धसईमधील कॅशलेस यंत्रणा गुंडाळली , दुकानदारांकडे स्वाइप मशीन धूळ खात पडून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 12:20 AM2019-05-13T00:20:44+5:302019-05-13T00:21:02+5:30

नोव्हेंबर २०१६ मध्ये देशात नोटाबंदी जाहीर होताच सर्वत्र व्यवहार ठप्प झाले. हातात पैसाच येत नसल्याने अशा कठीण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयोग मुरबाडमधील धसई गावात करण्यात आला.

Cashless machinery in Dhasai got bundled, swiping machine at the shoppers dirt | धसईमधील कॅशलेस यंत्रणा गुंडाळली , दुकानदारांकडे स्वाइप मशीन धूळ खात पडून

धसईमधील कॅशलेस यंत्रणा गुंडाळली , दुकानदारांकडे स्वाइप मशीन धूळ खात पडून

googlenewsNext

- पंकज पाटील, मुरबाड

नोव्हेंबर २०१६ मध्ये देशात नोटाबंदी जाहीर होताच सर्वत्र व्यवहार ठप्प झाले. हातात पैसाच येत नसल्याने अशा कठीण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयोग मुरबाडमधील धसई गावात करण्यात आला. शहरापासून लांब असतानाही या गावात कॅशलेस यंत्रणा सुरू करण्याचे धाडस करण्यात आले. या गावातील सर्व व्यापाऱ्यांनी त्या अनुषंगाने प्रयत्नही केले. मुख्य बाजारपेठेतील ७४ हून अधिक व्यापाऱ्यांनी स्वाइप मशीन विकत घेतल्या. मात्र, धसई आणि परिसरातील गावांमध्ये डेबिटकार्ड वापरणाºयांची संख्या कमी आहे. त्यामुळे व्यापारी सकारात्मक असले तरी नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. कॅशलेस मोहिमेकडे विशिष्ट काळातच लक्ष देण्यात आले. आता दुकानदारांच्या स्वाइप मशीन धूळखात आहेत. अनेकांनी मशीन बँकेला परत केल्या आहेत. आज या भागात आठ ते दहा दुकानांतच मशीन असून उर्वरित दुकानदार हे रोखीने व्यवहार करत आहेत. त्यामुळे धसईची कॅसलेस गावाची संकल्पना आणि ओळख संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी वसलेले धसई हे निसर्गरम्य गाव. धसई या गावाची खरी ओळख म्हणजे माजी महसूलमंत्री शांताराम घोलप यांची कर्मभूमी. डोंगराच्या पायथ्याशी हे गाव वसल्याने या ठिकाणी निम्मी लोकवस्ती ही आदिवासीबांधवांची आहे.

धसई परिसरात ३५ ते ४० लहानमोठे आदिवासीपाडे आणि गावे आहेत. या सर्व गावांची मुख्य बाजारपेठ ही धसई गावातच भरते. धसई गावातील बाजारपेठेवरच सर्व गावांचा व्यवहार अवलंबून असल्याने या ठिकाणी अनेक व्यापारी स्थिरावले आहेत. दैनंदिन जीवनात ज्या काही वस्तूंची गरज भासते, त्या सर्व वस्तूंची बाजारपेठ या ठिकाणी उभी करण्यात आली आहे.
मात्र, केंद्र सरकारने २०१६ मध्ये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालताच देशातील सर्व बाजारपेठांप्रमाणे या धसई गावातील बाजारपेठही ठप्प झाली होती. व्यवहारासाठी लागणारे चलन उपलब्ध होत नसल्याने या ठिकाणी व्यापाºयांना आपला व्यवसाय तोट्यात चालवावा लागत होता. तर, काही व्यापाºयांनी उधारीवर सामान देऊन व्यवसायाचा गाडा पुढे ढकलत नेला होता.

गावात मोजक्या दोन बँका असल्याने त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत होती. रोख हातात कमी प्रमाणात येत असल्याने या बाजारपेठेला उतरती कळा लागली होती. धसई गावातील या परिस्थितीवर मात करायची कशी, यावर चर्चा सुरू असताना येथील ग्रामस्थांनी एक अनोखा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला.

गावातील सर्व व्यापार तोट्यात असल्याने त्यातून सावरण्यासाठी रोखमुक्त गाव करता येईल का, यावर चर्चा सुरू झाली. ही चर्चा प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी खरी साथ दिली, ती स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी. मुरबाडच्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये संचालक म्हणून सावकरक काम करत आहेत.

सावरकर यांनी ‘रोखमुक्त गाव’ निर्माण करण्याचा संकल्प पुढे केला. त्यासाठी धसईची निवड केली. धसई हे गाव आदिवासी भागात मोडत असल्याने या ठिकाणी ही संकल्पना यशस्वी केल्यास देशात कुठेही ही संकल्पना राबवता येणे शक्य आहे, हाच हेतू ठेवण्यात आला. या मोहिमेसाठी प्रत्येकाने प्रयत्न केले.

कॅशलेससाठी प्रत्येक दुकानदारांना कार्ड स्वाइप मशीनची गरज होती. या मोहिमेसाठी बँक आॅफ बडोदा यांनी व्यापाºयांकडून दोन हजार रुपये अनामत रक्कम घेऊन ७४ दुकानदारांना स्वाईप मशीन देण्यात आल्या. दुकानदारांनी हे यंत्रही घेतले. मात्र, तीन ते चार महिन्यांनंतर या यंत्राचा वापर कमी झाला.

बँकेने स्वाइप मशीनसाठी वर्षभर कोणतीही फी आकारली नाही. तोपर्यंत दुकानदारांनी हे यंत्र आपल्या दुकानात ठेवले. मात्र, दुकानातील मशीनवर कार्ड स्वाईप करणारे ग्राहकच येत नसल्याने हे यंत्र धूळखात होते. वर्ष उलटल्यानंतर या यंत्रावर महिन्याला ५०० ते ७०० रुपये शुल्क आकारण्यास बँकेने सुरुवात केली.

ग्राहक येतच नसतील तर यंत्रासाठी महिन्याला एवढी रक्कम भरावीच का, हा प्रश्न व्यापाºयांना पडला. राहिलेल्या यंत्रासाठी महिन्याला पैसे भरावे लागत असल्याने ६० हून अधिक दुकानदारांनी ही यंत्रे बँकेला परत केले. त्यामुळे आजच्याघडीला धसईमध्ये ८ केवळ ते १० यंत्र उपलब्ध आहेत.

अनेकवेळा नेटवर्क नसल्याने कार्डद्वारे व्यवहार करणे अवघड जाते. मोजकेच ग्राहक डेबिटकार्डचा वापर करत असल्याने या भागात अपेक्षित असलेली कॅशलेसची मोहीम मंदावली. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, कॅशलेस यंत्रणा आहे असे म्हणणेही चुकीचे ठरेल.

नोटबंदीनंतर धसईला रोखमुक्त गावाचे बिरूद काही दिवसच मिरवता आले. नवलाईचे नऊ दिवस संपले आणि हळुहळु येथील व्यवहार पूर्वीप्रमाणेच रोखीने व्हायला सुरूवात झाली.

Web Title: Cashless machinery in Dhasai got bundled, swiping machine at the shoppers dirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे