ठाणे : भविष्यात हायवे टू हायवे धावणारी मेट्रो अंतर्गत वाहतूकही करणार असून, त्यासाठी ठाणे पालिका प्रयत्न करते आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत अंतर्गत मेट्रो सेवा विकसित करण्यासाठी आणि या सेवेचा तांत्रिक सुसाध्यता अहवाल व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महामेट्रोची नेमणूक करण्यात आली आहे.
तिच्या अहवालावर तीन कोटी ५४ लाखांचा खर्च होणार असून, ही रक्कम पालिका पादचारी पूल-सबवे यातून या कामासाठी वर्ग करणार आहे. हा प्रकल्प लाइट रेल ट्रान्झिट प्रकल्प म्हणून ओळखला जाणार असून, त्याचा फायदा वागळे, लोकमान्यनगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांसाठी होणार आहे.
ठाण्यात कासारवडवलीपर्यंत मेट्रो धावणार आहे. यात मॉडेला चेकनाका ते कासारवडवली हे १०.६० किमीचे अंतर आहे. कापुरबावडी - ठाणे - भिवंडी -कल्याण असा अन्य मार्गसुद्धा प्रस्तावित आहे. त्यातील दोन स्थानके कापुरबावडी व बाळकुम येथे प्रस्तावित आहेत. दोन्ही मेट्रो रेल या कापुरबावडीत एकत्र येतील.
ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाने एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सपोर्ट रुट)चा मार्ग शहरात १९९९ मध्ये मंजूर केला आहे. रिंग रूट पद्धतीने या मार्गावरून प्रवास केल्यास शहरातील कोणत्याही भागात प्रवास करणे नागरिकांना शक्य होणार आहे. या रुटसाठी आतापर्यंत महापालिकेच्या ताब्यात सुमारे नऊ हेक्टर जमीन आली आहे. सुमारे साडेसहा हजार हेक्टर जमीनिवर अतिक्र मण आहे.
काही ठिकाणी सीआरझेडचा अडथळा आहे; परंतु मार्ग निश्चित करण्यात आल्याने प्रवासासाठी अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आला आहे. महासभेचीदेखील मंजुरी घेण्यात आली असून, येत्या काही दिवसांत महामेट्रो कंपनीकडून सर्व्हेचे काम सुरू होणार आहे.
अंतर्गत प्रवासासाठी मेट्रो चालविण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत, खर्च, कालावधी, त्यामुळे किती वेगाने किती प्रवाशांची वाहतूक शक्य होईल, याचा अहवाल सादर केला जाणार आहे. शहरातील एचसीएमटीआरच्या मार्गावरून नक्की कोणत्या वाहनातून प्रवास करायचा याचा निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. त्यामुळेच आरक्षण असलेल्या या जागेवर कोणतेही काम सुरू करण्यात आलेले नाही. अशावेळी महामेट्रो कंपनीच्या वतीने महापालिकेला किफायतशीर असा सर्व्हे मिळाल्यास भविष्यात ठाणेकरांना मेट्रोचा किफायतशीर प्रवासाची हमी मिळण्याची शक्यता आहे.
>शहरातील या भागांना होणार फायदा
अंतर्गत मेट्रो सेवेचा शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, पोखरण १, २ व मानपाडा आदी भागांना फायदा होणार आहे. या भागातील लोकवस्ती वाढत असल्याने त्यांना या किफायतशीर वाहतुकीचा फायदा होणार आहे. शिवाय प्रस्तावित मनोरुग्णालयाजवळील नवीन रेल्वे स्थानकाला हा मार्ग जोडता येणे शक्य असल्याने ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.