संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 02:46 PM2018-08-13T14:46:12+5:302018-08-13T14:52:33+5:30

 'संविधान के सन्मान मे हम उतरेंगे मैदान मे' संपूर्ण भारतभर आंदोलन छेडण्याची आव्हाड यांची घोषणा

jitendra awhad slams bjp government on Constitution burning | संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप 

संविधान जाळण्याचा प्रकार सरकारच्या आशीर्वादानेच, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप 

ठाणे - मराठा आरक्षणाचा बागुलबुवा करत जंतरमंतरवर संविधान जाळण्याचा झालेला प्रकार हा सरकारच्या आशीर्वादानेच झाला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संविधान जाळणाऱ्यांच्या  विरोधात हे सरकार देशद्रोहाचा गुन्हा करत नसल्याने सरकारचा काही समझोता तर नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहत नसल्याचे आव्हान यांनी सांगितले. या देशात सर्वकाही बदलेल मात्र संविधान बदलू देणार नाही अशी घोषणा करत येत्या काही दिवसात संविधान प्रेमी असलेले आणि पुरोगामी विचारांचे हजारो तरुण रस्त्यावर उतरणार असल्याचंही त्यांनी सांगितले. 'संविधान के सन्मान में हम उतरंगे मैदान में' असा भारतभर कार्यक्रम राबवण्याची घोषणा देखील आव्हाड यांनी केली असून समविचारी संघटनेबरोबर आपली बोलणी सुरु असल्याची माहिती ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नालासोपाऱ्यात सापडलेली स्फोटाके ही दिवाळीमध्ये वाजवण्यासाठी आणण्यात आली होती का असा टोला लगावत यांच्यावर सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.

मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण तापले असताना जंतरमंतर या ठिकाणी काही विशिष्ट घटकांकडून संविधान जाळण्याचा प्रकार झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या भूमिकेविषयीच शंका उपस्थित केली आहे. या देशात पुन्हा मनुस्मृतीचे नियम लादण्यात येत आहे. संविधान जाळल्यामुळे हा १२० कोटी जनतेचा अपमान असून संपूर्ण भारतामध्ये याचे तीव्र प्रतिसाद उमटतील असे आव्हाड यांनी सांगितले. आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून काही लोकांना संविधान नको आहे त्यामुळेच संविधान जाळण्याचे प्रकार होत असून अशा लोकांवर सरकार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसून सरकारचे बगलबच्चेच हा प्रकार करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. 

नालासोपाऱ्यात जी स्फोटके सापडली आहेत ती काही दिवाळीमध्ये फोडण्यासाठी आणली होती का असा उपहासात्मक टोला त्यांनी सरकारला लगावला आहे. ही स्फोटके मराठा आंदोलनामध्ये फोडायची होती किंवा अन्य ठिकाणी जरी फोडण्याचा डाव असला तरी ही देशविघातक कृत्य असून सरकार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत नसल्याने सरकारचाच छुपा समझोता आहे की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे सरकारच्या आशीर्वादानेच संविधान जाळण्याचा प्रकार झाला असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 
 

Web Title: jitendra awhad slams bjp government on Constitution burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.