कल्याण लोकसभा मतदारसंघ: आगरी उमेदवारावर राष्ट्रवादी-मनसे मतैक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:27 AM2019-03-15T01:27:22+5:302019-03-15T01:28:04+5:30

कार्यकर्त्यांच्या मागणीवर पवार सकारात्मक

Kalyan Lok Sabha Constituency: NCP-MNS Convener on Agari candidate | कल्याण लोकसभा मतदारसंघ: आगरी उमेदवारावर राष्ट्रवादी-मनसे मतैक्य

कल्याण लोकसभा मतदारसंघ: आगरी उमेदवारावर राष्ट्रवादी-मनसे मतैक्य

googlenewsNext

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातून आगरी समाजाचा उमेदवार देण्याची मागणी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही काही दिवसांपूर्वी हीच मागणी केली होती. नगरसेवक बाबाजी पाटील यांची या मतदारसंघातील उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-मनसे युती या मतदारसंघात बाबाजी पाटील यांची पाठराखण करण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात आगरी समाजाचा उमेदवार असावा, अशी मागणी केली असता जे समाजमान्य नेतृत्व आहे, त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करावी. त्याबाबत नक्कीच विचार करू, अशी ग्वाही पवार यांनी दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बुधवारी पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हिसी) संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ५० ते ६० टक्के मतदार हे आगरी समाजातील आहेत. ते आसपासच्या १७० च्या गावपाड्यांत वास्तव्यास आहेत. त्यामुळे आगरी समाजातील उमेदवार असावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अंबरनाथचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी यावेळी प्रश्नोत्तरादरम्यान केली. त्यावर पवारांनी उपरोक्त भाष्य केले. यावेळी माजी नगरसेवक हिरा पाटील यांनी नेवाळी आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करत आगरीबांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याक डे लक्ष वेधले. यावर सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला असून निवडणुकीनंतर नेवाळीबाबत विशेष बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पवारांनी दिले.
उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांनी नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्योगांचे शहर म्हणून ‘मिनी जपान’ असे गणले जात असलेल्या उल्हासनगरमधील औद्योगिक स्थिती अत्यंत खराब असल्याचे सांगितले, तर कल्याणचे माजी नगरसेवक जे.सी. कटारिया यांनी केडीएमसीच्या भ्रष्ट कारभाराचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर केडीएमसीतील सत्ताधाऱ्यांना सरकारचे संरक्षण असून परिस्थिती बदलायची असेल, तर सत्तापरिवर्तन आवश्यक असल्याचे पवार म्हणाले.

समन्वयाच्या अभावाचा फटका पत्रकारांना
गटबाजी आणि विसंवाद हे राष्ट्रवादीसाठी नवीन नाही. परंतु, पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका पत्रकारांना बसला.
पत्रकार वृत्तसंकलनासाठी मेट्रो मॉल जंक्शनमधील सभागृहात गेले असता, त्यांना काही पदाधिकाºयांनी मज्जाव केला. जिल्हाध्यक्ष कार्यक्रमानंतर तुमच्याशी संपर्क साधतील, असे सांगितले.
त्यावर पत्रकारांनी मग कार्यक्रमाचे मेसेज का पाठवले? प्रवेश देणार नसाल तर आम्ही आलोच नसतो, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.
काही पदाधिकाºयांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा, अखेर त्यांच्या सूचनेनुसार पत्रकारांना वृत्तसंकलनासाठी परवानगी देण्यात आली.

संवादात तांत्रिक अडथळे
राफेल, नोटाबंदी, पुलवामा दहशतवाद, समृद्धी महामार्ग, शेतकरी आत्महत्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रखडलेली स्मारके आदी मुद्यांवर मार्गदर्शनपर भाषण करताना पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. कार्यकर्ते व पदाधिकाºयांशी संवाद साधताना मात्र तांत्रिक अडचणींमुळे अधूनमधून अडथळे येत होते. त्यामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.

Web Title: Kalyan Lok Sabha Constituency: NCP-MNS Convener on Agari candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.