डोंबिवली मेट्रोच्या मंजूर डीपीआरमध्ये बदल की नवा मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 08:15 PM2018-12-18T20:15:14+5:302018-12-18T20:17:23+5:30

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे गोंधळ; खुलासा करण्याची खा. डॉ. शिंदे यांची मागणी

Dombiwali Metro Dpr changed or new route? | डोंबिवली मेट्रोच्या मंजूर डीपीआरमध्ये बदल की नवा मार्ग?

डोंबिवली मेट्रोच्या मंजूर डीपीआरमध्ये बदल की नवा मार्ग?

Next

ठाणे : कल्याण-डोंबिवली-शीळ-तळोजा या मेट्रो मार्गाच्या डीपीआरला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत यापूर्वीच मंजुरी दिली असताना मंगळवारी कल्याण येथील कार्यक्रमात डोंबिवली - तळोजा मेट्रो मार्गाच्या नव्या डीपीआरला मंजुरी देण्याची पुन्हा घोषणा केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. हा नवा मेट्रो मार्ग असणार की, यापूर्वी आम्ही मागणी केल्याप्रमाणे आधीच्या मेट्रो मार्गात बदल करून नवा डीपीआर केला जाणार आहे,याचा खुलासा मा. मुख्यमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे, अशी मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

खा. डॉ. शिंदे यांनी डोंबिवली मार्गे कल्याण-शीळ-तळोजा मेट्रो मार्गाची सर्वप्रथम मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला आहे. २१ ऑक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन या मेट्रो मार्गाचे सविस्तर सादरीकरण खा. डॉ. शिंदे यांनी केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे ही याप्रसंगी उपस्थित होते. कल्याण, डोंबिवली, २७ गावे, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसराची लोकसंख्या प्रत्येक दशकात कशा प्रकारे वाढत आहे, याची आकडेवारी सादर करतानाच कुठल्या मार्गाने मेट्रो नेल्यास अधिकाधिक लोकसंख्येला तिचा लाभ होईल, याचे अभ्यासपूर्ण सादरीकरण खा. डॉ. शिंदे यांनी केले होते. 

त्यामुळे प्रभावित होत श्री. फडणवीस यांनी त्याच बैठकीत तात्काळ या मेट्रो मार्गाला हिरवा कंदील दाखवत डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएला दिले होते. त्यानुसार खा. डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेऊन त्यांच्या समोरही सादरीकरण केले होते.

त्यानंतर एमएमआरडीएने सदर मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनची नियुक्ती केली. सदर डीपीआर लवकरात लवकर तयार होऊन त्यास मंजुरी मिळावी यासाठी देखील खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच एमएमआरडीएच्या स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला होता. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व खासदार व आमदारांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे झाली होती, त्याही वेळी खा. डॉ. शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

गेल्याच महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या बैठकीत कल्याण-शीळ-तळोजा मेट्रोच्या डीपीआरला मंजुरी दिली होती. त्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी त्यांचे ट्विटरवर आभार देखील मानले होते. तसेच, सदर मार्गाबद्दल काही आक्षेप असून त्यांचे निराकरण करण्याची मागणीही केली होती. एमएमआरडीएच्या डीपीआर नुसार सदरचा प्रस्तावित मार्ग सूचक नाका-मलंगगड रस्ता-खोणी-तळोजा बायपास-तळोजा असा असून त्याऐवजी कल्याण एपीएमसी-डोंबिवली-शीळ-तळोजा असा मेट्रो मार्ग करण्याची आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी सुरुवातीपासूनच मुख्यमंत्री फडणवीस आणि एमएमआरडीए यांच्याकडे केली आहे.

त्यानंतर मंगळवारी कल्याण येथे झालेल्या कार्यक्रमात मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी डोंबिवली मार्गे तळोजा मेट्रोचा डीपीआर तयार करून तातडीने मंजुरी देण्याची घोषणा केल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. हा नवा मेट्रो मार्ग आहे की, आधीच्या मार्गाच्या डीपीआर मध्ये बदल करण्यात येणार आहे, याचा खुलासा जनतेसमोर झाला पाहिजे,अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी केली आहे. ज्या डीपीआरला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे, तो सदोष आहे. २७ गावांमधून लोढा पलावा मार्गे तो जाणार असल्यामुळे प्रवाशांना त्याचा फारसा लाभ होणार नसल्याचा आक्षेप आपण त्याचवेळी नोंदवला होता, असेही खा. डॉ. शिंदे यांनी नमूद केले आहे.

 

Web Title: Dombiwali Metro Dpr changed or new route?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.