उल्हासनगरात भाजपाच्या सत्तेला ओमींचा हादरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:16 AM2018-04-09T03:16:38+5:302018-04-09T03:16:38+5:30

ज्या ओमी कलानी टीमच्या मदतीमुळे उल्हासनगर पालिकेत भाजपाची सत्ता आली. त्याच ओमी आणि त्यांच्या टीमची कोंडी करत त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे उघड प्रयत्न भाजपातील एका गटाने सुरू केले

BJP's power in Ulhasnagar, ominous quake? | उल्हासनगरात भाजपाच्या सत्तेला ओमींचा हादरा?

उल्हासनगरात भाजपाच्या सत्तेला ओमींचा हादरा?

Next

उल्हासनगर : ज्या ओमी कलानी टीमच्या मदतीमुळे उल्हासनगर पालिकेत भाजपाची सत्ता आली. त्याच ओमी आणि त्यांच्या टीमची कोंडी करत त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे उघड प्रयत्न भाजपातील एका गटाने सुरू केले असून महापौरपद, स्थायी समितीपाठोपाठ आता प्रभाग समित्यांच्या निवडणुकीतूनही त्यांना हद्दपार करण्याची व्यूहरचना पूर्ण झाली आहे. त्यामुळे नाराज असलेला ओमी गट भाजपातून बाहेर पडण्याचा विचार करत असून तसे झाले तर तो भाजपासाठी मोठा हादरा असेल. वेगवेगळ््या तडजोडी करत कशीबशी हाती आलेली उल्हासनगरची सत्ता पक्षातील असंतुष्ट आणि पदांसाठी, आर्थिक लाभांसाठी कोणत्याही थराला जाण्याच्या तयारीतील साई पक्षामुळे घालवण्याची वेळ आली; तर लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांचे परिणाम भाजपाला भोगावे लागण्याची चिन्हे आहेत.
त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नावापुरत्या असलेल्या ज्योती कलानी यांनीही बंडाचे निशाण फडकावले असून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराऐवजी बंड करून ओमी कलानी गटाला जाऊन मिळालेल्या आपल्या निष्ठावंताचा सत्कार करून त्यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या राजकारणातील कलानी-आयलानी संघर्ष तीव्र होऊ लागल्याची लक्षणे दिसून लागली असून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची शिष्टाईही असफल ठरल्याचे दिसून येत आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपाने शिवसेनेच्या सहकार्याने दशकभर सत्ता उपभोगली. मात्र त्यांना महापौरपद मिळाले नाही. त्या महापौरपदासाठी महापालिका निवडणुकीत भाजपाने शिवसेनेऐवजी ओमी कालानी टीमसोबत हातमिळवणी केली. ओमी टीमच्या मदतीमुळे कधी नव्हे ते भाजपाचे ३३ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर सत्तेसाठी जवळ आलेल्या साई पक्षाने पाठिंब्याच्या बदल्यात पालिकेच्या अर्थकारणावर ताबा मिळवत, जुने हिशेब चुकते करत ओमी टीमला खड्यासारखे बाजूला ठेवण्यात भाजपातील असंतुष्टांना मदत केली. सत्ता समीकरणात सव्वा वर्षानंतर ओमी कलानी टीमला मिळणारे महापौरपदही आता मिळते की नाही, याबाबत शंका आहेत.
या टीमला पहिल्या वर्षी कोणतेच मोठे पद मिळू दिले गेले नाही. त्यामुळे नाराज ओमी टीममधील धग शिवसेनेने जिवंत ठेवली. प्रभाग समित्यांसाठी त्यांना मदत केली. आताही प्रभाग १७ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील लढत प्रतिष्ठेची करून त्यात ओमी यांना गुंतवून ठेवत भाजपाच्या जया माखिजा यांना स्थायी समिती सभापतीपदी निवडून आणले. प्रभाग समिती तीन आणि चारच्या सभापतीपदी शिवसेना व साई पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून येतील, यासाठी पाठिंबा दिला. पण ओमीटीम- भाजपाचे वर्चस्व असलेल्या प्रभाग समिती एक- दोनमधील सभापदीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ दिलेली नाही. भाजपाने ओमी टीमविरोधात उमेदवार रिंगणात उतरवून त्यांची कोंडी केली.
>ज्योती यांचेही पक्षाला इशारे
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष पदावर असलेल्या आमदार ज्योती कलानी यांनी शनिवारी पक्षाच्या विजयी नगरसेवक सुमन सचदेव यांच्याऐवजी पक्षात बंडखोरी केलेले कलानीनिष्ठ नगरसेवक सतरामदास जेसवानी यांचा सत्कार केला. या प्रकारामुळे ज्योती या कागदोपत्री राष्ट्रवादीत असल्या, तरी भाजपाचे उमेदवार कुमार आयलानींविरोधात विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी कलानी कुटुंबीय तयारीला लागल्याचे त्यातून स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांनी आमदार व शहराध्यक्ष ज्योती कालानी यांच्यावर कारवाईची मागणी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.
स्वबळाची सत्ता पणाला
सत्ता मिळाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून ओमी टीमचे पद्धतशीर खच्चीकरण सुरू असल्याने भाजपा हा आपल्या गरजेपुरता मित्र पक्षांचा वापर करणारा पक्ष असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खास करून सिंधी समाजातील कलानी यांचा पाठीराखा मानला गेलेला गट अस्वस्थ आहे.
ओमी यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे प्रयत्न असेच सुरू राहिले, तर त्यांचा गट भाजपातून फुटून बाहेर पडू शकतो. तसे झाले तर तो भाजपाला मोठा धक्का असेल. विशेषत: शत-प्रतिशतचे नारे देताना याचे उत्तर पक्षाला द्यावे लागेल.
‘ओमी यांनी कृती करावी. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,’ असे सांगत शिवसेनेने यापूर्वीच आपले पत्ते उघड केले आहेत. जर या पद्धतीने सत्तापालट झाला आणि पदे मिळणार असतील, तर शिवसेनेसोबत असलेले इतर पक्षही त्यांच्यासोबत जाण्याची चिन्हे आहेत.
भाजपातील कलानीविरोधक आणि साई पक्षाची मात्र या घडामोडींत प्रचंड कोंडी होईल. शब्द देऊनही पक्षातील एखाद्या गटाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा परिणाम काय होऊ शकतो, याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.

Web Title: BJP's power in Ulhasnagar, ominous quake?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.