ठाणे : ठाणे महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव यांनी रविवारी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानंतर आता पालिकेतील अर्थकारण पुन्हा एकदा समोर आल्याची चिन्हे निर्माण झाली आहे. आजी-माजी नगरसेवकांनी कामात खोडा घालण्याचा प्रयत्न, खोडा, पालिकेतील तथाकथित आरटीआय कार्यकर्त्यांचे ब्लॅकमेलिंग, शिवाय चाकण येथील गृहप्रकल्पाच्या मुद्यावरून जाधव अस्वस्थ असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि त्यांच्या मित्रमंडळींनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच या सर्वाला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
एका सर्वसामान्य कुटुबांत जन्माला आलेले संकेत मागील सुमारे १२ वर्षांपूर्वी प्रभाग समितीमधील छोटीमोठी कामे करू लागले. त्यानंतर, त्यांनी तलावांची कामेदेखील हाती घेतली. पाच ते सहा वर्षांपासून ते रस्त्यांची छोटीमोठी कामे करू लागले होते. परंतु, इतर ठेकेदारांप्रमाणे ते छक्केपंजे करणारे नसल्याची माहिती त्याच्या मित्रमंडळींनी दिली. काही भागीदारांच्या मदतीने त्यांनी चाकण येथे गृहनिर्माण प्रकल्पही सुरू केला होता. मात्र, त्यात अपेक्षित गृहविक्री होत नसल्याने नुकसान वाढू लागले होते. प्रकल्पातले भागीदार जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करत असल्याने सारा भार त्यांच्या खांद्यावर आला होता. त्यासाठी त्यांनी कर्जही काढले होते. पालिकेतील काही कामे केल्यानंतर ही कोंडी फुटेल, अशी त्यांची आशा होती. नौपाड्यातील सात कोटी रु पये खर्चाचे एक काम निविदा प्रक्रि येद्वारे त्यांच्या कंपनीला मिळाले होते. परंतु,त्या कामातही काहींनी खोडा घालण्याचे काम केल्याचे बोलले जात आहे. त्याशिवाय, पालिकेने ७२ रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. पैकी एक काम त्यांच्या कंपनीला मिळाले आहे. मात्र, या कामात पालिकेच्या अधिकाºयांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून एका तथाकथित आरटीआय कार्यकर्त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामागे एका माजी नगरसेवकाचा हात असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा सोडण्यासाठी हा कार्यकर्ता काही कोटींची मागणी ठेकेदारांकडे करत होता. त्यामुळेही संकेत प्रचंड अस्वस्थ होते.
त्यांची तशी पालिकेतील कोणतीही बिले थकीत नव्हती. त्यांचीच काय इतर ठेकेदारांची बिलेही वेळत निघत असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. परंतु, तणाखाली असल्याने त्यांनी ही अस्वस्थता पालिकेचे त्यांच्या परिचयाचे असलेले काही अधिकारी, सहकारी कंत्राटदार आणि आपल्या मित्रमंडळींकडे व्यक्त केली होती. त्यांच्या अंत्यविधीला आलेली ही मंडळी त्याच अस्वस्थतेवर चर्चा करत होती.
चाकण येथे होत असलेले नुकसान ठाण्यातील कामांमध्ये भरून काढू, असे त्यांना वाटत होते. मात्र, ठाण्यातील कामांचीसुद्धा अशी कोंडी होत असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असे त्यांच्या परिचयातला प्रत्येक जण सांगत होता. एकूणच आता आत्महत्येमागचे नेमके कारण काय, हे अद्यापही सांगणे कठीण झाले आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.

मागील काही वर्षांपासून पालिकेत तथाकथित आरटीआय कार्यकर्त्यांची चांगलीच चलती असल्याचे दिसत आहे. पालिकेतील कामांची माहिती मागवायची. त्यानंतर अधिकारी, विकासक आणि ठेकेदारांना ब्लॅकमेल करणारी मोठी साखळी ठाणे पालिकेत कार्यरत असल्याची माहिती यापूर्वीच समोर आली आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तांनी वादग्रस्त पद्धतीने माहिती मागवणाºया आरटीआय कार्यकर्त्यांची माहिती अधिकाºयांकडून मागवली होती. त्यानंतर, याबाबतची तक्र ार पोलिसांकडे दाखल होण्याची चिन्हे होती.आता संकेत जाधव यांच्या आत्महत्येनंतर तरी प्रशासकीय पातळीवर त्याबाबत गांभीर्याने विचार होईल का, याची चर्चा आता पालिकेत रंगू लागली आहे.