The lavish lava of marriage | लग्नाच्या आमिषाने सव्वा लाखाचा गंडा

ठाणे : वधूवर सूचक संकेतस्थळावरून एका ३४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून सव्वा लाख रुपये उकळणाºया इसिदाहोमेन ख्रिस्टीयन (२३) या नायजेरियन भामट्याला ठाणे पोलिसांनी थेट दिल्ली येथून बुधवारी अटक केली. त्याला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ठाण्याच्या पोखरण रोड क्रमांक-१ येथे राहणाºया या महिलेची इसिदाहोमेन याने ‘जैन मॅट्रोमेनी’ या वधूवर सूचक संकेतस्थळावरून माहिती काढली. त्यानंतर, त्याने आपली आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे भासवून तिला बºयाच भूलथापा देऊन तिला लग्नाची मागणी घातली. एक चांगले स्थळ आल्याचा समज झाल्याने तिनेही त्याला तशी संमती दिली. पण, आधी चांगली ओळख होण्यासाठी ती त्याच्याशी फोन आणि नेटच्या माध्यमातून संपर्कात आली. तिच्याशी चांगल्या प्रकारे मैत्री केल्यानंतर त्याने तिचा विश्वास संपादन केला. हीच संधी साधून त्याने तिला एक गिफ्ट पाठवायचे असल्याचे सांगितले. हे गिफ्ट पार्सलने पाठवायचे असल्यामुळे उत्पादन शुल्क भरावे लागेल, अशी बतावणी करून गिफ्टमध्ये पाउंडच्या स्वरूपात ब्रिटिश चलन पाठवत असल्याचेही त्याने सांगितले. त्याच नावाखाली त्याने सप्टेंबर ते ३० आॅक्टोबर २०१७ या कालावधीत तिच्याकडून आॅनलाइन बँकिंगमार्फत एक लाख २७ हजार ८९९ रुपये इतकी रक्कम घेतली. अर्थात, इतके पैसे घेऊनही तिला कोणत्याही प्रकारचे पार्सल किंवा त्याच्याकडून परकीय चलनही त्याने पाठवले नाही. शिवाय, तिचे पैसे मिळाल्यानंतर त्याने तिच्याशी संपर्कही तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) नुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.