चपळ आणि तेजतर्रार मल्लखांब

 • First Published :15-June-2017 : 18:11:49

 • भक्ती सोमण
    
  मल्लखांब. आपल्या मातीतला. अस्सल खेळ. व्यायामप्रकार. लाकडी खांबावरची ती चपळ हालचाल, भन्नाट कसरती, त्यातला तोल आणि ताल आपल्याला मोहात पाडतो. शरीर, मन आणि मेंदू यांचा तोल राखायला शिकवणारी ही कला. मात्र या खेळात माहीर व्हावं असं आता नव्यानं का वाटू लागलंय तरुण मुला-मुलींना? टीव्हीच्या रिअ‍ॅलिटी शोज्पासून ते थेट नृत्यकार्यक्रमांपर्यंत कसा दिसू लागलाय मल्लखांब? मल्लखांबाच्या जगात जाऊन शोधलेली त्या प्रश्नांची उत्तरं... 
   
  अमुकतमुक डे असल्याचं आताशा आपल्याला व्हायरल पोस्टमधूनच कळतं. तशी एक पोस्ट गेले काही दिवस व्हायरल होती. पण हा ‘डे’ वेगळा. आपल्या मातीतला. १५ जून हा दिवस मल्लखांब दिवस. एकाएकी मल्लखांब कसा काय चर्चेत आला, असा प्रश्न ती पोस्ट वाचून अनेकांना पडला असेलच. महाराष्ट्रातल्या मातीतला हा एक अस्सल क्रीडाप्रकार. अलीकडच्या काळात टीव्हीवरच्या विविध रिअ‍ॅलिटी शोमध्ये तो झळकला आणि त्याच्याविषयीही अनेकांना आकर्षण वाटू लागलं. मात्र आकर्षण आणि ग्लॅमर यांच्यापलीकडे आहे या अस्सल मराठमोळ्या खेळातला पॅशन. मल्लखांब शिकणाऱ्या तरुण मुलांचं एक वेगळंच जग आहे. आणि त्या जगातली लवचीकता आपल्याला थक्क करणारी आहेच.
  चपळाई, वेग आणि लवचीकता यांचं हे जग नक्की कसं आहे हे पाहायचं म्हणून दादरचं अत्यंत प्रसिद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिर गाठलं. गेली पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ हजारो देशी-परदेशी मुलांना मल्लखांबाचं प्रशिक्षण देणारे आणि मल्लखांबाचा जगभर प्रसार-प्रचार व्हावा यासाठी अविरत झटणारे उदय देशपांडे सर तिथं भेटतात. त्यांचं पॅशनच आहे मल्लखांब. आणि आजवर अनेक तरुण मुलांमध्ये त्यांनी त्या ऊर्जेची बीजं पेरली आहेत. देशात नाहीतर परदेशातही त्यांचे अनेक विद्यार्थी मल्लखांबाचं भारलेपण घेऊन आपल्या जगण्यात आनंदी आहेत.
  शिवाजी पार्कच्या ज्या मैदानात क्रिकेटचा पांढरा शुभ्र मळा हिरव्या नेटच्या चौकोनांत फुललेला असतो. त्याच पार्कच्या एका बाजूला मल्लखांबाचं हे जग आहे. पण क्रिकेटपेक्षा वेगळं. सांघिक आणि वैयक्तिकही असा हा खेळाचा एक वेगळाच चपळ आविष्कार आहे. 
  परफॉर्मिंग आर्ट्सच्या जवळ जाणारा मल्लखांब. त्याचे पोल मल्लखांब आणि रोप मल्लखांब असे दोन प्रकार. जमीन किंवा जिथे करायचा असेल तिथे एक उंच लाकडी खांब पुरून त्यावर ज्या चित्तथरारक कसरती केल्या जातात. त्याला म्हणतात पोल मल्लखांब, तर साध्या कॅनव्हास कोटिंग दोरीचा आधार घेत रोप मल्लखांबावर डौलदार कसरती करता येतात.
  मात्र त्या कसरती पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. आपण थक्क होतो, पण हे मल्लखांबाचं तंत्र शिकणं सोपं असतं, खरंच कुणालाही शिकता येऊ शकतं का?
  उदय देशपांडे सरांना विचारलं. तर ते सांगतात, ‘हे सगळं पाच तंत्रावर अवलंबून आहे. मल्लखांबाजवळ उभं राहिल्यानंतर पहिल्यांदा करायचं माउंट किंवा आरोहण. यात तुम्ही खांब किंवा दोरीवर उडी मारायची. त्यानंतर ती वस्तू (खांब, दोर) पकडून थांबणं म्हणजे स्थिरता. हे करताना उभं राहणं, मयूरासन, बंदरपक असे जे काही प्रकार करणे अपेक्षित असतं ते करणे. त्यानंतर गतिमान हालचाली कराव्या लागतात. यात सुई-दोरा, वेल, तबकफाड असे अनेकविध प्रकार करताना जास्त कस लागतो. त्यानंतर परत स्थिर स्थिती घेऊन मल्लखांब सोडून द्यायचा आणि हवेत असताना लगेचच परत तो पकडायचा, याला झापा म्हणतात. यानंतर खांबावर असतानाच जमिनीवर उतरण्याची क्रिया म्हणजेच स्थिर अवरोहण करायचे. अशी पाच तंत्रे हळूहळू आत्मसात केलीत की, मल्लखांबातले सोपे, मध्यम, अवघड प्रकार जमू लागतात. त्यात रोपवर योगाचे प्रकार, नृत्यमय हालचाली करता यायला लागतात. पोल मल्लखांबावर अनेक मुलं एकत्र येऊन विविध प्रकार करतात, हे आपण पाहतोच. मात्र असे प्रकार करण्यासाठी अर्थातच मेहनत घ्यावी लागते. 
  तुम्ही टीव्हीवर हे सारं बघता तेव्हा साहजिकच याविषयी आकर्षण वाढतं. अलीकडे तर सगळ्याच रिअ‍ॅलिटी शॉज्मधून मल्लखांबाला पहिलं क्रमांकाच पारितोषिक मिळू लागलं आहे. त्यामुळे या खेळाला ग्लॅमर प्राप्त झालं. त्या आकर्षणापोटी अनेकजण आता मल्लखांब शिकायला येत आहेत, पण ग्लॅमर वेगळं आणि शिकण्याची इच्छा, मेहनतीची तयारी आणि ही कसरत करताना आपल्याला मिळणारा आनंद महत्त्वाचा, असं उदय सर सांगतात. 
  मात्र यापलीकडे खरंतर मल्लखांबाकडे पाहायला हवं, ते म्हणजे आपलं नवीन काहीतरी शिकणं असं सांगून उदय देशपांडे सहज सांगतात की, आपण नवीन, वेगळं काही शिकावं असं आता अनेक मुलांना वाटतं. इतरांच्या पुढे जाण्याची वृत्ती असलेले अनेकजण आता मल्लखांब शिकायला येतात. मल्लखांब शिकला तर आपण ताणविरहित आयुष्य जगू शकतो. इतकंच नाही तर आपल्या शरीराला आणि मनालाही त्याचा सर्वांगीण फायदा होतो. रोप किंवा खांबावर प्रमाणबद्ध हालचाली होत असताना पाठीच्या कण्याला व्यायाम होतो. उंची वाढते. आकलनशक्ती, स्मरणशक्ती वाढते. वेगाने हालचाली करत असल्यामुळे ब्रेनसेल्सना उत्तम आॅक्सिजन मिळतो. वाढलेलं पोट कमी होतं, शरीराची ताकद वाढते, चपळता, गतिमानता वाढते. त्यानं आत्मविश्वास तर वाढतोच, आनंदही होतो. योग्य प्रशिक्षण मिळालं तर अंध मुलंही अगदी सहज हा प्रकार शिकू शकतात.’
  विशेष म्हणजे आता नव्या काळात करिअर म्हणूनही या खेळाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन तयार होतो आहे. यात स्पर्धा आहे, पैसाही आहे आणि आता तर शाळेतही मल्लखांब शिक्षक म्हणून काम करता येऊ शकतं. एक मात्र नक्की आपल्यापेक्षा परदेशात मल्लखांब खेळाविषयी आकर्षण खूप जास्त आहे. तिथे सर्कसमध्ये तर आवर्जून हा प्रकार केला जातो. त्यामुळे तेथे विविध संस्थांमधून या खेळाला मागणी वाढली आहे. आपल्याकडचे अनेक तरुण मुलं-मुली परदेशात जाऊन शिक्षण देत आहेत. त्या मुलांनी एकत्र येत मल्लखांब जागृतीची चळवळ उभी केली तर त्याचा फायदा खूप जास्त होईल, असं देशपांडे सर नमूद करतात. 
  ते बोलत असतात. आपल्या अवतीभोवती अनेक लहान-मोठी मुलं-मुली मल्लखांबावर कसरती करत असतात. 
  त्यातल्या अनेकांशी गप्पा मारल्या. मुलांशी, मुलींशीही. तर ते एकच सांगतात की, मल्लखांबावरच्या या कसरती म्हणजे एकेक गोष्ट शिकण्याची, गिरवण्याची एक प्रेरणा आहे. शरीराचा फिटनेस तर आहे पण बॅलन्सिंग करतानाच नवीन आव्हान स्वीकारण्याची तयारी दोन्हीही त्यातून मिळतं. ते जे मिळतं ते या मुलांच्या प्रत्येक हालचालीत दिसतं. त्या लाकडी खांबावरची ती चपळ हालचाल, त्यातला तोल आणि ताल आपल्याला मोहात पाडतो. शरीर, मन आणि मेंदू याचा तोल राखायलाच शिकवणारी ही कला जणू. या खेळात माहीर व्हावं असं वाटणाऱ्या तरुण मुला-मुलींच्या नजरेतील चमकच आपल्याला सांगते की, मल्लखांब डे इतरांसाठी एकच दिवस असेल, पण यांच्यासाठी मात्र ती जगण्याची ऊर्जा आहे.. चपळ ऊर्जा!!
   
  एक तरी उडी
  मल्लखांब दिनाचे औचित्य साधून एक आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. यासाठी मल्लखांब राज्य संघटनेच्या वतीने १० लक्ष उड्यांचा संकल्प केला असून, महाराष्ट्रात किंवा बाहेर जिथे जिथे मल्लखांब खेळला जातो त्यांनी आजच्या दिवशी मल्लखांबाच्या जास्तीत जास्त उड्या मारायच्या. आणि त्या उड्या आपलं नाव, जिल्हा आणि कि ती उड्या मारल्या या तपशिलासह त्यांच्या अ‍ॅपवर पाठवायचं आहे. त्यांची गणना केली जाणार आहे. याशिवाय पुर्वानुभव नसलेल्या माणसाला एक तरी साधी उडी मल्लखांब येणाऱ्यांनी शिकवावी अशी अपेक्षा आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे सध्या मल्लखांबात आघाडीवर आहे. विदर्भ, मराठवाडा भागातही मल्लखांब नव्यानं रुजतो आहे.
   
  खेळांत सहभाग
  महाराष्ट्रात ३५ जिल्ह्यात तर संपूर्ण भारतात २९ राज्यांमध्ये मल्लखांब संघटना आहेत. त्याप्रमाणे यावर्षी फ्रान्स, आॅस्ट्रिया, हॉँगकॉँग, सिंगापूर येथे संघटना उभी करण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रीय खेळांमध्ये मल्लखांबाचा सहभाग असावा यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तसेच हा खेळ ग्रामीण क्रीडा महोत्सवातही त्याच्या समावेशाची मागणी आहे. मल्लखांबांची परिपूर्ण माहिती देणारं पुस्तकही उदय देशपांडे लिहित आहेत.
   
   
  मल्लखांब दिनाची एक गोष्ट..
  मल्लखांबाला दोनशे वर्षांची परंपरा आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे मल्लखांब. तो दोन प्रकारे सांगता येईल. दुसरा बाजीराव पेशव्यांच्या काळात हैदराबादच्या निजामाकडून अली आणि गुलाम हे दोन पैलवान पुण्याला आले. पेशव्यांच्या दरबारात असलेल्या ५२ सनदी पैलवानांना त्यांनी कुस्ती खेळण्याचं आव्हान दिलं. पण या दोघांची देहयष्टी, लवचीकता पाहून त्यापैकी कोणाचीही हिंमत झाली नाही. पुण्यात तेव्हा बाळंभट दादा देवधर हे भिक्षुक होते. त्यांनी काही दिवसांचा अवधी मागून या पैलवांनांचे आव्हान स्वीकारलं. त्या दरम्यान ते नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगगडावर ते गेले. त्यांनी देवीची कठोर आराधना केली. देवी प्रसन्न झाली. तिने बजरंगबली तुझ्या स्वप्नात येऊन तुला कुस्तीचे प्रकार दाखवतील असं सांगितलं. त्यानंतर सलग तीन रात्री बजरंगबलीने दर्शन दिलं. एका लाकडी खांबावरती काही डाव दाखवले. त्यावरून प्रेरित होऊन बाळंभटांनी तसा लाकडी खांब तयार करून त्यावर सराव केला अशी आख्यायिका सांगतात. 
  पुढे ठरलेल्या मुदतीत बाळंभट्ट पुण्याला आले. त्यांची अलीशी कुस्ती झाली. मल्लखांबाच्या युक्त्या वापरून गळेखोजच्या डावाने त्यांनी अलीला चीतपट केलं. त्याचं हे तंत्र पाहून गुलाम खेळलाच नाही. हे ज्या दिवशी घडलं तो दिवस होता 
  १५ जून. म्हणूनच बाळंभटांना मल्लखांबाचे आद्यजनक म्हटलं जातं. 
  अर्थात, यंदा पहिल्यांदाच हा मल्लखांब दिन साजरा होत आहे.
   
  डान्सही आणि फिटनेसही
  एक नक्की.. पूर्वी मल्लखांबाला आजच्या इतकं महत्त्व नव्हतंच. आवड म्हणूनच काहीजण शिकत. खेळत. आता मात्र फिटनेस म्हणूनही तरुण याकडे आकृष्ट झाले आहेत. काहींची तर मल्लखांब पॅशन होते आणि त्याा खांबावरच्या एकेक कसरती ते अधिक समरसून करू लागतात. त्याचंच एक उदाहरण म्हणजे अभिनेत्री इशा शर्वाणीने संगीत, नृत्याला मल्लखांबाची जोड देत एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये सुंदर नृत्य केले होते. नृत्याला जोड म्हणूनही मल्लखांबाच्या कसरती करणं अलीकडच्या काळात वाढताना दिसतं आहे. 
   
  (भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादकआहे.) 


महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS