मतपेट्यांच्या राजकारणात खुंटला विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:15 AM2018-10-29T00:15:27+5:302018-10-29T00:15:56+5:30

निवडणुकीच्या काळात भिवंडीचा विकास करणार, म्हणून जवळजवळ सर्वच पक्ष नागरिकांना आश्वासने देतात. परंतु, जेव्हा कामे करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरतात, तेव्हा पक्षाचे काही पुढारी तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन पुढे येत नाहीत.

Development in the ballot politics | मतपेट्यांच्या राजकारणात खुंटला विकास

मतपेट्यांच्या राजकारणात खुंटला विकास

Next

- पंढरीनाथ कुंभार, भिवंडी />
निवडणुकीच्या काळात
भिवंडीचा विकास करणार, म्हणून जवळजवळ सर्वच पक्ष नागरिकांना आश्वासने देतात. परंतु, जेव्हा कामे करण्यासाठी अधिकारी रस्त्यावर उतरतात, तेव्हा पक्षाचे काही पुढारी तोंडात मिठाच्या गुळण्या घेऊन पुढे येत नाहीत. तर, काही पुढारी मतदारांची मर्जी सांभाळण्यासाठी राजकारणाच्या आहारी जातात. त्यामुळे शहराचा विकास बोलण्यापुरता राहिला की काय, अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शहराच्या कानाकोपऱ्यांत हवा तापू लागली आहे. सर्वच पक्ष आपल्या मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शहराच्या विकासाची दृष्टी व आत्मविश्वास नसलेली माणसे राजकारणात आल्याने शहराची दुरवस्था झाली आहे. महापालिकेची करापोटी वसुली बाकी आहे. त्यामुळे विकासाला गती येत नाही. सरकारकडून येणारा निधी पालिकेची देणी देण्यातच जातो. असे असतानाही सरकारच्या निधीतून विविध योजना शहरात राबवल्या जात आहेत. मात्र, त्याही धड राबवल्या जात नाही. त्यातही व्होटबँकेचे राजकारण झाल्याने अनेक योजना अर्धवट आहेत.

शहरातील रस्ते दरवर्षी खराब होत असल्याने व नेहमी वाहतूककोंडी होते. खासदार कपिल पाटील यांनी पुढाकार घेऊन एमएमआरडीएकडून काँक्रिटचे रस्ते व उड्डाणपूल मंजूर करून घेतला. परंतु, या मार्गावरील नागरिक व व्यापाºयांनी रस्ता रुंदीकरणासाठी विरोध केल्याने या मार्गावरील रस्त्याच्या कामास अडथळा निर्माण झाला आहे.

हा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यासाठी जे नगरसेवक सभागृहात हजर होते, त्यापैकी काही नगरसेवक कल्याण रोडच्या नागरिकांनी काढलेल्या मोर्चात सहभागी होऊन रस्ता रुंदीकरणास विरोध करू लागले. कल्याण रोड हा वर्दळीचा रस्ता आहे. विशेष म्हणजे हा मार्ग मुंबई-नाशिक महामार्गाला जोडलेला असल्याने ठाणे व मुंबईसाठी कल्याण रोडचा वापर करतात. त्यामुळे हा मार्ग रुंद होणे काळाची गरज आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास उड्डाणपूल व मेट्रो रेल्वेला गती मिळणार आहे. मात्र, या रस्त्याला कल्याण रोड संघर्ष समितीचा विरोध आहे. रस्त्याबाबत प्रशासनाची ठोस भूमिका असूनही काही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे या विकासकामांना अडथळा निर्माण झाला आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी नेते पुढे येणे गरजेचे आहे.

हीच स्थिती अंजूरफाटा ते बागेफिरदोस या मार्गाची आहे. राज्य सरकारने बाळकुम ते मनोर हा महामार्ग करताना शहरातील दाट वस्तीचा व पर्यायी जागेचा विचार केला नाही. याच मार्गावरून मेट्रो शहरात येणार आहे. मात्र, त्यानुसार रुंदीकरण झालेले नाही. हे दोन्ही मार्ग शहराच्या विकासाला गती देणारे आहेत. त्यासाठी प्रशासनाने हे रस्ते रुंद केले पाहिजेत. त्याचप्रमाणे वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाची तसेच एकेरी मार्ग निर्माण करण्याची गरज आहे.

- शहराचा विकास करताना प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.
- विनाकारण राजकारण आणून त्यात खोडा घालता कामा नये. यामुळे विकास राहतो दूर, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाही.
- ज्या कामातून शहराचा खरोखरच विकास साधला जाणार असेल, तर मदतीचा हात पुढे केला पाहिजे.

नियोजित विकास गरजेचा
सध्या जे रस्त्यांचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करून काम पूर्ण केलेच पाहिजे. परंतु, वाढत्या लोकसंख्येचा विचार करून लोकप्रतिनिधींनी, राजकीय नेत्यांनी आणि पालिका प्रशासनाने शहराचा नियोजित विकास करणे गरजेचे आहे.

Web Title: Development in the ballot politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.