बदलापूरच्या तलावांनाही देखभालीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 04:52 AM2019-02-19T04:52:32+5:302019-02-19T04:52:48+5:30

बदलापुरातील गावदेवी तलाव हा शहराच्या मध्यभागी असलेला मोठा तलाव. या तलावाच्या चारही बाजूंना मोठी लोकसंख्या आहे.

Badlapur ponds need maintenance | बदलापूरच्या तलावांनाही देखभालीची गरज

बदलापूरच्या तलावांनाही देखभालीची गरज

Next

अंबरनाथच्या तुलनेत बदलापूरमधील तलावांची स्थिती ही काही प्रमाणात बरीच म्हणावी लागेल. शहरातील मध्यवर्ती भागात असलेले तलाव हे नागरिकांना फिरण्यासाठीचे महत्त्वाचे ठिकाण झाले आहे. मात्र, या तलावांची स्थिती ही दयनीय झाली आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी सुशोभीकरण केलेल्या तलावांची पुरती दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बदलापूरमधील तलावांच्या स्थितीकडे पालिकेला लक्ष देण्याची वेळ आली आहे.

बदलापुरातील गावदेवी तलाव हा शहराच्या मध्यभागी असलेला मोठा तलाव. या तलावाच्या चारही बाजूंना मोठी लोकसंख्या आहे. चारही बाजूंना टोलेजंग इमारती झाल्याने प्रत्येकाला फिरण्यासाठी हाच तलाव पसंतीस उतरत आहे. सकाळी आणि सायंकाळी या तलावाच्या परिसरात भटकंती करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तलावाचे महत्त्व लक्षात घेऊन पालिकेने या तलावातील गाळ काढण्याचे आणि संरक्षक भिंत बांधण्याचे कामही केले. मात्र, असे असले तरी त्या तलावाच्या देखभालीकडे आता सातत्याने दुर्लक्ष होत आहे. तसेच तलावात होणारी घाण नियमित काढली जात नाही. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाणही वाढत आहे. तलावाची स्वच्छता केल्यास हा परिसर नागरिकांच्या आणखी पसंतीस उतरण्यास मदत होणार आहे. मंदिराच्या शेजारी गावदेवी मंदिर आणि शिव मंदिर आहे. त्यामुळे भाविकांची या दोन्ही मंदिरांत गर्दी होत असते. मात्र, मंदिरातील निर्माल्य हे थेट तलावात टाकून भाविक निघून जात असल्याने तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पूर्वी या तलावातून कोणतीही दुर्गंधी येत नव्हती. मात्र, तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने ही दुर्गंधी वाढत आहे. तलावाच्या परिसराच्या सुशोभीकरणाचे कामही करण्याची गरज ग्रामस्थ व्यक्त करत आहे. शहरातील नागरिकांनाही भटकंतीसाठी या तलावाच्या ठिकाणी यावे असे वाटावे, अशी परिस्थिती निर्माण करण्याची गरज आहे. मात्र, तलावाच्या चारही बाजूंना होणारी घाण, तलावातील पाण्यात विषारी द्रव्यांचे वाढते प्रमाण यामुळे तलावातील मासेही मृत पावण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. तलावातील पाण्याची स्वच्छता ठेवण्यासाठी पालिकेने उपाययोजना आखण्याची गरज आहे.

बदलापूर स्थानकाला लागूनच असलेल्या महालक्ष्मी तलावाचे सुशोभीकरण हे पालिकेच्या वतीने करण्यात आले होते. सुशोभीकरणानंतर या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने येत होते. सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. अनेक नागरिक या ठिकाणी स्वच्छ हवेत बसण्यासाठी येत होते. सुशोभीकरणाचा फायदाही नागरिकांना झाला. मात्र, सुशोभीकरण केल्यानंतर त्याची नियमित देखरेख झाली नाही. एकदाच खर्च केल्यावर पुन्हा या ठिकाणी पालिकेने ढुंकूनही पाहिले नाही.
देखभाल दुरुस्तीअभावी या तलावाची पुरती दुरवस्था झाली आहे. दिवेदेखील बंद असल्याने कुणी नागरिक या ठिकाणी रात्रीच्या वेळी जात नाहीत. नागरिकांचा वावर कमी होताच या ठिकाणी मद्यपींचे अड्डे तयार होतात. या तलावातील पाण्याची देखरेख केली जात नाही. सर्वत्र कचरा पडत असल्याने पाण्यालाही दुर्गंधी येत आहे. त्यामुळे या तलावाकडे येणाºयांची संख्याही घटली आहे. त्यामुळे या तलावाला पुन्हा नव्याने जिवंत करण्याची वेळ पालिकेवर आली आहे.
बदलापूर शहराला ज्या गावामुळे ओळख मिळाली, त्या बदलापूर गावातील तलावाकडे पालिकेचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी बदलापूर गावातील तलावांचे सुशोभीकरण करण्यासाठी आणि संरक्षक भिंतीचे कामही सुरू केले होते. मात्र, हे कामही अर्थवट अवस्थेत राहिले. त्यातच, तलावातील गाळ काढणे आणि त्याची स्वच्छता करणे, हे कामही रखडलेल्या अवस्थेत आहे. या तलावात आजही मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तलावाच्या शेजारी आता नव्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मात्र, तलाव अजूनही दुर्लक्षित आहे. या तलावाचे सुशोभीकरण करावे, ही बदलापूरच्या ग्रामस्थांची मागणी सातत्याने राहिली आहे. मात्र, आजही हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे या तलावाकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

बदलापूर येथील शिरगाव परिसरातील डोंगरावरून वाहणारे पाणी तलावात साचत आहे. हा तलाव पावसात भरून वाहतो. मात्र, त्यानंतर या तलावाकडे कुणाचेच लक्ष नाही. आहे त्या स्थितीतच हा तलाव आहे. या तलावाची देखरेख केल्यास हा तलाव बदलापूरमधील नागरिकांसाठी आकर्षण ठरू शकतो. मात्र, त्या तलावाच्या बाबतीत पालिका प्रशासन उदासीन दिसत आहे.

शहराच्या सौंदर्याकडे होतेय दुर्लक्ष
नागरिकांना विरंगुळा म्हणून सुविधा देणे, हे पालिकेचे कर्तव्य आहे. पण, याचा बदलापूर पालिकेला विसर पडलेला आहे. म्हणूनच, शहरातील तलावांकडे दुर्लक्ष झाले आहे. एकेकाळी नागरिक तेथे फिरायला येत असत. मात्र, जशी या तलावांची दुरवस्था झाली, तसे नागरिकांचे तेथे येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पुन्हा या तलावांकडे सामान्यांना आणायचे असेल, तर त्यांच्या सौंदर्यीकरणावर भर देणे गरजेचे आहे.

घाणीच्या साम्राज्यात तलाव
अंबरनाथमधील दुसरे तलाव म्हणजे बुवापाडा येथील तलाव. तसा हा तलाव खदान म्हणून ओळखला जातो. पूर्वी या ठिकाणी दगडखाण असल्याने या दगडखाणीत हे तलाव निर्माण झाले आहे. मात्र या तलावात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे योग्य नियोजन केल्यास ते तलाव देखील सुंदर करणे शक्य आहे. मात्र या तलावाच्या परिसरात बुवापाडा सारखी वस्ती असल्याने तलावाच्या ठिकाणी कचरा आणि दुर्गंधीचे प्रमाण जास्त आहे. उघड्यावर शैचास जाणारे हे या तलावाच्या परिसरातच जात असल्याने तलाव घाणीच्या साम्राज्यात सापडले आहे. त्यामुळे या तलावाच्या परिसराची स्वच्छता करुन आणि तलावातील गाळ काढून हे तलाव लोकांसाठी एक चांगले ठिकाण म्हणून तयार करणे शक्य आहे. यातील गाळ काढण्यासंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याचे काम अजुनही झालेले नाही. त्यामुळे हा तलाव दुर्लक्षित तलाव आहे.

कात्रप तलावात गाळ
बदलापूर शहरातील महत्त्वाचे गाव म्हणजे कात्रप. या गावाला लागूनच कात्रप तलावही आहे. मात्र, हा तलाव पूर्णपणे दुर्लक्षित राहिला आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने हा तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या तलावाची योग्य निगा राखल्यास हा तलावही बदलापूरच्या सौंदर्यात भर पाडणारा ठरेल. त्यासाठी पालिकेची जबाबदारी ही महत्त्वाची असून त्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
 

Web Title: Badlapur ponds need maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.