पाहून छातीत धडकी भरते, तर पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे दर ऐकून घशाला कोरड पडते.
- सुशांत चव्हाण, तरुण

पाकीटबंद पदार्थांना आणण्याची परवानगी मिळाली आहे. पण, येथील दर मात्र अजून अव्वाच्या सव्वाच आहेत. पिण्याच्या पाण्याची बाटली ही अजून ६० रुपयांना घ्यावी लागते. - प्रसाद सुतार, तरुण

१ आॅगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांचे दर कमी होणार होते. पण, अद्यापही पॉपकॉर्न घ्यायचे तर, १५० रुपयांपासूनच सुरुवात होते.
- समिधा यादव, महिला

Web Title:  Multiplex launches loot; Popcorn 150, bottle of water 60

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे