भाजपा नगरसेवकाने चोरली फाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:12 AM2018-05-13T06:12:02+5:302018-05-13T06:12:02+5:30

पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फाइलचोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना शनिवारी अटक करण्यात आली

BJP corporator stole files | भाजपा नगरसेवकाने चोरली फाइल

भाजपा नगरसेवकाने चोरली फाइल

Next

उल्हासनगर : पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फाइलचोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांना शनिवारी अटक करण्यात आली. शुक्रवारी रात्री फाइलचोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार शहर अभियंता महेश शितलानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
फाइल चोरी उघड होताच उल्हासनगर पालिकेत चालले आहे काय, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली. सत्ताधारी भाजपा-ओमी टीम व साई पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊन शहराचा विकास ठप्प झाल्याचा आरोप होत असताना सत्ताधारी भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी फाइल चोरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास बांधकाम विभागाच्या कार्यालयात भाजपाचे स्वीकृत नगरसेवक रामचंदानी, कंत्राटदार शशांक मिश्रा व अभियंता जितू चोयथानी गप्पा मारत होते. बोलणे झाल्यावर तिघेही कार्यालयाबाहेर गेले. मात्र, रामचंदानी पुन्हा फोनवर बोलत तेथे आले आणि त्यांनी कार्यालयाचे कपाट उघडून एक फाइल काढली. ती शर्टमध्ये लपवून ते कार्यालयाबाहेर पडले, असे या व्डिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला. त्यानंतर रामचंदानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली. शहर अभियंता शितलानी यांनी आयुक्त पाटील यांना माहिती दिल्यावर, त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे आदेश दिले. शितलानी, संदीप जाधव यांनी फाइलचोरीची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून रामचंदानी यांना अटक केल्याने शहर भाजपाची अब्रू गेली आहे.
मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनसेचे कामगार नेते दिलीप थोरात यांनी कारवाईची मागणी केली आणि सोमवारी गेट बंद आंदोलन करणार असल्याचे सांगितले. शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते दिलीप मालवणकर यांनी पालिकेत भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करून लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडील वर्ग-१ व २ च्या पदाचा पदभार त्वरित काढून घेण्याची मागणी केली.

फाइलचोरीचे अनेक किस्से सतत चर्चेत
महापालिकेत फाइलचोरीची ही काही नवी घटना नाही. यापूर्वीही फाइलचोरीचे अनेक प्रकार झाले आहेत. नगररचनाकार विभागातील फाइल चक्क घरी नेल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वीच घडला होता. अशा अधिकाºयावर कारवाई होण्याऐवजी तत्कालीन आयुक्तांनी त्यांना विशेष पद दिले. अनेक विभागांतील फायली गायब असून यामध्ये नगररचनाकार, बांधकाम, कर, पाणीपुरवठा विभाग सर्वाधिक पुढे आहे.एखाद्या सनदेच्या आधारे पालिकेच्या अनेक इमारतींना दिलेल्या बांधकाम परवान्यांची फाइल गायब होण्याचा प्रकारही शहराला नवा नाही. अशी परवानगी देऊन इमारत उभी राहिली आणि ती वादग्रस्त ठरली किंवा तिच्या चौकशीची वेळ आली की संबंधित परवानगीची फाइलच गायब केली जाते. त्यामुळे कोणी परवानगी दिली ते कधीच उघड होत नाही आणि ती इमारत वापरात येते. दिमाखात तशीच उभी राहते. अशी अनेक प्रकरणे घडूनही त्याबाबात कधीच कोणावर कारवाई झालेली नाही.आमदार ज्योती कलानी यांनी रामचंदानी यांचे नगरसेवकपद रद्द करा आणि त्यांनी, त्यांच्या मुलाच्या नावे गेल्या दहा वर्षांत मिळवलेल्या सर्व ठेक्यांची चर्चा करा, अशी मागणी केली आहे. याच रामचंदानी यांनी ओमी कलानी यांना भाजपामध्ये आणण्यास पुढाकार घेतला होता.

Web Title: BJP corporator stole files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.