शिवविचारातूनच महाराष्ट्र दुष्काळमुक्त, अमोल कोल्हेंच्या हस्ते महाराष्ट्र शिल्पचे उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 12:20 AM2019-06-10T00:20:20+5:302019-06-10T00:21:04+5:30

अमोल कोल्हे : राज्यातील पहिल्या ‘महाराष्ट्र शिल्प’चे ठाण्यात अनावरण

Maharastra sculptures inauguration of Maharashtra sculptures by Shiv kavane | शिवविचारातूनच महाराष्ट्र दुष्काळमुक्त, अमोल कोल्हेंच्या हस्ते महाराष्ट्र शिल्पचे उद्घाटन

शिवविचारातूनच महाराष्ट्र दुष्काळमुक्त, अमोल कोल्हेंच्या हस्ते महाराष्ट्र शिल्पचे उद्घाटन

googlenewsNext

ठाणे : शिवरायांचे राज्य हे कल्याणकारी राज्य होते. आज जर हाच विचार आताच्या सत्ताधाऱ्यांनी अवलंबला असता, तर महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागला नसता. अजूनही तसे झाल्यास महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते तथा शिरूरचे राष्टÑवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी ठाण्यात केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून मुंब्रा रेतीबंदर चौपाटीवर पारसिक डोंगराच्या पायथ्याला साकारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र चित्रशिल्प’चे अनावरण डॉ. कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जगद्गुरू तुकाराम महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रांनी सजलेला महाराष्ट्र या शिल्पामध्ये दाखवण्यात आला आहे. रेतीबंदरमध्ये साडेतीन किलोमीटर लांबीच्या चौपाटीची निर्मिती करण्यात येत आहे. याचठिकाणी पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दाखवणाºया चित्रशिल्पाची केदार घाटे यांनी निर्मिती केली आहे. त्याच्या अनावरणानंतर खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, हे चित्रशिल्प पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेचा संदेश प्रसारित करणारे आहे. आभूषणे आणि शस्त्रांशिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकारामांकडून स्वराज्य चालवण्याचे धडे घेत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपतींनी जे राज्य स्थापन केले, ते भोसल्यांचे नव्हते. अठरापगड जातींना सामावून घेऊन समता आणि समानतेचे स्वराज्य त्यांनी स्थापन केले होते. महात्मा फुलेंनी त्याच शिवाजी महाराजांची समाधी शोधून समतेच्या विचारांचा प्रचार केला होता. या शिल्पात दोन स्त्रियांना वरचे स्थान दिले आहे.

महिलांच्या सबलीकरणाचा आदर्श साडेतीनशे वर्षांपूर्वी माँ जिजाऊंनीच दिला. सावित्रीबार्इंनी स्त्रीशिक्षणाचा महायज्ञ पेटवला आहे. आज शिवाजी महाराज जन्माला यावेत, अशी अपेक्षा बाळगतो. पण, त्यासाठी आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करण्याची गरज आहे. आव्हाड यांच्या वैचारिकतेला त्यांनी सलाम ठोकला. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेणारी शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारधारा या शिल्पाच्या माध्यमातून साकारली असल्याचे कौतुकोद्गारही त्यांनी काढले. दरम्यान, या चित्रशिल्पातून महाराष्ट्राची विचारधारा मांडण्याचा प्रयत्न केल्याचे आमदार आव्हाड यावेळी म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, ठाणे महापालिकेचे विरोधी
पक्षनेते मिलिंद पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबाजी पाटील, नगरसेवक राजन किणे उपस्थित होते.

सेल्फीसाठी झुंबड...
डॉ. कोल्हे हे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासमवेत आल्यानंतर बराच वेळ चाहत्यांनी त्यांच्यासमवेत उत्स्फूर्तपणे मोबाइलवर सेल्फी काढल्या. तशाच गर्दीत चित्रशिल्प अनावरणाचाही कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम सुरू झाल्यावर एकीकडे आव्हाड या चित्रशिल्पाबाबतची भूमिका मांडत असताना व्यासपीठावर मात्र डॉ. कोल्हे यांच्याभोवती सेल्फीसाठी अनेकांनी गराडा केला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते वाहनात बसेपर्यंत हीच परिस्थिती होती. प्रत्येकवेळी प्रत्येकाशी ते संयमाने बोलत होते. वाहनात बसल्यानंतरही काही चाहत्यांनी आम्ही शिरूर आणि आंबेगाव येथून आल्याचे सांगितल्यानंतर सेल्फीसाठी पुन्हा ते तितक्याच अदबीने खाली उतरले. त्यानंतर, मात्र ते मार्गस्थ झाले.



भर उन्हात कोल्हे यांचे चाहते ताटकळले : ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथील चित्रशिल्पाच्या अनावरणासाठी संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे येत असल्याचे आधीच राष्टÑवादी काँग्रेसने जाहीर केले होते. तसे फलकही बºयाच ठिकाणी लागले होते. त्यामुळे रविवारी सकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी नियोजित वेळेपासून म्हणजे सकाळी १० पासून कार्यकर्ते आणि डॉ. कोल्हे यांचे चाहते जमा झाले होते. प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या ठिकाणी डॉ. कोल्हे यांचे आगमन सव्वा तास उशिराने म्हणजे ११.१५ वाजता झाले. त्यानंतर, अवघ्या काही वेळात कार्यक्रम सुरू झाला. याठिकाणी कोणताही कापडी मंडप किंवा बसण्यासाठी खुर्च्याही नसल्यामुळे या कार्यकर्त्यांना आणि श्रोत्यांना संपूर्ण कार्यक्रम होईपर्यत भरउन्हात ताटकळत उभे राहावे लागल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी काहींनी जवळपासच्या बसथांब्यांचा आणि झाडांचाही आश्रय घेतला होता.
 

Web Title: Maharastra sculptures inauguration of Maharashtra sculptures by Shiv kavane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.