पाटा विकेटवर फिरकी गोलंदाजी अवघड : कोहलीकडून अश्विनची पाठराखण

 • First Published :19-June-2017 : 23:51:55

 • लंडन : वन-डे क्रिकेटमध्ये सीनिअर आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, पण भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या मते पाटा खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याचे आव्हान बघता त्याच्यावर टीका करणे योग्य नाही.

  युवा फलंदाज फखर जमानने अश्विनला लक्ष्य केले. भारताला अंतिम लढतीत १८० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अश्विनला १० षटकांत ७० धावांच्या मोबदल्यात एकही बळी घेता आला नाही. अश्विनने स्पर्धेच्या तीन सामन्यांत केवळ एक बळी घेतला. त्याने २९ षटकांत १६७ धावा बहाल केल्या. त्याला शेवटच्या १० वन-डे सामन्यांत केवळ ९ विकेट घेता आलेल्या आहेत.

  अश्विनची पाठराखण करताना कर्णधार कोहली म्हणाला,‘पाटा खेळपट्ट्यांवर प्रत्येक फिरकीपटूला आव्हानाला सामोरे जावे लागते. प्रत्येक फिरकीपटूविरुद्ध धावा फटकावल्या जातात. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर फलंदाज फॉर्मात असेल तर फिरकीपटू अडचणीत येतो. आडव्या बॅटने फटका मारल्यानंतरही फलंदाज बाद होण्याची शक्यता नसते. फिरकीपटू म्हणून तुम्हाला विशेष काही करता येत नाही. कारण प्रतिस्पर्धी फलंदाजाला ज्या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे तेथे गोलंदाजी केल्यानंतरही तो फटके खेळत असतो.’

  कोहलीने दोन फिरकीपटूंना खेळवण्याच्या निर्णयाचा बचाव केला. त्यांनी रविवारच्या लढतीत १८ षटकांत १४७ धावा बहाल केल्या. कोहली म्हणाला,‘श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर आम्ही संघाचे संयोजन तयार केले होते. दोन फिरकीपटूंनी आमच्यासाठी चांगली कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीनंतर आम्ही तो क्रम कायम ठेवला.’

  आघाडीचे तिन्ही फलंदाज एकाचवेळी अपयशी ठरल्यामुळे आश्चर्य वाटते की निराशा झाली, याबाबत बोलताना कोहली म्हणाला,‘आघाडीचे सर्वंच फलंदाज अपयशी ठरल्यामुळे वाईट वाटते. संघासाठी योगदान न देता आल्याचे सर्वांना दु:ख होते.’

  दरम्यान, कोहलीने पाक संघाची प्रशंसा केली. कोहली म्हणाला,‘अखेर प्रतिस्पर्धी संघाच्या कौशल्याचा स्वीकार करायला हवा. त्यांची प्रशंसा करायला पाहिजे. आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केला, पण परिस्थिती आमच्या बाजूने नव्हती.’ (वृत्तसंस्था)महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS