अँड्रॉइड ओ: टॉप १० फिचर्स; कोणत्या स्मार्टफोनवर वापरता येणार ?

By शेखर पाटील | Published: August 22, 2017 02:56 PM2017-08-22T14:56:59+5:302017-08-22T14:59:30+5:30

अँड्रॉइड ओ या प्रणालीच्या नामकरणासह ही आवृत्ती अधिकृतरित्या लाँच करण्यात आली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील महत्वाचे १० फिचर्स

top 10 features of android o | अँड्रॉइड ओ: टॉप १० फिचर्स; कोणत्या स्मार्टफोनवर वापरता येणार ?

अँड्रॉइड ओ: टॉप १० फिचर्स; कोणत्या स्मार्टफोनवर वापरता येणार ?

अँड्रॉइड ओ या प्रणालीच्या नामकरणासह ही आवृत्ती अधिकृतरित्या लाँच करण्यात आली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील महत्वाचे १० फिचर्स खालीलप्रमाणे आहेत.

१) सुलभ नोटिफिकेशन्स:- अँड्रॉइड ‘ओ’मध्ये नोटिफिकेशन्सचे विविध विषयांनुसार वर्गीकरण (उदा. तंत्रज्ञान, क्रीडा, राजकारण,सिनेमा आदी) करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यामुळे नोटिफिकेशन्सचे उत्तम रितीने वर्गीकरण व नियंत्रणही करता येईल.

२) पिक्चर-इन-पिक्चर:- ‘अँड्रॉइड ओ’ या आवृत्तीत पिक्चर-इन-पिक्चर हे फिचर देण्यात आले असून याच्या मदतीने कुणीही युजर एकचदा दोन व्हिडीओज पाहू शकतो. यात एक व्हिडीओ मिनीमाईज करून तो अन्य अ‍ॅप्लीकेशनच्या मदतीने नंतर पाहण्याची सुविधादेखील मिळणार आहे.

३) दीर्घ काळ चालणारी बॅटरी:- अँड्रॉइडच्या ‘ओ’ या आवृत्तीमध्ये बॅकग्राऊंडला सुरू असणार्‍या अ‍ॅप्लीकेशन्सला बंद करण्याची अंतर्गत व्यवस्था असल्याने या आवृत्तीवर चालणार्‍या स्मार्टफोन्सची बॅटरी तुलनेत दीर्घ काळापर्यंत चालू शकेल.

४) दर्जेदार ध्वनी:- ‘अँड्रॉइड ओ’ या आवृत्तीत सोनी एडीएसी कोडेक्ससारख्या अत्याधुनिक हाय-फाय ब्ल्यु-टुथ ऑडिओ कोडेक्सचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या ध्वनीची अनुभुती शक्य आहे.

५) सुलभ नेव्हिगेशन:- अँड्रॉइड ओ आवृत्तीमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कि-बोर्ड नेव्हिगेशन प्रणाली आहे. यात अ‍ॅरो आणि टॅब या किजच्या मदतीने कुणीही युजर अत्यंत सुलभ पध्दतीने विविध अ‍ॅप्लीकेशन्सचा वापर करण्यासाठी ‘नेव्हिगेट’ करू शकेल.

६) नवीन आयकॉन्स:- या आवृत्तीचा इंटरफेस हा दिसण्यासही अत्यंत आकर्षक असाच राहणार आहे. यासाठी यात ‘अ‍ॅडॉप्टीव्ह आयकॉन्स’ प्रदान करण्यात आले आहे. यात स्मार्टफोनच्या इंटरफेसशी सुसंगत असे आयकॉन्स युजरला प्रदान करण्यात आले आहेत.

७) ऑफलाईन मॅसेजींग:- या आवृत्तीत ‘वाय-फाय अवेअर’ हे विशेष फिचर प्रदान करण्यात आले आहे. याला ‘नेबर अवेअरनेस नेटवर्कींग’ अर्थात ‘नान’ही म्हटले जाते. याच्या मदतीने अँड्रॉइडधारक हे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नसतांनाही एकमेकांना मॅसेंजरच्या माध्यमातून संदेश अथवा फाईल्सची देवाण-घेवाण करू शकतात.

८) लॉक स्क्रीन कस्टमायझेशन:- अँड्रॉइडच्या या नवीन आवृत्तीत लॉक स्क्रीनचे कस्टमायझेशन सुलभ पध्दतीने करता येणार आहे. यातून युजर सहजपणे आपल्याला हव्या त्या अ‍ॅप्लीकेशनला लॉक स्क्रीनवर ठेवू शकतो. यासाठी यात शॉर्ट-कट प्रदान करण्यात आले आहेत.

९) ऑटो फिल सपोर्ट: यात ‘ऑटो फिल’ या विशेष फिचरचा सपोर्टही असेल. याच्या मदतीने युजरला अ‍ॅप्लीकेशन्ससह संपूर्ण ऑपरेटींग सिस्टीमसाठी पासवर्डचे संरक्षक कवच मिळणार आहे. यामुळे विविध अ‍ॅप्लीकेशन्सच नव्हे तर संपूर्ण स्मार्टफोनचा वापर सुरक्षितपणे करता येणार आहे.

१०) थर्ड पार्टी कॉलिंग अ‍ॅप्सचा सपोर्ट:- अँड्रॉइड ओ या आवृत्तीमध्ये गुगलने ‘टेलकॉम फ्रेमवर्क’ हे फिचर दिले आहे. याच्या मदतीने थर्ड पार्टी कॉलिंग अ‍ॅप्सचा वापर करून (उदा. व्हाटसअ‍ॅप, हाईक, फेसबुक मॅसेंजर आदी) युजर एकमेकांशी बोलू शकतील.

याशिवाय अँड्रॉइड ओ या आवृत्तीत अनेक महत्वाच्या फिचर्सचा समावेश आहे. यात सुधारित आणि आकर्षक इमोजी, स्मार्ट टेक्स्ट सिलेक्शन, सुधारित बॅटरी इंडिकेटर, सुधारित पिक्सल लाँचर अ‍ॅप्लीकेशन आदींसह अन्य फिचर्सचा समावेश असेल.

सुसंगत असणारे स्मार्टफोन्स

अँड्रॉइड ८.० ही आवृत्ती गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयोगात्मक म्हणजेच बीटा अवस्थेत वापरता येत होती. आता मात्र याचे फुल व्हर्जन उपलब्ध झाले असून निवडक स्मार्टफोनच्या मॉडेल्समध्ये ते अपडेटच्या स्वरूपात येणार आहे. गुगलने आपल्या पिक्सल आणि नेक्सस मालिकेतील पिक्सल, पिक्सल एक्सएल, नेक्सस ५ एक्स आणि नेक्सस ५ पी या स्मार्टफोन्समध्ये अँड्रॉइड ओ ही प्रणाली सर्वप्रथम देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे तुमच्याकडे जर या मालिकेतील कोणतेही मॉडेल असल्यास तुम्ही अँड्रॉइड प्रणालीची ही अद्ययावत आवृत्ती वापरू शकतात. याशिवाय सॅमसंग, एलजी, एचटीसी आदी कंपन्यांच्या फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये येत्या काही महिन्यात ही प्रणाली मिळू शकते. एचएमडी ग्लोबलने अलीकडेच सादर केलेल्या नोकिया ८ या मॉडेलमध्येही याचे अपडेट अपेक्षित आहे. ब्लॅकबेरीने अलीकडेच लाँच केलेल्या किवन या मॉडेलमध्येही अँड्रॉइड ओ हे अपडेटच्या स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे. तर शाओमी, वन प्लस, लेनोव्हो, सोनी, मोटोरोला आदी कंपन्यांच्या उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सला येत्या काही महिन्यांमध्ये हे अपडेट मिळू शकते. मात्र सध्या तरी गुगल स्मार्टफोन्सवरच ओरिओ वापरता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: top 10 features of android o

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल