उत्सुकता अन् जबाबदारीची जाणीवही...पहिलं मतदान न विसरण्यासारखंच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:03 AM2019-04-28T01:03:43+5:302019-04-28T01:03:58+5:30

आयुष्यातील पहिली घटना प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असते. त्या घटनेला विशेष असं महत्व असतं. त्याचप्रकारे पहिले मतदानही तेवढेच महत्वाचे असते.

Curiosity and sense of responsibility ... Do not forget to vote for the first! | उत्सुकता अन् जबाबदारीची जाणीवही...पहिलं मतदान न विसरण्यासारखंच!

उत्सुकता अन् जबाबदारीची जाणीवही...पहिलं मतदान न विसरण्यासारखंच!

Next

आयुष्यातील पहिली घटना प्रत्येकासाठीच अविस्मरणीय असते. त्या घटनेला विशेष असं महत्व असतं. त्याचप्रकारे पहिले मतदानही तेवढेच महत्वाचे असते. लोकशाहीतील सर्वाधिक मोठा उत्सव म्हणजे निवडणुका होय. या निवडणुकांमध्ये मतदान मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाते. मतदानाला अनन्यसाधारण महत्व असून, आपण केलेल्या पहिल्या मतदानाच्या वेळी कशी परिस्थिती होती, उत्साह होता की जबाबदारीची जाणीव, अशा काही मुद्यांवर जाणून घेतलेल्या निवडक मान्यवरांच्या आठवणींचा हा धांडोळा.

जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण

मी मूळची अलिबागची. आम्ही श्रीबागमध्ये राहायला होतो. बाबा प्रकाश जोशी स्टेट बँकेत मॅनेजर, तर आई कमल जोशी ट्रेझरीमध्ये होती. एखाद्या नोकरदार कुटुंबात ज्या पद्धतीचे संस्कार मुलांवर होतात, तसेच आम्हा भावंडांवर झाले होते. लोकशाहीचे महत्त्व आम्हाला बाबा नेहमी सांगायचे. माझं पहिलं मतदान होतं, तेव्हाही बाबांनी जबाबदारीची जाणीव करून दिली होती. कान्होजी आंग्रे समाधीस्थळाजवळील मराठी शाळेत आमचे मतदानकेंद्र होते. तेथे जाण्यासाठी एका उमेदवाराने घरी रिक्षा पाठवली होती; मात्र त्या सुविधेचा लाभ घेतला असता, तर मतदान करताना मनावर थोडेफार दडपण आले असते. त्यामुळे आम्ही उमेदवाराची रिक्षा नम्रपणे नाकारली. पहिल्या मतदानाबद्दल बरीच उत्सुकता होती. मतदानकेंद्रावर बोटाला शाई लावली जाणार असल्याने नेलपॉलिश लावली नव्हती. त्यावेळी ईव्हीएम नव्हत्या. त्यामुळे मतदानकेंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मतपत्रिकेवर शिक्का कसा मारायचा, याची माहिती दिली होती. मतदान केल्यानंतर आपला हक्क बजावल्याची नव्हे, तर कर्तव्यपालन केल्याची भावना होती. घरी आल्यावर बाबांनी केवळ मतदान केलं का, एवढंच विचारलं. मतदान कुणाला केलं, हे विचारण्याचे टाळून गोपनीय मतदानाचे महत्त्व त्यांनी आमच्या मनावर त्यावेळीच बिंबवले होते.
- मेधा जोशी, फाइन आर्टिस्ट

आणीबाणीनंतरचे दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्याचे मत

आणीबाणीनंतर, म्हणजे १९७८ साली मी पहिल्यांदा मतदान केल्याचं नक्की आठवतं. त्याआधी शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी राहावं लागल्याने इच्छा असूनही मतदान करता आलं नव्हतं. पहिल्यांदाच मत दिल्यावर खूप मोठ्ठं झाल्यासारखं वाटून अंगावर मूठभर मांस चढलं होतं. माझं सरकार मी निवडू शकतो, ही भावनाच खूप जबाबदारीची आणि अभिमानाची होती. आता मात्र तेवढं काही वाटत नाही. वाचन-लिखाणामुळे सामाजिक, राजकीय सजगता माझ्यात लहानपणापासूनच असल्याने मी स्वत:च मतदारयादीत माझं नाव नोंदवलं होतं. मतदानाच्या दिवशी तर आपण काहीतरी मोठं काम करीत आहोत, अशी भावना असायची आणि त्यामुळे खूप उत्साह असायचा. लोकनायक जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनामुळे स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे राजकीय सजगता निर्माण झालेली होती. देशाभिमानाने सर्व वातावरण भारल्यासारखं होतं. स्वातंत्र्याचा दुसरा लढा दिल्यासारखी ही निवडणूक आमची पिढी कधीच विसरणार नाही. मी जेव्हा पहिल्यांदा मतदान केले, तेव्हा साहजिकच आणीबाणीतील दडपशाही व अत्याचार हेच प्रमुख मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात होते.
- अरुण सु. पाटील, कवी आणि लेखक

शेतकरी विरुद्ध भांडवलदार अशी लढाई
मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मतदान केलं, साधारण १९६५ च्या आसपास. तेव्हा एक वेगळा उत्साह आणि उत्सुकता होती. त्यावेळी असणारे स्थानिक कार्यकर्ते हे आमचे मित्रच होते. त्यांनीच आमचे फॉर्म वगैरे भरून नाव नोंदवले होते. तेव्हा आमच्या भागात शेकाप विरुद्ध काँग्रेस अशी लढाई होती. शेतकरी आणि भांडवलदार असे चर्चेचे मुद्दे होते. वातावरण चढाओढीचे कधी तणावाचे तर कधी आक्रमक होत असे. तेव्हा कार्यकर्तेही खटाºयातून प्रचारात सहभागी होत असंत. उन्हात टेबल टाकून नोंदी ठेवणे. भजीवडा, शेवचिवडा खायला मिळत असे. एक वेगळीच मजा असायची.
- नारायण लाळे, ज्येष्ठ लेखक, समीक्षक

मराठी माणसांच्या नोकऱ्या हा होता मुद्दा
मे १९६७ साली मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान केलं होतं. २० व्या वर्षी केलेलं ते माझं पहिलं मतदान होतं. पहिल्यांदा मतदान करणार म्हणजे प्रौढ झाल्यासारखं वाटलं. आम्ही स्वत:ही कार्यकर्ते म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे आम्हीच आमचे नाव मतदारयादीत नोंदवले होते. त्यावेळी ईव्हीएम नसल्याने मत देण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोर स्टॅम्प मारण्याची पद्धत होती. स्टॅम्प मारल्यावर आडवी घडी घातली आणि ओली शाई दुसºया उमेदवाराच्या नावावरही उमटली तर गोंधळ व्हायचा. मराठी लोकांना नोकºया मिळाल्या पाहिजे. परकीयांचे आक्रमण थांबले पाहिजे, असे मुद्दे त्यावेळी होते.
- डॉ. सुधाकर फडके, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक

Web Title: Curiosity and sense of responsibility ... Do not forget to vote for the first!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.