The bribe of employment, the sale of a woman, four offense filed | रोजगाराच्या आमिषाने तरुणीची विक्री, चौघांवर गुन्हा दाखल

कल्याण : रोजगाराचे आमिष दाखवून तरुणीला राजस्थानला नेऊन दीड लाखत विकल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. तरुणीच्या आईने महात्मा फुले चौक पोलिसात तक्रार दिली आहे. त्याआधारे माला शर्मा, विष्णू शर्मा, मनोहर शर्मा, रामेश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दुर्गाडी रेतीबंदर झोपडपट्टीत महिला आणि तिची विवाहित मुलगी राहते. बिगारी कामासाठी मायलेकी दररोज शिवाजी चौकातील कामगार नाक्यावर जात असत. त्यांची ओळख माला शर्मा हिच्याशी झाली. तिने त्यांना कल्याण, भिवंडी येथे काही दिवस मजुरीचे काम मिळवून दिले. आमच्या गावाला मोठे मजुरीचे काम मिळेल, असे आमिष दाखवत दोघींना राजस्थानला नेण्यात आले. तेथे पोहोचल्यावर आईला घरात थांबवून तरुणीला कामानिमित्ताने अन्य ठिकाणी नेण्यात आले.
काही दिवस उलटूनही मुलीचा थांगपत्ता न लागल्याने आईने विचारणा केली. तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तिने अधिक चौकशी केल्यावर जयपूर येथे मुलीला एका व्यक्तीला दीड लाखाला विकल्याचे समजल्यावर तिला धक्काच बसला.