भाजपाची मग्रुरी कायम; हेमंत म्हात्रे यांना बजावली नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:56 PM2018-12-14T23:56:36+5:302018-12-14T23:57:17+5:30

मंडपाचे उर्वरित शुल्क न भरण्यावर ठाम

BJP retreats; Notice issued to Hemant Mhatre | भाजपाची मग्रुरी कायम; हेमंत म्हात्रे यांना बजावली नोटीस

भाजपाची मग्रुरी कायम; हेमंत म्हात्रे यांना बजावली नोटीस

Next

मीरा रोड : सत्ताधारी भाजपाकडून सीएम चषकासाठी सुभाषचंद्र बोस मैदानात उभारलेल्या मंडप व बॅनरचे उर्वरित आठ लाख २६ हजार रुपये त्वरित भरा अशी नोटीस पालिकेने भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांना बजावली आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणी सतत केलेला पाठपुरावा व विविध पक्ष, सामाजिक संस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर पालिकेने ही नोटीस बजावली आहे. परंतु मगरूर भाजपाने शुल्क न भरणार नाही असे आव्हान पालिकेला दिले आहे.

दंड न भरल्यास मंडप उखडण्याची भाषा करणारे पालिका आयुक्त शुल्क वसुल न करता कारवाईस चालढकल करत आहे, असे बोलले जात आहे. नागरिकांवर पाणीपट्टी व कर वाढवणाऱ्या तसेच कर वसुलीसाठी कारवाई करणाºया महापालिकेतील सत्ताधाºयांकडूनच लाखोंचा महसूल भरला जात नसल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

लहान - मोठ्यांना खेळण्यासाठी मोकळे ठेवलेले बोस मैदान आयुक्त बालाजी खतगावकर यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा हवाला देऊन पुन्हा भाड्याने देण्यास सुरूवात करून वाद निर्माण केला. सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली शाळा व संस्थांच्या मागणी अर्जांना केराची टोपली दाखवत प्रभाग अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांनी सीएम चषकासाठी १,२ व ५ डिसेंबर ; ९ ते २० डिसेंबर व २२ ते २९ डिसेंबर असे तब्बल २३ दिवस मैदान आंदण दिले. या वरुन खतगावकर यांच्यावर टीकेची झोड उठली व तक्रारी झाल्या आहेत. पण पालिकेने अद्याप काहीच कारवाई केली नाही.

मैदानात एक डिसेंबरपासून तब्बल नऊ मंडप बांधून तयार करण्यात आले. या विरोधात ‘लोकमत’मध्ये वृत्त येताच भाजपा जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांनी दिलेल्या पत्रानुसार फक्त सात दिवसाचेच दोन लाख ६२ हजार इतके मंडप शुल्क घेण्यात आले. वास्तविक १ ते २९ डिसेंबरपर्यंत मैदानात मंडप राहणार असताना उर्वरित २२ दिवसांचे शुल्क भरलेच नाही. वास्तविक एक तारखेच्या आधीपासून मंडप उभारण्याचे काम सुरू होते. त्याचे शुल्क तर दूरच पण १ ते २९ पर्यंतचे मंडप शुल्कही भरणार नाही असा तोरा भाजपाने दाखवला. त्यातच बॅनरचेही शुल्क कमी भरले.

शाळा - संस्थांना डावलून मैदान भाड्याने देणे व पालिकेचे काही लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी आयुक्त व प्रभाग अधिकाºयांवर कारवाई करा, मंडपाचे संपूर्ण शुल्क वसुल करा अन्यथा मंडप काढून टाका, मैदान भाड्याने देणे बंद करा अशा मागण्या व तक्रारी काँग्रेस, मनसे, जनता दल (से.),राष्ट्रवादी काँग्रेससह सत्यकाम फाऊंडेशन, जिद्दी मराठा आदी सामाजिक संस्थांनी चालवल्या आहेत.

आयुक्तांचा आदेश
आता प्रभाग अधिकारी कुलकर्णी यांनी आयुक्तांच्या निर्देशानंतर म्हात्रे यांना मैदान जितके दिवस भाड्याने आहे तितक्या दिवसांचे मंडप शुल्क भरण्यास सांगितले आहे. २३ दिवसांचे १० लाख ८५ हजार ७८५ रूपये तर बॅनरचे चार हजार १०६ रुपये होतात. त्यापैकी भरलेले शुल्क वजा करून उर्वरित आठ लाख २६ हजार ६७१ रुपये भरणा बाकी असून तो त्वरित भरावा असे बजावले आहे. परंतु भाजपाने पैसे भरणार नाही असे आव्हान पालिकेला दिले असून आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

कार्यक्रम सात दिवसांचाच असल्याने तेवढ्याच दिवसाच्या मंडपाचे पैसे भरले आहेत. उर्वरित दिवसांच्या पैशाबद्दल पालिकेला पत्र देणाार आहोत. - हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजपा

Web Title: BJP retreats; Notice issued to Hemant Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.