परिवहनवर आक्षेपांची कोटी कोटी उड्डाणे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 03:27 AM2018-07-18T03:27:21+5:302018-07-18T03:27:24+5:30

इंधन व बस दुरुस्ती खर्चात ४० टक्के वाढ, ४७० बसवर जाहिरातीपोटी मिळणारे उत्पन्न केवळ १० टक्के मिळणे, विविध विभागांकडून २४ कोटी ८२ लाख ७२ हजार ५६२ रुपयांची थकीत येणी, महसुली तुट जास्तीची दाखविणे, पोलिसांची थकीत येणी यासह तब्बल ४३ गंभीर आक्षेप २०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालात परिवहन सेवेवर नोंदविण्यात आले आहेत.

Crores of objection to transport flights! | परिवहनवर आक्षेपांची कोटी कोटी उड्डाणे!

परिवहनवर आक्षेपांची कोटी कोटी उड्डाणे!

Next

ठाणे : इंधन व बस दुरुस्ती खर्चात ४० टक्के वाढ, ४७० बसवर जाहिरातीपोटी मिळणारे उत्पन्न केवळ १० टक्के मिळणे, विविध विभागांकडून २४ कोटी ८२ लाख ७२ हजार ५६२ रुपयांची थकीत येणी, महसुली तुट जास्तीची दाखविणे, पोलिसांची थकीत येणी यासह तब्बल ४३ गंभीर आक्षेप २०१५-१६ च्या लेखापरीक्षण अहवालात परिवहन सेवेवर नोंदविण्यात आले आहेत. त्यातही १९८८ ते २०१४-१५ पर्यंतच्या ८२१ आक्षेपांचा अद्यापही निपटारा झालेला नसल्याने प्रशासनाचा ढिम्म कारभारही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.
मंगळवारी ठाणे परिवहन समितीच्या बैठकीत लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. त्यात हे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. मागील ८२१ आक्षेपांचाच अद्याप निपटारा झाला नाही. आता नव्या आक्षेपांचा निपटारा होईल का? याबाबत शंका उपस्थित होत आहेत.
परिवहन सेवेतील आर्थिक महसुली तूट ही तब्बल २८ कोटी ४१ लाख ३५ हजार १७ रुपये एवढी दाखविली आहे. विविध कारणास्तव ४८ कोटी ७ लाख ४ हजार ७७७ रुपयांची निराकरणाने वसुली झालेली नाही. तर विविध कारणास्तव ३० कोटी ६४ लाख ५ हजार ४९५ रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. अग्रीम रकमांचे समायोजन न झाल्याने ४ कोटी ७९ लाख ७४ हजार ५८ रुपयांची वसुली, दंडाची १९ हजार ६४५ची वसुली शिल्लक, बडतर्फ, राजीनामा व सेवानिवृत्त अधिकारी यांचे नावे असलेल्या अग्रीम रक्कमांचे समायोजन अद्याप झालेले नाही. ती रक्कम सुमारे ४ कोटी ५५ लाख आहे.
इंजिन आॅइल घोटाळा,
जाहिरात ठेक्यात तोटा.../पान ३
>तीन कोटींचे समायोजन न करणाऱ्या कर्मचाºयाचा राजीनामा मंजूर
सेवानिवृत्ती निधी प्रशासन हिस्स्यात ३ लाख २९ हजार ३०२ रुपये जादा दर्शविण्यात आले आहेत, सफाई कामगारांचा कमी पुरवठा करूनही ठेकेदाराकडून दंडाची रक्कम वसूल झालेली नाही, एका कर्मचाºयाने ३ कोटी रकमेचे समायोजन न करता त्याचा परिवहनने राजीनामा मंजूर केला कसा असा आक्षेपही नोंदविण्यात आला आहे. विना तिकीट प्रवासी व अवैध्य प्रवासी वाहतुकीवर उपाययोजना व अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. परिवहन सेवेत अतिरिक्त असलेल्या चालक व वाहकांबाबतही आक्षेप घेण्यात आला आहे.
>नादुरुस्त
बसची आरटीओकडून पासिंग
ज्या बसेस नादुरुस्त अवस्थेत आहेत, त्यांची आरटीओकडून पासिंग करून घेणे, ज्या बसेसला नवीन इंजिन आवश्यक होते, त्या बसला ते न बसविता इतर बसेसला कसे बसविणे असे गंभीर आक्षेप यामध्ये नोंदविण्यात आले आहेत. परिवहनच्या सेवेत ३५७ बस असून त्यांचे आरटीओ पासिंग व पीयुसी टेस्टिंग करीता ३२ हजार ८०० रुपये अग्रीम रक्कम घेतली असून तिचे अद्यापही समायोजन केले नसल्याचे नमूद केले आहे. याशिवाय ३० ते ४० टक्के बस या नादुरुस्त असतानासुद्धा त्यांचे आरटीओ पासिंग व पीयुसी टेस्टिंग केल्याची बाब समोर आली आहे.
शासन निर्णयानुसार एकूण उत्पन्नाच्या जास्तीत जास्त ३५ टक्केपर्यंत रक्कम ही आस्थापनेवर खर्च होणे अपेक्षित असताना ८३.५४ टक्के रक्कम ही या कारणासाठी खर्च करून तब्बल ४७ कोटी ९४ लाख ५९ हजारांचा जास्तीचा खर्च झाल्याबाबत गंभीर आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
विक्री झालेल्या तिकिटांच्या रकमेवर प्रवासी कर व बालपोषण अधिकार व त्यावरील २५ टक्के दंडाची म्हणजेच ३४ कोटी १३ लाख २८ हजार ९५३ रुपयांची रक्कम अद्याप शासनाकडे जमाच केलेली नाही.

Web Title: Crores of objection to transport flights!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.