अखेर पंडित धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची ग्रिनीज 'बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 11, 2024 05:09 PM2024-04-11T17:09:16+5:302024-04-11T17:11:05+5:30

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बँकेच्या शिपायाचा विश्वविक्रम

Finally Pandit Dhaygude's world record is recorded in the Greenies 'Book of Records' | अखेर पंडित धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची ग्रिनीज 'बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

अखेर पंडित धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची ग्रिनीज 'बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: काही माणसं झपाटलेली असतात… जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच… मूळचे सांगलीचे असलेले आणि नोकरीनिमित्त ठाण्यात आलेले पंडित तुकाराम धायगुडे हे त्यापैकीच एक… २५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७६ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.७ मे २०२३ रोजी धायगुडे यांनी हा विश्वविक्रम ठाण्यातील कोपरी येथील धर्मवीर क्रीडा संकुलात केला होता यानंतर तब्बल १० महिन्यानंतर त्यांच्या या विश्वविक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली असून त्यांना तसे प्रमाणपत्र ग्रिनीज बुकने बहाल केले असून विश्वविक्रमाचा एक व्हिडीओ ग्रिनीज बुकने आपल्या फेसबुक, युटयूब अकाऊंड वर प्रसारित केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा विश्वविक्रम झाल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाईचे काम करणाऱ्या पंडित धायगुडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देशाचं नाव गिनीज बुकमध्ये न्यायचं स्वप्न होतं. २००९ पासून त्यासाठी प्रयत्न करत होतो. अखेर ते स्वप्न पूर्ण झाल्यानं भरून पावलो,त्यामुळे मला या विश्वविक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो अशा भावना पंडित धायगुडे यांनी विश्वविक्रमाची ग्रिनीज बुक मध्ये नोंद झाल्यानंतर बोलताना व्यक्त केल्या. याआधीचा पंडित धायगुडे यांचा विक्रम १२२ बाइक पोटावरून नेल्याचा होता. धायगुडेंनी आपलाच रेकॉर्ड तोडत तो कित्तीतरी मागे सोडलाय. कराटेत ब्लॅक बेल्ट मिळवलेल्या पंडित धायगुडे यांची २००९ पासून तयारी सुरु होती.

धायगुडे यांनी याआधी देखील २५७ किलो वजनाच्या दोन बाइक लागोपाठ १२२ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रमाला गवसणी घातली होती.त्यानंतर रविवार ७ मे २०२३ रोजी त्यांनी आपलाच विक्रम मोडीत काढत २५७ किलो वजनाच्या सहा बाइक लागोपाठ ३७६ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत विश्वविक्रम केला. खरं तर, १५० वेळा या बाइक पोटावरून जाण्याची तयारी पंडित धायगुडे यांनी केली होती. पण, त्रिशतक – होता-होता सहा बाइक तब्बल ३७६ वेळा त्यांच्या पोटावरून गेल्या. ३७६ व्या खेपेला इंडियाज स्कॉटची तब्बल ४५० किलो वजनाची गाडी धायगुडेंच्या अंगावरून गेली आणि एकच जल्लोष झाला.यानंतर पंडित धायगुडे यांच्या या विक्रमाचे सर्व माहिती व्हिडिओ सकट ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्डला पाठवण्यात आली होती त्यानंतर त्यांनी या सर्व बाबीची तपासणी करून तब्बल १० महिन्यानंतर पंडित धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची नोंद ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली आहे.

अत्यंत प्रतिकूल परस्थिती जिद्दीच्या जोरावर सलग दोन वेळा धायगुडे यांनी विश्वविक्रम केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Finally Pandit Dhaygude's world record is recorded in the Greenies 'Book of Records'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.