अखेरचे शक्तिप्रदर्शन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 03:42 AM2017-08-19T03:42:19+5:302017-08-19T03:43:05+5:30

पदयात्रा, चौकसभा, घरोघरी जाऊन केलेला प्रचार, त्याला ढोल-ताशांची जोड अशा वातावरणात शुक्रवारी मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीचा प्रचार संपला आणि गेले दहा दिवस तापलेले राजकीय वातावरण शांत झाले.

The last power demonstration! | अखेरचे शक्तिप्रदर्शन!

अखेरचे शक्तिप्रदर्शन!

googlenewsNext

मीरा रोड : पदयात्रा, चौकसभा, घरोघरी जाऊन केलेला प्रचार, त्याला ढोल-ताशांची जोड अशा वातावरणात शुक्रवारी मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीचा प्रचार संपला आणि गेले दहा दिवस तापलेले राजकीय वातावरण शांत झाले. शेवटच्या क्षणापर्यंत शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांनी मतदारांना आवाहन केले. आता रात्रीच्या गुप्त बैठका, छुप्या आवाहनांना जोर चढण्याची शक्यता आहे. रात्र जागवत कार्यकर्त्यांकडून फिल्डिंग लावण्याचे काम सुरू होते.
यावेळी सोशल मीडियावरील आवाहनाला अक्षरश: महापूर आल्याचे दिसून आले. प्रचाराची एलईडी वाहने आणि सायकलींची गर्दी रस्त्या-रस्त्यांवर झाली होती. सोसायट्या, गल्लोगल्ली मतदारांशी संपर्क साधण्याची उमेदवारांची शेवटची धडपड सुरू होती. सायंकाळी प्रचार संपताच रस्ते, गल्लीबोळात सर्वत्र शुकशुकाट झाला. पण छुप्या भेटीगाठी, चुव्वा मीटिंग, कंदिल प्रचाराने शुक्रवार व शनिवारच्या रात्री रंगण्याची शक्यता आहे. त्याचवेळी परस्परांची बदनामी करण्यासाठी वादग्रस्त व आक्षेपार्ह संदेश वाढण्याची शक्यता असल्याने त्यावर निवडणूक आयोगाच्या सेलचे लक्ष्य आहे.
शिवसेना, भाजपा या दोन पक्षातील मीरा-भार्इंदरच्या रणातील युद्ध शुक्रवारी मुंबईतही खेळले गेले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका आणि तिला भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलेल्या उत्तराचीच दिवसभर चर्चा सुरू होती. त्याच्या क्लिप फिरत होत्या. त्यासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बविआ, मनसे, संघर्ष मोर्चा, भारतीय जनसंग्राम परिषद, राष्ट्रीय समाज पक्ष, अपक्ष उमेदवारांनी शुक्रवारी सकाळ पासुनच प्रचाराची राळ उडवून दिली. प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गुरूवारीच सभा घेतल्याने शेवटच्या दिवशी स्थानिक उमेदवारांच्या प्रचारावरच भर होता. प्रत्येक पक्षाची, उमेदवाराची पदयात्रा एकापाठोपाठ जात असल्याने परिसर वेगवेगळ््या रंगाच्या झेंड्यांमुळे रंगीबेरंगी झाले होते.
प्रभागा-प्रभागात उमेदवारांच्या प्रचारफेºया सुरू होत्या. शिवाय घरोघरी पत्रके, आश्वासने, जाहीरनामे वाटत मतदारांना भेटण्याचा उमेदवारांचा प्रयत्न होता. ढोल-ताशांच्या गजरात जोरदार घोषणायुद्ध सुरू होते. याशिवाय एलईडी वाहने, टेम्पो तसेच सायकलींचा माध्यमातून रस्त्यांवर प्रचार रंगला. शिवाय घोषणा देणाºया रिक्षाही फिरत होत्या. या वाहनांची आणि त्यांच्यामुळे खोळंबलेल्या वाहनांची ठिकठिकाणी गर्दी झालेली दिसत होती.
एरव्ही दुपारी प्रचारात घेतला जाणारा ब्रेकही रद्द करण्यात आला. दुपारी थोडेफार खाऊन घेत पुन्हा उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराला लागले. प्रचारफेºया एकमेकांसमोर येताच घोषणांचा जोर वाढत होता. सायंकाळी ५ नंतर प्रचाराची रणधुमाळी जवळपास थंड झाली. उमेदवार व कार्यकर्ते आपापल्या कार्यालयांत दमूनभागून बसले होते. काही जण रिलॅक्स मूडमध्ये, तर काही जण प्रचारातुन सुटलेला प्रभाग, कुठे कोणी जोर लावलाय, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हालचाली आदी जाणून घेण्यात व्यस्त होते.
प्रचार संपल्यानंतर जाहिराती करण्याबाबत आयोगाचे कडक निर्बंध आहेत. त्यामुळे सोशल मीडियातूनही या पद्धतीचा प्रचार केला जाणार नाही, यावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या/पान ४
>गाठीभेटी, आश्वासनांवर भर
प्रचार अधिकृतरित्या संपला असला, तरी उमेदवार व प्रमुख नेते मात्र सोसायटी, चाळ कमिट्यांचे प्रमुख तसेच एकगठ्ठा किंवा हमखास मते मिळवून देणाºया महत्त्वाच्या व्यक्तींची घरे गाठत होते. विविध समाज तसेच जाती-धर्मीयांच्या बैठका घेऊन त्यांना विविध प्रकारची आश्वासने दिली जात होती. अनेक गृहनिर्माण संस्था, चाळींमध्ये उमेदवार व प्रमुख नेत्यांकडून खेळणी बसवणे, बाकडे बसवणे, गणपतीसाठी मंडप, लाद्या व टाइल्स बसवणे, ड्रेनेज लाईन टाकणे, सीसीटीव्ही बसवणे आदी कामे करुन देण्याची आश्वासने दिली जात होती. काही ठिकाणी तर कामेही सुरु झाली होती.
व्हिडीओ क्लिपचा धबधबा : सोशल मीडियावर तर सकाळपासूनच प्रचारफेºया, सभा, भेटीगाठी आदींची छायाचित्रे आणि व्हिडीओ क्लिपचा जणू पूर आला होता. प्रचाराचे लाइव्ह व्हिडीओ एकापाठोपाठ पडत होते. प्रचाराचे मेसेज तसेच विरोधकांबद्दलचा आक्षेपार्ह मजकूर टाकला जात होता. येत्या दोन दिवसांत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु निवडणूक आयोगासह आचारसंहिता पथक, पोलीस आदींनी त्याकडे सर्रास दुर्लक्ष केल्याचा आरोप इतर उमेदवारांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे यातून वादाची ठिणगी पडण्याची भीती आहे.

Web Title: The last power demonstration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.