थेट प्रवेशासाठी पाकिस्तानचे प्रयत्न

 • First Published :12-January-2017 : 01:19:16

 • दुबई : वन डे क्रमवारीत तळाच्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानला फॉर्ममध्ये असलेल्या विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे शुक्रवारपासून पाच सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत यश मिळवत, २०१९ च्या विश्वचषकात थेट प्रवेशासाठी पाक संघ धडपडणार आहे.

  माजी विश्वविजेत्या पाकला इंग्लंडमध्ये आयोजित ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्यासाठी झुंजावे लागत आहे. संघ सध्या ८९ गुणांसह आठव्या स्थानावर आहे. बांगलादेशपेक्षा दोन गुण कमी तर विंडिजपेक्षा दोन गुण अधिक आहेत.

  यजमान इंग्लंडशिवाय ३० सप्टेंबर २०१७ रोजी आयसीसी वन डे क्रमवारीत पहिल्या सात स्थानांवर राहणाऱ्या संघांना जुलै २०१९ मध्ये आयोजित विश्वचषकात थेट प्रवेश दिला जाईल. तळाच्या स्थानावर राहणारे चार संघ, तसेच आयसीसी विश्व क्रिकेट लीगमधील सहा असे एकूण दहा संघ आयसीसी विश्व क्वालिफायर २०१८ मध्ये खेळतील.

  पाकला आपली रँकिंग कायम ठेवण्यासाठी मालिकेतील किमान एक सामना जिंकणे अनिवार्य आहे. पाकने दोन सामने जिंकल्यास बांगलादेशच्या बरोबरीने त्यांचे ९१ गुण होतील, तरीही दशांशच्या तुलनेत पाक मागेच राहील. पाकने मालिका जिंकल्यास बांगलादेश मागे पडेल.

  दुसरीकडे आॅस्ट्रेलियाला स्थान कायम राखायचे झाल्यास मालिका किमान ४-१ ने जिंकणे गरजेचे असेल. मालिका ३-२ ने जिंकली, तरीही त्यांच्यावर गुण गमविण्याची पाळी येईल. पाकने ४-१ ने मालिका जिंकल्यास आॅस्ट्रेलियाला अव्वल स्थान गमवावे लागेल. तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताला दुसऱ्या स्थानावरील द. आफ्रिकेला मागे टाकण्यासाठी इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्याचे आव्हान असेल.

  खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास, भारतीय कर्णधार विराट कोहलीची नजर अव्वल स्थानावर असलेला आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्स याच्या अव्वल स्थानावर असेल. विराट डिव्हिलियर्सच्या तुलनेत १३ धावांनी मागे आहे. (वृत्तसंस्था)

महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS
vastushastra
aadhyatma