कल्याणचा नवा पत्रीपूल ८४ मीटरचाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 01:04 AM2018-08-22T01:04:09+5:302018-08-22T01:04:27+5:30

नव्याने आराखडा मागवला, एमएसआरडीसीसमोर नवा पेच, खर्च ३० टक्क्यांनी वाढणार

Kalyan's new cover is 84 meters high | कल्याणचा नवा पत्रीपूल ८४ मीटरचाच हवा

कल्याणचा नवा पत्रीपूल ८४ मीटरचाच हवा

Next

- अनिकेत घमंडी 

डोंबिवली : कल्याणचा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे; परंतु तो पाडल्यानंतरही नव्या पुलाचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेचे तांत्रिक अडथळे पार करताना एमएसआरडीसीच्या नाकीनऊ आले आहेत. आधी ६० आणि नंतर ७२ मीटरचा पूल बांधण्याचा आराखडा एमएसआरडीसीने मध्य रेल्वेकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवला तरच नवा पत्री पूल मंजुरीसाठी विचाराधीन राहील, असे रेल्वे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च जवळपास ३0 टक्क्यांनी वाढणार आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी सांगितले.
आधीच्या नियोजनानुसार पूल बांधण्यासाठी १४ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. रेल्वे प्रशासनाने ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवण्याची सूचना केल्याने, त्यामध्ये सुमारे ५ कोटींची भर पडणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत २० कोटींपर्यंत जाऊ शकते अशी माहिती एमएसआरडीसीच्या सूत्रांनी दिली. सोमवारी मध्यरेल्वेच्या सूचनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार आगामी आठवडाभरात नव्या नियोजनाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे यांनी दिली. ८४ मीटरचा पूल बांधताना एमएसआरडीसीसमोर काही अडचणी आहेत. केवळ पूल बांधणे हेच उद्दिष्ट नसते; सर्व शक्यतांचा विचार करावा लागतो.
पुलाच्या जवळपास १५० ते २५० मीटर परिसरात इमारती नसणे आवश्यक असते. हा निकष तपासून काम करावे लागते. आपात्कालीन स्थितीत क्रेन किंवा अन्य यंत्रणांना पुरेसी जागा मिळावी, ही सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्यावी लागत असल्याचेही बोरडे यांनी सांगितले.
७२ मीटरवरून ८४ मीटरचा पूल बांधण्याचा प्रस्ताव आल्याने खर्चात वाढ होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार आठवडाभरात सुधारीत आराखडा पाठवण्यात येईल. त्यानंतर साधारण महिनाभरानंतर सर्व निकषांची तपासणी झाल्यावर रेल्वेची मंजुरी मिळेल. रेल्वेची मंजुरी प्राप्त झाल्यावरच अंतिम आराखडा बनवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल, असेही बोरडे यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Kalyan's new cover is 84 meters high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण