बाजूने लिहिणारे भक्त; विरोधी देशद्रोही! व्यंगचित्रकार संमेलनात राज ठाकरे याचे ‘फटकारे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 03:46 AM2018-01-22T03:46:11+5:302018-01-22T03:46:27+5:30

आताची परिस्थिती अशी आहे की, सरकारच्या बाजूने लिहिले की भक्त आणि विरोधात लिहिले की देशद्रोही समजले जाते. व्यंगचित्रकारांनी जे चुकते ते दाखविले पाहिजे आणि योग्य त्याचे कौतुक झाले पाहिजे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी ठाण्यात केले.

 Devotee Writer; Anti-traitor! Raj Thackeray's 'shocking' cartoonist meeting | बाजूने लिहिणारे भक्त; विरोधी देशद्रोही! व्यंगचित्रकार संमेलनात राज ठाकरे याचे ‘फटकारे’

बाजूने लिहिणारे भक्त; विरोधी देशद्रोही! व्यंगचित्रकार संमेलनात राज ठाकरे याचे ‘फटकारे’

googlenewsNext

ठाणे : आताची परिस्थिती अशी आहे की, सरकारच्या बाजूने लिहिले की भक्त आणि विरोधात लिहिले की देशद्रोही समजले जाते. व्यंगचित्रकारांनी जे चुकते ते दाखविले पाहिजे आणि योग्य त्याचे कौतुक झाले पाहिजे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी ठाण्यात केले.
कार्टुनिस्ट कंबाइन आयोजित अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन व हास्यप्रदर्शनात रविवारी ज्ञानराज सभागृह येथे राज यांची विशेष उपस्थिती होती. व्यंगचित्रकारांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही, तिथे प्रहार करा, प्रत्येक व्यंगचित्रकाराने त्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे, योग्य भूमिका घेतली पाहिजे. व्यंगचित्रकार, साहित्यिक, पत्रकार, संपादक हे समाजाची मशागत करीत असतात. माझे काम मी बजावतोय. तुम्हाला जे म्हणायचे आहे ते व्यंगचित्रातून दाखवा. तुम्ही जगभर पोहोचत आहात. सर्व परिस्थितीवर तुम्ही भूमिका घ्यावी, ती कठोर, कडवट घ्यावी. सरकार व इतरांना काय घडतेय, काय चुकतेय हे समजले पाहिजे. व्यंगचित्रकलेची परंपरा जुनी असून, ती सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. आजची राजकीय परिस्थिती पाहता, मी दिलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रात छापली जाणार नाही आणि ती त्यांना परवडणारही नाही. त्यामुळे मी स्वत:चे फेसबुक पेज सुरू केले आहे, तिथे मी माझी व्यंगचित्रे टाकतोय. वर्तमानपत्रात तुमची व्यंगचित्रे छापली काय, नाही छापली काय याचा विचार न करता, सोशल मीडियाचा वापर करा, असे आवाहन त्यांनी व्यंगचित्रकारांना केले.
वर्तमानपत्रात व्यंगचित्र छापून येण्याची मजा वेगळी असते. व्यंगचित्रकला सर्वसामान्यांमध्ये रुजणे याचा लंडन येथे आलेला स्वानुभव राज ठाकरे यांनी या वेळी कथन केला. प्रत्येक जण व्यंगचित्रकार होऊ शकतो असे नाही, परंतु ही कला मुरण्यासाठी व्यंगचित्रकारांनी प्रयत्न केले पाहिजे, तसेच ज्यांना हौस आहे, त्यांनी या कलेत आले पाहिजे, असे सांगत व्यंगचित्रातील ताकद वाढो आणि वृद्धिंगत होवो, अशा सदिच्छा दिल्या.
या वेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करून, दिवाळी अंकांच्या संपादकांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, संमेलनाध्यक्ष विवेक मेहेत्रे, राजेश मोरे, स्थानिक नगरसेविका रुचिता मोरे उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात मेहेत्रे म्हणाले की, व्यंगचित्रकारांना साहित्यिकाचा दर्जा द्यावा, असे १०० वर्षांनंतरही कोणाला वाटत नाही. मराठीतील उत्तम खपाच्या दिवाळी अंकांमध्ये विनोदी अंकांचे स्थान वरचे आहे, ज्यामध्ये अनेक हास्यचित्रे रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. ही परंपरा फार वर्षांपासून असूनही साहित्य संमेलनातील कार्यक्रमांच्या व्यासपीठांवर व्यंगचित्रकारांना निमंत्रण नसते. चित्रकार, नवचित्रकार, स्थापत्य रचनाकारही अजूनही व्यंगचित्रकारांना आपल्या सोबत घेत नाहीत, त्यामुळे व्यंगचित्रकारांची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झालेली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आपल्या मुलांनी सिनेनट, खेळाडू, राजकारणी, आय.ए.एस. अधिकारी किंवा बिल्डर व्हावे, असे हल्लीच्या पालकांना वाटते, पण त्याचे हास्य-व्यंगचित्रकार होऊन उत्तम नाव व भरपूर पैसा मिळवावा, असे वाटत नाही, अशी नाराजीही मेहेत्रे यांनी व्यक्त केली.
उपाध्याय, मोरे, चारोळे टीम अव्वल-
सुरुवातीला आमच्यासारखेच आम्हीच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यात सतीश उपाध्याय, संजय मोरे, उमेश चारोळे यांना प्रथम पुरस्कार टीम, अतुल पुरंदरे, योगेंद्र भगत, अशोक सुतार यांना द्वितीय पुरस्कार टीम तर विवेक प्रभुकेळुस्कर, अमोल ठाकूर, वैजनाथ दुलंगे यांना तृतीय पुरस्कार टीमद्वारे गौरविण्यात आले. चारुहास पंडीत, जगदीश कुंटे, सुरेश क्षीरसागर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

Web Title:  Devotee Writer; Anti-traitor! Raj Thackeray's 'shocking' cartoonist meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.