‘फेसबुक’वरून शोधला दंगलीचा आरोपी

  • First Published :11-January-2017 : 05:18:57

  • गौरी टेंबकर-कलगुटकर / मुंबई

    मुंबईतील १९९३ सालच्या दंगलीतील फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रविवारी जोगेश्वरी पोलिसांना यश आले. हा आरोपी गेली १० वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देत होता. महत्त्वाचे म्हणजे आरोपीच्या मुलाच्या ‘फेसबुक’ अकाउंटवरून पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधत त्याला गजाआड केले असून, रवींद्र सावंत उर्फ विठोबा सावंत (५०) असे आरोपीचे नाव आहे.

    विठोबा या नावाने तो भार्इंदरमधील ‘मोरक्को टॉवर’मध्ये पत्नी आणि मुलासह राहत होता. त्याने याच नावाने बनावट कागदपत्रे तयार करत एका नामांकित बँकेत खाते खुले केले होते. शिवाय एका खासगी विकासकाकडे वेषांतर करून काम करत होता. १९९३ सालच्या दंगलीत जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड परिसरात त्याने एक घर जाळले होते. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. त्याच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात येत असताना सुरुवातीची काही वर्षे त्याने न्यायालयात हजेरी लावली. मात्र १० वर्षांपूर्वी तो पसार झाला.

    मुंबई उच्च न्यायालयाने फरार आरोपींना शोधण्याचे आदेश  पोलिसांना दिले होते. त्या आदेशान्वये पोलीस सावंतचा शोध घेत होते. जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण यादव यांना सावंतच्या मुलाचे ‘फेसबुक’ अकाउंट सापडले. याद्वारे त्यांनी त्याचा भार्इंदरचा पत्ता शोधत त्याच्या घराजवळ सापळा रचला. मात्र याची कुणकुण सावंतला लागली आणि तो घरातून पसार झाला. तरीही यादव यांनी शिताफीने सावंतचा पाठलाग करत भार्इंदर रेल्वे स्थानकावरून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला बारा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma