अमेझॉन इको, इको डॉट व प्राईम म्युझिक लवकरच भारतात येणार

By शेखर पाटील | Published: August 21, 2017 12:11 PM2017-08-21T12:11:29+5:302017-08-21T15:21:19+5:30

अमेझॉन कंपनीचे व्हाईस कमांडवर चालणारे इको व इको डॉट हे डिजीटल असिस्टंटयुक्त स्मार्ट स्पीकर तसेच प्राईम म्युझिक ही प्रिमीयम सेवा लवकरच भारतात सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

Amazon soon to launch eco dot prime music in india | अमेझॉन इको, इको डॉट व प्राईम म्युझिक लवकरच भारतात येणार

अमेझॉन इको, इको डॉट व प्राईम म्युझिक लवकरच भारतात येणार

ठळक मुद्देअमेझॉन इको आणि इको डॉट या दोन्ही उपकरणांची भारतात या कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून चाचणी घेण्यात येत आहे. यासोबत अमेझॉन प्राईम म्युझिक ही सेवादेखील सुरू होईल असे मानले जात आहे.

अमेझॉन कंपनीने ई-शॉपींगमध्ये भारतीय बाजारपेठेत आपला पाया मजबूत केला आहे. याशिवाय या कंपनीची किंडलसारखी उपकरणेदेखील भारतात उपलब्ध आहेत. तथापि, अमेझॉन कंपनीने सादर केलेल्या फायरफोनला फारसा प्रतिसाद लाभला नाही. यामुळे या फियास्कोनंतर ही कंपनी उपकरणांमध्ये दमदार पाऊल टाकण्याच्या तयारीत असल्याचे समजते. यासाठी अमेझॉन इको आणि इको डॉट या स्मार्ट स्पीकर्सला भारतीय ग्राहकांना सादर करण्यात येणार आहे. या दोन्ही मॉडेलमध्ये अलेक्झा हा अमेझॉन कंपनीने विकसित केलेला कृत्रीम बुध्दीमत्तेवर (आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स) आधारित व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट देण्यात आला आहे. यात व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने कुणीही  याच्याशी कनेक्ट असणार्‍या उपकरणांच्या विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो. अर्थात यावर स्मार्टफोनच्या मदतीने कॉल करणे, विविध पदार्थांच्या ऑर्डर देणे, मॅसेज करणे आदींपासून ते दैनंदिन कामांचे नियोजन करणे शक्य आहे. यातील अमेझॉन इको या मॉडेलची मिनी आवृत्ती म्हणून इको डॉट हे ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. अमेरिकन बाजारपेठेत ही दोन्ही उपकरणे सध्या अनुक्रमे १७९ आणि ५० डॉलर्स मूल्यात उपलब्ध आहेत. यामुळे भारतीय बाजारपेठेत ही उपकरणे अनुक्रमे ११ ते १२ तसेच ५ ते ६ हजार रूपयांच्या दरम्यान सादर करण्यात येतील असे मानले जात आहे. मात्र या दोन्ही उपकरणांमध्ये स्पॉटीफाय या म्युझिक स्ट्रीमिंगचा उपयोग करण्यात येतो. तथापि, स्पॉटीफायची सेवा अद्याप भारतात नसल्यामुळे गाना, सावन आदींसारख्या सेवांना याला संलग्न केले जाईल असे मानले जात आहे. यातच स्पॉटीफायदेखील भारतात येण्याची चाचपणी करत असल्याची बाब लक्षणीय आहे.

अमेझॉन इको आणि इको डॉट या दोन्ही उपकरणांची भारतात या कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यांपासून चाचणी घेण्यात येत आहे. या दोन्ही उपकरणांमध्ये इंग्रजीचा सपोर्ट असला तरी हिंदीसह अन्य भारतीय भाषांमध्ये याचा वापर सुलभ व्हावा यासाठी आवश्यक ते बदल करण्यात येत असल्याची माहितीदेखील समोर आली आहे. तर यासोबत अमेझॉन प्राईम म्युझिक ही सेवादेखील सुरू होईल असे मानले जात आहे. या कंपनीने गेल्या वर्षीच अमेझॉन प्राईम या नावाने व्हिडीओ ऑन डिमांड सेवा सुरू केली आहे. त्यात आता प्राईम म्युझिकची भर पडणार आहे. भारतीय बाजारपेठेत म्युझिक स्ट्रीमिंगची वाढती बाजारपेठेत लक्षात घेता अमेझॉनने ही पावले उचलल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेझॉन प्राईमला लाँच करतांना ४९९ रूपये प्रति वर्ष इतके मूल्य ठेवण्यात आले होते. या पार्श्‍वभूमिवर याच अथवा यापेक्षा थोड्या कमी मूल्यात प्राईम म्युझिक सेवा सुरू होऊ शकते. साधारणत: दसरा व दिवाळीच्या दरम्यान अमेझॉन कंपनी इको, इको डॉट तसेच प्राईम म्युझिक लाँच करण्याची शक्यता आहे.

Web Title: Amazon soon to launch eco dot prime music in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.