अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरची दशकपूर्ती

By शेखर पाटील | Published: July 9, 2018 12:06 PM2018-07-09T12:06:01+5:302018-07-09T12:08:53+5:30

अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरला आता १० वर्षे पूर्ण होत आहेत.

The App Store turns 10 | अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरची दशकपूर्ती

अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरची दशकपूर्ती

Next

अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरला आता १० वर्षे पूर्ण होत आहेत. जगाच्या अगदी कानाकोपर्‍यात याचा वापर होत आहे. दशकपूर्तीचे औचित्य साधून अ‍ॅप स्टोअरच्या वाटचालीचा हा त्रोटक आढावा.

२९ जून २००७ रोजी स्टीव्ह जॉब्ज यांनी एका शानदार कार्यक्रमात आयफोनची पहिली आवृत्ती लाँच केली. याला  अतिशय उदंड प्रतिसाद लाभला. यानंतर १० जुलै २००८ अ‍ॅपलने आयफोन ३ जी हे मॉडेल लाँच केले होते. याच दिवशी अ‍ॅप स्टोअर कार्यान्वित करण्यात आले. अर्थात या १० जुलै रोजी अ‍ॅप स्टोअरला दहा वर्षे पूर्ण होत आहे. पहिल्या दिवशी या स्टोअरवर फक्त ५०० अ‍ॅप्लिकेशन्स होती. आज हाच आकडा २२ लाखांपेक्षा जास्त इतका आहे. यात ज्ञान, माहिती, मनोरंजनासह विविध युटिलिटीजने युक्त असणार्‍या अ‍ॅप्सचा समावेश आहे. यावरून प्रचंड उलाढाल होत आहे. गुगलच्या अँड्रॉइड प्रणालीसाठी असणार्‍या गुगल प्ले स्टोअरवर याच्या तुलनेत खूप जास्त म्हणजे सुमारे ३८ लाख अ‍ॅप्स आहेत. तथापि, कमाईचा विचार केला असता, अ‍ॅप स्टोअर हे कितीतरी पुढे आहे. आज या स्टोअरवर मोफत आणि प्रिमियम या दोन्ही प्रकारातील अ‍ॅप्लिकेशन्सचा समावेश आहे. प्रारंभी यावर फक्त आणि फक्त मोफत अ‍ॅप्स होते. यानंतर इन-अ‍ॅप परचेसची सुविधा देण्यात आली. आज जगभरातील डेव्हलपर्ससाठी अ‍ॅप स्टोअर हे कमाईचे एक उत्तम साधन झाले आहे. तर युजर्ससाठी एकाच ठिकाणी विविध अ‍ॅप्लिकेशन्सच एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे त्यांचीही सुविधा झालेली आहे.

आज जगभरात आयओएस प्रणालीवर चालणारे सुमारे १३० कोटी उपकरणे आहेत. यात आयफोन आणि आयपॅडचा समावेश आहे. या सर्व डिव्हाईसेसमध्ये अ‍ॅप स्टोअर वापरले जात आहे. सद्यस्थितीत दर आठवड्याला तब्बल ५० कोटी युजर्स अ‍ॅप स्टोअरला भेट देत असतात. यात गेमींग हा भाग सर्वात लोकप्रिय आहे. तर गेमींग आणि एंटरटेनमेंट या प्रकारांमध्ये सर्वाधिक कमाई होत असते. जगभरात तब्बल दोन कोटी आयओएस डेव्हलपर्स आहेत. तर अ‍ॅप स्टोअरच्या माध्यमातून लक्षावधींना रोजगार मिळाला असून असंख्य कंपन्यांचे नशीब फळफळले आहे. हे सर्वाधिक उलाढालीचे जगातील अग्रगण्य सॉफ्टवेअर स्टोअर बनले आहे. जगातील तब्बल १५५ देशांमध्ये हे स्टोअर उपलब्ध आहे.

Web Title: The App Store turns 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल