"आपले सरकार येताच कोरोना गेला पळून"; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 06:52 AM2023-11-14T06:52:05+5:302023-11-14T06:52:25+5:30

दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते.

As soon as our government came, Corona ran away; CM Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | "आपले सरकार येताच कोरोना गेला पळून"; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

"आपले सरकार येताच कोरोना गेला पळून"; एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

ठाणे : आपले सरकार आले आणि कोरोनाच पळून गेला, मी बैठक घेतलीच नाही, मी फक्त माहिती घेत होतो. मी बैठका घेत बसलो असतो तर कोरोनाचा बाऊ वाढला असता. काही लोकांना तो हवा होता, तर काही लोकांना तो नको होता. हवा असलेल्यांसाठी मी बैठकच घेतली नाही. त्यावरदेखील टीका झाली. बैठक न घेता जे काही करायचे ते मी केले आणि शेवटी कोरोनाला जावेच लागले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. 

विराट सामाजिक, सांस्कृतिक मंच आणि रंगाई आयोजित ‘रंगात रंगली दिवाळी’ या खास दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून ठाणेकर रसिकांशी संवाद साधला. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी अतिशय आनंदाने ठाणेकर सण, उत्सव साजरे करीत आहेत. ही आपली संस्कृती आहे, ती जपलीच पाहिजे, असेही ते म्हणाले.

राज्य कारभार करताना कोण काय बोलेल, कधी काय होईल काही सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही नेहमी गॅसवर असतो, असे सांगून शिंदे म्हणाले की, कोरोना काळात अनेकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याकाळी ज्यांनी ज्यांनी काम केले, त्यांचे अभिनंदन केले.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’मधील लोकप्रिय अभिनेते समीर चौगुले आणि ‘आई कुठे काय करते’ मालिकेतून घरोघरी पोहोचलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले यांचेदेखील कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी निवेदिका वीणा गवाणकर, ठाणेकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाण्यातील  रसिकांचे कौतुक

ठाणेकर हा जसा रसिक आहे, तसा तो संवेदनशीलदेखील आहे. जेव्हा काही प्रसंग येतो, तेव्हा तो सर्वप्रथम खंबीरपणे उभा राहतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गडकरी रंगायतन कसे उभे राहिले याची आठवण त्यांनी सांगितली. तसेच  बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. जे काही करेन, ते जनतेच्या हिताचेच करेन, असा विश्वास देत त्यांनी सर्वांसाठी सर्वसमावेशक काम करण्याची इच्छा असून, तुमचे बळ माझ्यासोबत असावे, अशी इच्छा व्यक्त केली. तुम्ही पुढील १० वर्षे मुख्यमंत्री राहाल आणि दिवाळी पहाटला याल, अशी अपेक्षा कलाकरांनी व्यक्त केली. त्यावर मी किती काही ठरविले तरी ते जनतेच्या हातात आहे, असे शिंदे म्हणाले.

Web Title: As soon as our government came, Corona ran away; CM Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.