एटीएम हँग करून फसवणूक करणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:51 AM2018-05-12T04:51:17+5:302018-05-12T04:51:17+5:30

एटीएम हँग करून लोकांची फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींमध्ये बॉलीवूडच्या एका निर्मिती व्यवस्थापकाचाही समावेश असून

ATM hang up gang cheating gang | एटीएम हँग करून फसवणूक करणारी टोळी गजाआड

एटीएम हँग करून फसवणूक करणारी टोळी गजाआड

Next

ठाणे : एटीएम हँग करून लोकांची फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींमध्ये बॉलीवूडच्या एका निर्मिती व्यवस्थापकाचाही समावेश असून, त्यांच्याकडून २६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले.
वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून, बँक ग्राहकांना लुबाडण्यामध्ये या प्रकरणातील आरोपी सराईत आहेत. एटीएम हँग करायचे किंवा ग्राहकाच्या नकळत त्याचे एटीएम कार्ड बदलायचे, या दोन युक्त्यांचा वापर आरोपींकडून केला जात होता. फसवणुकीसाठी आरोपी मुख्यत्वे ग्राहकांची गर्दी असलेले एटीएम निवड असत. आरोपी एटीएमवर पैसे काढण्यासाठी असलेल्या ग्राहकांच्या रांगेत उभे राहायचे. समोरचा ग्राहक पैसे काढत असताना, आरोपी दोन बोटांमध्ये स्वत:चे कार्ड पकडून कार्डाच्या मागील बोटाने एटीएमचे विशिष्ट बटन सतत दाबायचे. त्यामुळे एटीएम हँग होऊन ग्राहकाचे पैसे निघत नसत. त्या वेळी आरोपी मदतीसाठी पुढे येत असत. आरोपी स्वत:चे कार्ड स्वाइप केल्याचे भासवून प्रत्यक्षात ग्राहकाच्या खात्यातूनच पैसे काढत असत. काही ठिकाणी एटीएम हँग करून गडबडीत ग्राहकांचे एटीएम कार्ड बदलण्याचे प्रकारही आरोपींनी केले आहेत. ग्राहकांना लुटणाºया या टोळीची माहिती ठाण्यातील वागळे युनिट गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली. ठाण्यातील अहमदाबाद मार्गावरील नायगाव येथे आरोपी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपींना नायगाव परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँकांचे १३ एटीएम कार्ड हस्तगत केले. आरोपींनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत अशा प्रकारचे २६ गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

साथीदारांचा शोध सुरू
या टोळीमध्ये आणखी साथीदार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी संतोष गिरी हा फिल्म सिटीमध्ये निर्मिती व्यवस्थापक म्हणून काम करतो. फिल्म सिटीसाठी व्हॅनिटी व्हॅन, वेगवेगळ्या कामांसाठी लागणारी मुले आणि लाइटची व्यवस्था पुरविण्याचे कामही तो करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमिताभ उर्फ आफताब जाहीर आलम खान, संतोष ओमप्रकाश गिरी, कमलेश बिकर्माजित यादव, विजय ओमप्रकाश पांडे, आलोक योगेंद्रप्रताप सिंग आणि अहमद हुसेन आलमगीर खान ही या प्रकरणातील आरोपींची नावे असून, ते मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत वास्तव्यास आहेत. सर्व आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून, अमिताभ याच्याविरुद्ध उत्तर प्रदेशात फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्याला उत्तर प्रदेशातून तडीपारही केले होते. त्यामुळे आरोपींनी उत्तर प्रदेशातून बाहेर पडल्यानंतर मुंबई, ठाण्यात फसवणुकीचा धंदा सुरू केला.

Web Title: ATM hang up gang cheating gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.