नवी मुंबई : महानगर पालिकेतील सर्व विभागातील कंत्राटी कामगारांनी वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात शुक्रवारी साखळी उपोषण केले. या उपोषणाच्या माध्यमातून प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली.
कंत्राटी कामगारांना कायम करा, तसेच किमान वेतन त्वरित लागू करण्याच्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश असलेले निवेदन महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.
कंत्राटी कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याची प्रतिक्रिया आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी व्यक्त केली असून या वक्तव्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र या मागण्यांवर सकारात्मक भूमिका न घेता लवकरात लवकर पाऊल न उचलल्यास येत्या २२ आॅगस्टला महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. महापालिकेतील विविध विभागांमध्ये सध्या साडेसात हजार कामगार कार्यरत असून अपुºया वेतनामुळे कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून प्रशासनाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप या उपोषणादरम्यान करण्यात आला. महागाईच्या काळात कामगारांना तुटपुंज्या पगारावर उदरनिर्वाह करणे अशक्य असून प्रशासनाच्या उदासीन कारभारामुळे हजारो कुटुंबांना याची झळ बसत असल्याचा असंतोष कामगार नेते रमाकांत पाटील यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना वाढीव वेतन मिळावे, अशी मागणी नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस सुरेश ठाकूर यांनी केली.
उपोषणाला कामगार नेते अ‍ॅड. सुरेश ठाकूर, कामगार नेते रमाकांत पाटील, संघटक प्रमुख बाळकृष्ण खोपडे, उपाध्यक्ष सुनील शिर्के, सचिव राजेश सरोदे, उपाध्यक्ष यशवंत काळे आणि महापालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेला कामगार वर्ग मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाला होता.

कंत्राटी कामगारांच्या मागण्या कंत्राटी कामगारांना कायम करावे. किमान वेतन त्वरित लागू करावे मागील ५८ महिन्यांचा फरक थकबाकीसह दिला जावा. भविष्य निर्वाह निधीची माहिती कामगारांना द्यावी. कंत्राटी कामगारांना मनपाचा उल्लेख असलेले ओळखपत्र मिळावे. आरोग्य विमा योजनेची कपात केल्यानंतर देखील आरोग्य सेवा कामगारांना मिळत नाही त्याची माहिती दिली जावी. समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे.