ब्रिटिशकालीन कन्या शाळेवर बुलडोझर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 02:50 AM2019-04-21T02:50:18+5:302019-04-21T02:50:33+5:30

डिजिटल शाळेच्या नावाखाली करोडो रुपयांची केली गेलेली खरेदी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आहे की कंपन्यांसह स्वत:च्या चांगभलंसाठी, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

British girl school bulldozer! | ब्रिटिशकालीन कन्या शाळेवर बुलडोझर !

ब्रिटिशकालीन कन्या शाळेवर बुलडोझर !

Next

- सुरेश लोखंडे

डिजिटल शाळेच्या नावाखाली करोडो रुपयांची केली गेलेली खरेदी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आहे की कंपन्यांसह स्वत:च्या चांगभलंसाठी, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ‘शिक्षणाचा हक्क’ कायद्याखाली प्राथमिक शाळांना आठवीचा वर्ग जोडला आहे. त्यात विज्ञान शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती जिल्हा परिषदेने केली नाही. असे असताना डिजिटल शाळेत तज्ज्ञांचा अभाव असेल तर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार तरी कसा. एवढेच नव्हे तर हसतखेळत शिक्षणाच्या नावाखाली सेस फंडाचे करोडो रूपये केवळ कार्ड छापण्यात गेले. त्यांचा विद्यार्थ्यांना एका दिवसाच्या शिक्षणाकरिताही लाभ झाला नाही. विद्यार्थीसंख्येअभावी जिल्ह्यातील ३९० शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असलेल्या ठाणे शहरात बीजे हायस्कूल व माध्यमिक कन्या शाळा आहे. या दोन्ही माध्यमिक शाळा ब्रिटिशकालीन असून जिल्हा परिषदेच्या आहेत. यातील बी.जे. हायस्कूलचे काम मागील चार वर्षांपासून सुरू आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात त्या इमारतीत आपला प्रवेश होईल अशी या विद्यार्थ्यांना अपेक्षा आहेत. सध्या त्यातील विद्यार्थ्यांचे वर्ग कन्या शाळेत भरतात. ब्रिटिशांनी १९४१ मध्ये सुरू केलेली कन्या शाळा आज केवळ तग धरून उभी आहे. जिल्हा परिषद इमारतीच्या जवळच असलेल्या या कन्या शाळेत विद्यार्थिनींची वानवा आहे. पाचवी ते दहावीचे वर्ग असलेल्या या शाळेच्या दोन दुमजली इमारतीपैकी एका धोकादायक इमारतीचा एक मजला पाडावा लागला. तळमजल्यावर वर्ग भरत नसून तेथे आता जिल्हा परिषदेचे मध्यवर्ती अभिलेख कक्ष आहेत.
विद्यार्थिनींच्या संख्येअभावी ही कन्या शाळाच बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बी.जे. हायस्कूलमध्ये या विद्यार्थिनींचा समावेश करून ही शाळा बंद करायची आणि त्या भूखंडाचा मलिदा खायचा डाव असल्याचे बोलले जात आहे. गोरगरिबांच्या मुलींसाठी सुरू केलेली ही शाळा शिक्षण विभागाच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे बंद पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. या दहावीपर्यंतच्या या शाळेत केवळ ४० ते ४२ विद्यार्थिनी आहेत. ग्रामीण भागात विद्यार्थी संख्येसह शाळा डिजिटल करण्याचा दावा करणाºया जिल्हा परिषदेने येथे मात्र काहीच केले नाही. शहरात असूनही जिल्हा परिषदेच्या या शाळेतील विद्यार्थिनी डिजिटल शाळेपासून वंचित आहेत.

ब्रिटिशांनी सुरू केलेली ही कन्या शाळा माध्यमिक आहे. येथे मुलींचे दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. ठाणे शहराचे ऐतिहासिक भूषण असलेल्या या कन्या शाळेत गोरगरिबांच्या मुली शिक्षण घेत आहेत. जुन्या काळच्या दुमजली दोन इमारती, प्रवेशद्वारास लागून शाळेचे कार्यालय, त्यासमोर भले मोठे मैदान, त्यात सांस्कृतिक कार्यक्रमासाठी असलेला रंगमंच अशी प्रशस्त जागा कुणालाही भुरळ पाडणारी आहे. जुन्या बनावटीची ही इमारत ब्रिटिशकालीन राजवटीची साक्षीदार आहे. मैदानात विहीर असून त्यावर स्लॅब टाकलेला आहे. या विहिरीच्या पाण्याचा वापर शाळेकडून केला जात आहे. ब्रिटिशांचे प्रशासकीय कामकाज या ‘श्रीस्थानक’ (ठाण्याचे जुने नाव) येथून सुरू होते.

देशातील पहिल्या रेल्वेचे स्वागत १६ एप्रिल १८५३ साली याच कन्या शाळेच्या विद्यार्थिनी व बी.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यामुळे हा‘ऐतिहासिक ठेवा ’ जतन करणे अपेक्षित आहे. श्रीस्थानकचे ठाणे महानगर झाले आणि आता स्मार्ट सिटी होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यात या ऐतिहासिक शाळेच्या इमारतीचे जतन होणे अपेक्षित आहे. शहरातील महागड्या शाळेत गरिबांच्या मुलींचे शिक्षण होणार नाही. त्यांना या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून सबळ होण्याची संधी देण्याची गरज आहे.

ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात ठाणे जिल्हा परिषदेच्या एक हजार ३३१ शाळा विद्यादानाचे कार्य करीत आहेत. त्यात ८१ हजार ३५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ग्रामीण, डोंगराळ, दुर्गम भागातील गावखेडी रात्रंदिवस विजेच्या लोडशेडिंगने त्रस्त आहेत. त्यात शाळा डिजिटल करण्याचा जिल्हा परिषदेचा अट्टहास हा केवळ खर्चिक आहे. आचारसंहितेच्या काळात या शाळांसाठी संगणकीय साहित्यपुरवठा करण्यात जिल्हा परिषद आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असतानाच डिजिटल शाळांचे संगणकीय साहित्य कधी खरेदी केले आणि ते शाळांपर्यंत कसे पोहोचले, याचे कोडे खुद्द शिक्षण समितीच्या सदस्यांना सतावत आहे.

Web Title: British girl school bulldozer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.