भाजप आमदार संजय केळकर यांनी घेतली ठाकरे गटाचे विचारेंच्या देवीचे दर्शन

By अजित मांडके | Published: April 17, 2024 10:23 PM2024-04-17T22:23:23+5:302024-04-17T22:23:35+5:30

राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींच्या भुवया उंचावल्या

BJP MLA Kelkar took darshan of Thackeray's goddess of thought | भाजप आमदार संजय केळकर यांनी घेतली ठाकरे गटाचे विचारेंच्या देवीचे दर्शन

भाजप आमदार संजय केळकर यांनी घेतली ठाकरे गटाचे विचारेंच्या देवीचे दर्शन

ठाणे: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप सुरू असताना, ठाकरे गटाचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाजप आमदार संजय केळकर यांनी बुधवारी सायंकाळी आवर्जून हजेरी लावत देवीला साकडे घातले. यावेळी ठाणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विचारे यांनी इच्छुक उमेदवार संजय केळकर यांचा सत्कार केला. या भेटीने राजकीय पक्षातील नेत्यांच्या चांगल्याच भुयया उंचावल्या गेल्या आहेत. नवमीला अशाप्रकारे केळकर यांनी अचानक भेट दिल्याने चर्चेला उधाण आले. 

ठाणे लोकसभा मतदारसंघावरून शिंदे सेना आणि भाजप या पक्षांनी दावा लावून धरल्याने तिढा वाढलेला आहे. महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर न करता प्रचाराचा धुरळा उडवला आहे. त्यातच इंडिया आघाडीकडून उमेदवार म्हणून राजन विचारे यांचे नाव जाहीर करून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली. याशिवाय भाजपने हा मतदारसंघ खेचण्यासाठी अद्यापही जोर लावलेला आहे. तर भाजपकडून इच्छुकांच्या यादीत माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावे आघाडीवर आहेत. तर शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्हायरल पत्रकाने त्यांचे नाव उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

मात्र भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात राजन विचारे यांच्या वतीने आयोजित केलेल्या चैत्र नवरात्रोत्सवाच्या नवमीला सायंकाळी हजेरी लावत, देवीचे दर्शन घेत देवीला साकडे घातले. यावेळी आयोजक राजन विचारे यांनी आमदार केळकर यांच्या स्वागत करून शाल श्रीफळ देत जाहीर सत्कार केला. एकाच लोकसभेचे परस्पर विरोधक इच्छुक आणि उमेदवारांच्या या भेटीने राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींच्या चांगल्या भुयया उंचावल्या आहेत. त्यामुळे ही देवी नेमकी कोणाला पावणार हेच पाहावे लागणार आहे.

Web Title: BJP MLA Kelkar took darshan of Thackeray's goddess of thought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.