कल्याणच्या गणेश घाटावर पहाटेपर्यंत चालले विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:55 AM2018-09-25T02:55:03+5:302018-09-25T02:55:08+5:30

कल्याण-डोंबिवलीतील १० दिवसांच्या नऊ हजार ६११, तर १६९ सार्वजनिक गणेशमूर्तींचे रविवारी अनंत चतुर्दशीला शांततेत विसर्जन झाले. ढोलताशा, बेंजो, बाजाच्या तालावर भक्तांनी विसर्जन मिरवणुका काढल्या.

Ganesh Ghat of Kalyan news | कल्याणच्या गणेश घाटावर पहाटेपर्यंत चालले विसर्जन

कल्याणच्या गणेश घाटावर पहाटेपर्यंत चालले विसर्जन

googlenewsNext

कल्याण  - कल्याण-डोंबिवलीतील १० दिवसांच्या नऊ हजार ६११, तर १६९ सार्वजनिक गणेशमूर्तींचे रविवारी अनंत चतुर्दशीला शांततेत विसर्जन झाले. ढोलताशा, बेंजो, बाजाच्या तालावर भक्तांनी विसर्जन मिरवणुका काढल्या. कल्याणमधील दुर्गाडी खाडीवर दुपारी दीड वाजता सुरू झालेले विसर्जन सोमवारी पहाटे ६.३० वाजेपर्यंत सुरू होते.
महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या गणेशमूर्तीचे सगळ्यात प्रथम वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कदम यांच्या हस्ते विसर्जन झाले. या गणपतीच्या मिरवणुकीत पोलिसांनी कोणतेही वाद्य वाजवले नाही. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी अन्य मंडळांनीही वाद्य वाजवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले. दुपारी ४ नंतर गणेशमूर्ती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या. महात्मा फुले चौक, महंमद अली चौक, शिवाजी चौक ते दुर्गाडी हे रस्ते मिरवणुकांमुळे गणेशभक्तांनी गजबजून गेले. गुलाल व फुलांची उधळण करत लाडक्या गणेशाला भक्तांनी तालवाद्यांच्या तालावर निरोप दिला.
कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव महामंडळाने प्रत्येक गणेश विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली. महामंडळाने केरळमधील पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या १०० गोण्या दिल्या. त्या मुख्यमंत्री सहायता मदतनिधी कक्षाकडे जमा केल्या जाणार आहे, असे अध्यक्ष चिंतन जोशी सांगितले.
दुर्गाडी चौकात महामंडळाने स्वखर्चातून सुशोभीकरण केले होते. महापौर विनीता राणे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पेणकर, अजय पवार, संजय मोरे आदी उपस्थित होेते. या मंडळाने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.
गणेश मित्र मंडळ अनेक वर्षांपासून विसर्जनस्थळी गणेशमूर्तींचे विसर्जन करत आहे. मात्र, महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याचे मंडळाचे प्रमोद भगत यांनी सांगितले. शहाडमधील नवरंग क्रीडा मंडळाने त्यांच्या सोसायटीतच कृत्रिम तलाव तयार करून मूर्तीचे विसर्जन केले.
गौरीपाडा घाटावर विसर्जन
चिकणघर : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील गणपती विसर्जन घाटावर १० दिवसांच्या ४१३ गणपतींचे विसर्जन झाले. चिकणघर, रामदासवाडी, बिर्ला कॉलेज परिसर, इंदिरानगर, मिलिंदनगर, गौरीपाडा, टावरीपाडा येथील गणेशभक्तांनी तेथे विसर्जनासाठी गर्दी केली.
हरिनामाचा जयघोष
टिटवाळा : टिटवाळा शहर आणि कल्याण तालुक्यातील विविध विसर्जनस्थळांवर रविवारी १५ सार्वजनिक, ५४७ घरगुती, तर उल्हासनगर येथील ६१५ घरगुती गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन झाले. टिटवाळा येथील गणेशभक्त रत्नाकर पाटील यांच्या गणपतीची मिरवणूक आकर्षण ठरली. त्यात वारकरी संप्रदायाने टाळमृदंगाचा ठेका आणि हरिनामाचा जयघोष केला. विसर्जन मिरवणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कल्याण तालुका पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता.
टिटवाळ्यातील हनुमान मंदिर तलाव, वरप तलाव, पाचवा मैल घाट, रायते नदीवरील पूल, रुंदे येथे काळू नदी पूल, टिटवाळा व वासुंद्री येथे काळू नदीवरील घाट, गाळेगाव येथे उल्हास नदीचा घाट, खडवली येथे भातसा नदीकिनारी गणपती बाप्पांचे विसर्जन झाले.

गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी : कोळसेवाडी : गुलालाची उधळण, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा गजर अशा वातावरणात कल्याण पूर्वेत रविवारी रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विठ्ठलवाडी, चिंचपाडा, गावदेवी येथील कृत्रिम तलाव, तर नांदिवली तलाव व लोकसेवा खदाणीत दोन हजार ४७० घरगुती, तर ३७ सार्वजनिक तसेच तिसगावच्या जरीमरी तलावात ६० ते ७० गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कवयित्री गावित यांचे पथक, गृहरक्षकदल यांनी बंदोबस्त ठेवला होता. साकेत, मॉडेल, कमलादेवी कॉलेजचे विद्यार्थी, पोलीसमित्र, अनिरु द्ध बापूंचे सेवेकरी यांनी भाविकांना मदत केली. केडीएमसीचे प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे व वसंत भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव परिसरात स्वच्छता व निर्माल्य संकलन, प्रकाश व्यवस्थेसाठी सर्व महापालिका कर्मचाऱ्यांनी उत्सवकाळात परिश्रम घेतले.

 

Web Title: Ganesh Ghat of Kalyan news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.