गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार? जगन्नाथ शिंदे, महेश तपासे यांचीही नावे चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:57 AM2018-10-09T00:57:46+5:302018-10-09T00:58:03+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक नुकतीच मुंबईत झाली. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.

Ganesh Naik NCP candidate? Jagannath Shinde, Mahesh Takesay and his names are discussed | गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार? जगन्नाथ शिंदे, महेश तपासे यांचीही नावे चर्चेत

गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार? जगन्नाथ शिंदे, महेश तपासे यांचीही नावे चर्चेत

googlenewsNext

- मुरलीधर भवार

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक नुकतीच मुंबईत झाली. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. मात्र, नाईक यांनी स्वत:हून पुढाकार दर्शवलेला नाही. नाईक यांच्यासह आमदार जगन्नाथ शिंदे आणि युवा नेते महेश तपासे यांची नावे चर्चेत आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्याला भेदण्यासाठी पक्षाने प्रबळ उमेदवार उभा केला, तरच शिवसेनेच्या उमेदवाराला शह दिला जाऊ शकतो. २०१४ मधील लोकसभेची निवडणूक शिवसेना व भाजपाने एकत्रितपणे लढवली होती. त्याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना झाला होता. यावेळी शिवसेना-भाजपा एकत्रित निवडणूक लढवतील की नाही, याविषयी अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत स्वबळाचा इरादा जाहीर केला आहे. युती न झाल्यास राष्ट्रवादीला शिवसेना व भाजपाच्या दोन स्वतंत्र उमेदवारांशी लढत द्यावी लागेल.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रभारीपद व पक्षाची जबाबदारी राष्ट्रवादीने नाईक यांच्यावर सोपवली आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून नाईक यांनी उमेदवारी लढवावी, अशी सूचना केली. त्यावर नाईक यांनी फारसा रस दाखवला नाही. तसेच त्याला नकारही दिला नाही. त्यामुळे त्यांचे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे मत तळ्यातमळ्यात आहे. नाईक यांचा गड नवी मुंबई आहे. मात्र, ते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघ जड जाणार नाही. त्याचबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासमोर एक ज्येष्ठ आणि राजकीयदृष्ट्या तगडा उमेदवार नाईक यांच्या रूपाने पर्याय ठरू शकतो.
नाईक यांच्याप्रमाणे या मतदारसंघातून पक्षाचे आमदार जगन्नाथ शिंदे यांचेही नाव सुचवले गेले आहे. मात्र, शिंदे यांनी आपण पक्षात ज्येष्ठ नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचासुद्धा इशारा नाईक यांच्याकडेच होता, असे बैठकीत दिसून आले. त्याचबरोबर महेश तपासे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. पक्षाने त्यांना यापूर्वी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून दोनदा उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांना कल्याण मतदारसंघातून उमेदवारी देणे पक्षासाठी कितपत योग्य होईल, याविषयी पक्षातील लोकांनाच साशंकता आहे.

आनंद परांजपे यांची इच्छा नाही
कल्याण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी खासदार आनंद परांजपे यांनी स्वत:हून निवडणूक लढवण्यासाठी पक्षाकडे इच्छा दर्शवलेली नाही. त्यांनी मागणीच केली नसल्याने त्यांच्या नावाची चर्चा झाली नाही. परांजपे कल्याणमधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याने ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील की, पक्ष ऐनवेळी त्यांचे नाव एखाद्या मतदारसंघातून जाहीर करेल. कारण, परांजपे हे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे लाडके आहेत. पवार यांच्या डोक्यात परांजपे यांना विधानसभा निडणुकीची उमेदवारी देऊन राज्यातील राजकारणात सक्रिय करण्याची योजना असावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

शिवसेनेकडून पुन्हा श्रीकांत शिंदे
शिवसेनेकडून डॉ. श्रीकांत शिंदे हेच पुन्हा कल्याण लोकसभा निवडणूक लढवतील, हे स्पष्ट असल्याने त्यांच्यासमोर अन्य इच्छुक आपली इच्छाही दर्शवणार नाही. भाजपाकडून लोकसभा निवडणुकीसाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव समोर असले, तरी चव्हाण यांना दिल्लीवारी करण्याऐवजी राज्यातील राजकारणात रस आहे. त्यामुळे लोकसभेसाठी भाजपातून अन्य चेहरे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Ganesh Naik NCP candidate? Jagannath Shinde, Mahesh Takesay and his names are discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.